सामना अग्रलेख – अशाने ‘इस्लाम’ खतऱ्यात येईल; ‘मरकज’ची झुंडशाही

13042

मुसलमान समाजात जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे. तेथेही ‘लॉक डाऊन’ आहे. मग येथे ‘मरकज’च्या झुंडी जमा का करता? अशाने इस्लाम खरंच खतऱ्यात येईल हो!

संपूर्ण हिंदुस्थान कोरोनाच्या भीतीने घरात बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या आदेशाने ‘लॉक डाऊन’ झाला आहे. पण दिल्लीच्या निजामुद्दीन येथे जमलेल्या मुसलमान झुंडीने देशावरील संकटात आणि चिंतेत भर टाकली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम 1 ते 15 मार्चच्या दरम्यान झाला. या कार्यक्रमासाठी देशातील 22 राज्यांमधून आणि जगातील 8 देशांतून 5 हजारांवर लोक जमले होते. त्यातील 380 लोक आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने देशात हडकंप माजला आहे. या 5 हजारांच्या जमावात 2 हजार परदेशी नागरिक होते. सारा देश कोरोनाच्या चिंतेने ग्रासला असताना, दिल्लीसारख्या शहरात ‘गर्दी’ आणि ‘झुंडी’ जमा करण्यावर निर्बंध लादलेले असताना 5 हजार लोक धर्माच्या नावाखाली जमले त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम अखेर झाला. निजामुद्दीन परिसरात जमलेल्या या धार्मिक झुंडीने देशाला 380 कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे. ‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची व समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. लोकांनी घरच्या घरीच नमाज पठण करावे असे फर्मान तेथील राज्यकर्त्यांनी काढले आहे. तेदेखील मुसलमानच आहेत आणि इस्लामचे बंदे आहेत. तेथे राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षेसाठी मशिदी व सार्वजनिक नमाजावर बंदी येऊनही ‘इस्लाम’ संकटात आल्याची बांग कोणी ठोकलेली नाही, पण दिल्लीत ‘मरकज’ची यात्रा घडली नसती तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते? कोणी एक मौलाना मुहम्मद साद आहेत. निजामुद्दीन ‘मरकज’चे हे महाशय आयोजक आहेत. त्यांना म्हणे दिल्ली पोलिसांनी वारंवार विनंती केली की, बंगलेवाली मशिदीतील ही ‘मरकज’वाली गर्दी थांबवा, पण या महाशयांनी ऐकले नाही. तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांना भल्या पहाटे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मरधरणीसाठी निजामुद्दीन येथे पाठवावे लागले. आता ‘मरकज’च्या आयोजकांपैकी काहींचा असा उलटा दावा आहे की, त्यांना दिल्लीच्या पोलिसांनी आणि प्रशासनाने सहकार्य केले नाही. ‘मरकज’साठी आलेल्यांना बाहेर पडण्यासाठी ‘पासेस’ द्या अशी विनंती म्हणे या मंडळींनी दिल्ली पोलीस आणि प्रशासनाला वारंवार केली, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आतील लोकांना बाहेर पडता आले नाही. आता हा

दावा की कांगावा,

तो खरा की खोटा हे त्या ‘मरकज’चे आयोजक आणि दिल्ली पोलीस यांनाच माहीत. प्रश्न इतकाच आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे ‘मरकज’ही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते. प्रख्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने ‘मरकज’वाल्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. ‘‘मरकज’निमित्त जमवलेली गर्दी ही लापरवाही आहे. ‘लॉक डाऊन’ तोडणे म्हणजे दुसऱ्यांची ‘जिंदगी’ धोक्यात टाकण्यासारखेच आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल हो, सरकारने दिलेला ‘लॉक डाऊन’चा आदेश पाळावाच लागेल’’, असे परखड मत नवाजभाईंंनी व्यक्त केले आहे. धर्माच्या नावावर अशा

बेशिस्त झुंडी

जमा करण्यावरून फराह खान यांनीदेखील टीका केली आहे. खासदार असलेल्या अभिनेत्री नुसरत जहाँ यांनीदेखील तेच सांगितले आहे. कोरोनासारखा गंभीर आजार ‘धर्म’ पाहून येत नाही. गरीब-श्रीमंत असा भेद हा आजार करीत नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, गर्दी टाळा. घरी थांबण्यातच तुमचे हीत आहे. हे सर्व विस्ताराने सांगायचे ते यासाठीच की, तुमच्या त्या ‘मरकज’ने देशाची चिंता वाढवली आहे. ‘मरकज’साठी आलेल्या बेपर्वा तबलिगींनी आपापल्या राज्यांत परतताना 5 रेल्वे गाड्यांनी प्रवास केला. त्यातील काही लोक महाराष्ट्रातही आले. म्हणजे गाडीतील असंख्य लोकांना त्यांनी विनाकारण संकटात टाकले. खरे तर जे ‘मरकज’ला गेले त्यांनी स्वत:हूनच पुढे यायला हवे. त्यात लपविण्यासारखे काय आहे? ताप, सर्दी, खोकलाच आहे. फक्त संसर्गजन्य असल्याने काळजी घ्यायची आहे इतकेच. जे हे लपवतात, ते देशाला फसवतात हे लक्षात घ्या. हिंदुस्थानातील धर्मांध मुसलमानांच्या या प्रवृत्तीमुळेच येथे अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या पडतात. त्यांच्याशी कठोरपणे वागावे तर त्यांना येथे असुरक्षित असल्याची भावना उफाळून येते आणि प्रेमाने वागावे तर ‘मरकज’सारखी प्रकरणे घडतात. मुसलमान समाजात जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱयांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे. तेथेही ‘लॉक डाऊन’ आहे. मग येथे ‘मरकज’च्या झुंडी जमा का करता? अशाने इस्लाम खरंच खतऱ्यात येईल हो!

आपली प्रतिक्रिया द्या