सामना अग्रलेख – महानाट्य!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे नटवर्य प्रशांत दामले यांच्या एका नाट्य प्रयोगासाठी गेले. त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या नाटकाचे काय घेऊन बसलात? आम्ही महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत.’’ मुख्यमंत्री बरोबर बोलले. त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या नटमंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे. या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल. रंग तसेच दिसत आहेत!

अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही. या अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या सुविद्य कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली. अब्दुल सत्तार हे मिंधे गटाचे जाणते सरदार असून त्यांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषी मंत्रीपदाची झुल टाकली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीची अवस्था दारुण आहे. अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हा माणूस आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अशांवर बेताल वक्तव्य करीत सुटला आहे. सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तार यांनी ज्या शिवराळ भाषेचा वापर केला तो सर्व प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस काळिमा फासणारा आहे. सुप्रियांवर सत्तारांचे बेताल वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले. त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील सरकारी बंगल्याची तोडफोड केली. हा बंगला मंत्रालयासमोर आहे. सत्तार यांच्या संभाजीनगर येथील घरावरही लोकांनी दगड मारले. राज्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यांचे पुतळे जाळून, पुतळय़ास जोडे मारून लोक आपला संताप व्यक्त करीत आहेत. सवित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ अशा महान स्त्रीयांचा वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे.

महिलांना सन्मान व हक्क

मिळावेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांची कन्या व भारतीय संसदेची सदस्या सुप्रिया यांच्याविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही? अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्याने महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पडली असताना त्याच अब्दुल्लांच्या गळय़ात गळा घालून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सिल्लोड येथे मिरवत होते. ‘‘सत्तार यांनी काय घाण शब्द वापरून महिलांचा अपमान केला, हे आपणास माहीत नाही.’’ अशा काखा वर करून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सिल्लोडला त्याच सत्तारांचा पाहुणचार घेत रमले. महाराष्ट्रावर कोणत्या हैवानांचे राज्य आले आहे ते यावरून दिसते. सत्तार यांना एक क्षणही मंत्रिमंडळात ठेवू नये असा हा सर्व प्रकार आहे. सुप्रिया सुळे या शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात असे काय म्हणाल्या की, ज्यामुळे सत्तारांनी सौ. सुळे यांना शिवीगाळ करावी? ‘महाराष्ट्रातील काही आमदारांनी पन्नास पन्नास खोके घेतल्याचे बोलले जाते व एकाही आमदाराने ‘आम्ही खोके घेतले नाही,’ असे समोर येऊन सांगितलेले नाही. याचा लोकांनी काय अर्थ घ्यावा?’ अशा प्रकारचे विधान सौभाग्यवती सुळे यांनी केल्याने सत्तार यांच्या धोतरास आग लागण्याचे कारण नव्हते. सत्तार यांनी एकप्रकारे आमदारांवरील आरोप मान्य केला. सत्तार उलट म्हणाले, ‘‘सुप्रियाताईंना हवे असतील तर त्यांनाही खोके देऊ.’’ म्हणजे सत्तार यांच्या टोपीखाली खोके आहेत. दुसरे असे की, सत्तार यांनी सौ. सुळे यांच्यावर घसरायचे कारण नाही. भाजप-मिंधे सरकारातील आमदारच खोक्यांवर उघडपणे बोलतात. अमरावतीचे आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद पेटला तो खोक्यांच्या देण्या-घेण्यावरून. सत्तार तेव्हा तोंडात बोळा कोंबून का बसले? महाराष्ट्रात सर्वत्र खोक्यांवरच गरमागरम चर्चा आहे. मराठवाड्यात ती जरा जास्त आहे. सुप्रियाताईंच्या तोंडून शिर्डीत

सत्य बाहेर पडले

सत्तारांची टोपी उडाली ते बरेच झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय लायकीचे लोक भरले आहेत ते यामुळे दिसले. जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने ‘नटी’ म्हणून केला. ‘नटी’ हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे नटवर्य प्रशांत दामले यांच्या एका नाट्य प्रयोगासाठी गेले. त्या वेळी त्यांच्यासोबत इतर दोन ‘नटसम्राट’ होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या नाटकाचे काय घेऊन बसलात? आम्ही महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत.’’ मुख्यमंत्री बरोबर बोलले. त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या ‘नट’ मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. तिकडे रवींद्र चव्हाण हे मिंधे मंत्रिमंडळातील एक मंत्री भायखळा पोलीस स्टेशनात जाऊन एका बलात्कारी गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा राजीनामाच घ्यायला हवा. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे. महिलांचा सन्मान नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीची कदर नाही. महानाट्यवाल्यांचे सरकार सर्वत्र ‘तिसरा’ अंक करीत धिंगाणा घालीत सुटले आहे. या धिंगाण्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कमरेचे सुटले, पण देवेंद्र फडणवीस यांचा अगतिक धृतराष्ट्र का झाला आहे? चित्रा वाघ यांनी संजय राठोड या मंत्र्याविरुद्ध फोडलेली डरकाळी तरी त्यांच्या कानावर जाऊ द्या. सत्तार, राठोड, गुलाब पाटील, रवींद्र चव्हाण या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल. रंग तसेच दिसत आहेत!