सामना अग्रलेख – उगाच घाई कशाला?

महाराष्ट्राचा संसार सुखाने चालवण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. मंत्री सध्या बिनखात्याचे आहेत, पण बिनडोक्याचे नाहीत. नागपूरचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. ते सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल व मंत्र्यांचे खातेवाटपही होईल. महाराष्ट्राचे सरकार दमदार पावले टाकत पुढे जाईल. आमच्या मनात तरी शंका नाही! उगाच घाई कशाला करायची? उद्धव ठाकरे यांना सरकार 80 दिवस नाही, तर सरळ पाच वर्षे चालवायचे आहे. ते नक्कीच चालेल. 

महाराष्ट्राचे सरकार कामाला लागले आहे हे तर मान्य करावेच लागेल. माहोल नवा असला तरी माणसे जुनीच आहेत. मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे भले करायचे याच एकमेव तळमळीतून निर्माण झालेले हे सरकार आहे. त्यामुळे सरकारविरोधात कुणी ‘मळमळ’ ओकत असेल तर त्याकडे कानाडोळा केलेलाच बरा. उलटसुलट कामे करणाऱयांना ‘घाई’ असते तशी घाई उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिसत नाही. उलटेसुलटे करण्याचा प्रयोग कसा अंगलट येतो याचा अनुभव देवेंद्र फडणवीस यांनी जे 80 तासांचे सरकार स्थापन केले त्यात आला आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांना फार उकळय़ा फुटण्याचे कारण नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार तब्बल 20-25 पक्षांचे होते व ते चांगले पाच वर्षे चालले. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले. ते त्यांच्या मूळ भूमिकेत शिरले, पण अद्यापि ‘बुटा’त नीट पाय बसत नाही असे दिसते. मुख्यमंत्रीपद सुटल्यावर श्री. फडणवीस हे बेघर झाले व ते मुंबईत घर शोधत असल्याच्या बातम्या छापल्या, पण फडणवीस यांना कॅबिनेट मंत्र्यास मिळणारा ‘सागर’ हा भव्य बंगला त्यांच्या इच्छेनुसार मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या विरोधी पक्षनेत्यास इतका मोठा मनपसंत बंगला मिळाला नव्हता.

मंत्रालयासमोरील ‘कॉटेज’ बंगल्यात विरोधी पक्ष नेते थांबत असत, पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मलबार हिलवरचा ‘सागर’ बंगला माननीय विरोधी पक्षनेत्यांना दिला. विरोधी पक्षनेत्यांचे मन चांगल्या वातावरणात रमावे, विधायक विरोधी पक्ष म्हणून त्यांना आरामात काम करता यावे हा त्यामागचा हेतू असावा. पुन्हा आमचे सरकार दिलदार आहे. सूडाने वागणार नाही. जे तुमचे हक्काचे आणि न्यायाचे आहे ते मिळणारच. विरोधी पक्षाचा मानसन्मान राखला जाईल. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाच तरी आम्ही त्यांच्या वाटय़ाची चहाची किटली, वडापावसह घरपोच करू अशी प्रेमाची भूमिका सरकार पक्षाने विराधी पक्षाबाबत घेतलेली दिसते. महाराष्ट्राच्या विकासाचे चाक कुठे अडकू नये असे जनतेला वाटते, कारण सध्याचे सरकार मोठय़ा संघर्षातून सत्तेवर आले आहे व ते पूर्णकाळ टिकावे असा जनमानस आहे. आता अशा बातम्या सुटत आहेत की, मंत्रिमंडळाचा विस्तार लटकला आहे व शपथ घेतलेले सर्व मंत्री खात्याविनाच काम करीत आहेत. सर्वांना बंगले मिळाले, पण काम नाही. मंत्र्यांना दालने मिळाली, पण अधिकार नाहीत. या सर्व बातम्यांत आम्हाला तरी तथ्य दिसत नाही. सहा मंत्र्यांनी

शपथ घेतली आहे व आतापर्यंतच्या कॅबिनेट बैठकांत राज्याच्या हिताचे निर्णय झालेच आहेत. आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालाच आहे. इतर राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. आधीच्या सरकारच्या काही प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याची भूमिका विद्यमान सरकारने घेतली आहे. पाच वर्षांत सरकारी तिजोरीस जी भोके पडली ती वाढू नयेत ही या सरकारची भूमिका आहे. जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठीच वापरला जावा या धोरणाने जनतेची पै आणि पै वापरली जावी ही भूमिका आज दिसत आहे. सरकारने सूत्रे हाती घेऊन आता कोठे आठेक दिवस झाले. लग्न झाले. नववधूने आता घराचा उंबरठा ओलांडला आहे. ‘वऱहाड’ मोठे आहे, पण अनुभवी आहे. महाराष्ट्राचा संसार सुखाने चालवण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. मंत्री सध्या बिनखात्याचे आहेत, पण बिनडोक्याचे नाहीत. नागपूरचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. ते सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल व मंत्र्यांचे खातेवाटपही होईल. महाराष्ट्राचे सरकार दमदार पावले टाकत पुढे जाईल. आमच्या मनात तरी शंका नाही! उगाच घाई कशाला करायची? उद्धव ठाकरे यांना सरकार 80 दिवस नाही, तर सरळ पाच वर्षे चालवायचे आहे. ते नक्कीच चालेल.

आपली प्रतिक्रिया द्या