आजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या? हसा आणि हसवा!

255

महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासातील स्वाभिमान आणि शौर्याची अनेक सोनेरी पाने अलिबागकरांनी लिहिली आहेत. अलिबागमध्ये तुम्हाला कुणी रडताना दिसणार नाही. हे अलिबागचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अलिबाग से आया क्या रे?’ हा वाक्प्रचार आनंदाने स्वीकारायला हवाविनोद हा माणसाचा विरंगुळा आहे, आधार आहे. विनोदाकडे मानवजातीने कृतज्ञतेने पाहायला हवे. लोकांना रडवायला वेळ लागत नाही, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे कठीण आहे. तेव्हा न्यायालय म्हणतेय तेच खरे, ‘‘विनोदाचा आनंद घ्या, मजा करा, हसत रहा! हसा आणि हसवा!’’ अलिबागकरांनो, न्यायालयाचे ऐका!

आपल्याकडे कधी कोणत्या मुद्दय़ावरून वाद पेटेल व  मानापमानाचे नाट्य रंगेल ते सांगता येत नाही. ‘‘अलिबागहून आला आहेस का रे?’’ यावरून सिनेमात व समाजात विनोद केले जातात. हे अलिबागकरांसाठी अपमानास्पद असल्याची एक याचिका हायकोर्टात दाखल झाली व हायकोर्टाने ती फेटाळली आहे. विनोद हे सगळ्याच समुदायांवर केले जातात. त्यामुळे ते अपमानास्पद वाटून न घेता त्याचा मनसोक्त आनंद लुटा, त्यावर खळखळून हसा असा सल्ला हायकोर्टाने समस्त अलिबागकरांना दिला आहे. आम्ही हायकोर्टाच्या मताशी सहमत आहोत. ‘‘अलिबागहून आला आहेस काय?’’ यावर इतके वाईट वाटून घ्यायचे कारण काय? महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील स्वाभिमान आणि शौर्याची अनेक सोनेरी पाने अलिबागकरांनी लिहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून ‘किल्ले रायगड’ वसवला तो अलिबागचाच परिसर. या परिसरात शूर, स्वाभिमानी व जिवास जीव देणारी माणसं मातीच्या कणाकणात सापडतील. तो महाराष्ट्राचा अनमोल ठेवाच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा भाग पावन झालाच आहे, पण महाराजांचे सेनापती नेताजी पालकरही अलिबागच्याच मातीतले. पंजाबच्या सुवर्ण मंदिरात रणगाडे घुसवून स्वतः बेडरपणे भिंद्रनवाल्यास सामोरे गेलेले, खलिस्तानी आतंकवाद्यांचा साफ खात्मा करणारे व त्यासाठी हौतात्म्य पत्करणारे जनरल अरुणकुमार वैद्य हे अलिबागचेच हे किती जणांना माहीत आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, मुंबईच्या गोळीबारात 105 मराठी हुतात्मे झाले तेव्हा मोरारजी देसाई व पंडित

नेहरूंचा निषेध करण्याची

हिंमत कुणात नव्हती. अशा वेळी महाराष्ट्राच्या भूमीवर एकच  वीर महाराष्ट्राच्या मातीस व मिठास जागला. चिंतामणराव देशमुख हे नेहरूंच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यांनी मुंबईतील गोळीबाराचा निषेध म्हणून केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा नेहरूंच्या तोंडावर फेकला. भर संसदेत त्यांनी नेहरूंना सुनावले, ‘‘तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे!’’ देशमुखांच्या राजीनाम्याने संयुक्त महाराष्ट्र लढा पेटला. हे चिंतामणराव देशमुखही अलिबाग परिसरातील रोह्याचेच. देशात व महाराष्ट्रात अनेक तालेवार नेते होते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र! पण त्याग व शौर्य दाखवले ते अलिबागच्या चिंतामणराव देशमुखांनी. लोक साधी सरपंचाची खुर्ची सोडायला तयार नसतात. चिंतामणराव देशमुखांनी केंद्रीय अर्थमंत्रीपद सोडले. अलिबाग ही कष्टकऱ्यांची खाण आहे. शेतकरी व कामगारांचे अनेक लढे रायगडच्या भूमीतून सुरू झाले. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, बॅ. अंतुले असे एकापेक्षा एक सरस लढवय्ये अलिबागने दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्यांचे आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवले. अलिबागच्या समुद्रातले किल्ले, नारळी, पोफळीच्या बागा, आंबे, फणस, कलिंगडे, भातशेती, मासे, समुद्र किनारे यामुळे अलिबाग हे गोव्याप्रमाणेच पर्यटनाची उलाढाल करणारे ‘मिनी गोवा’ बनले ते काय तेथील लोक मूर्ख आहेत म्हणून? चवदार ‘खाणे-पिणे’ व आदरातिथ्य यासाठी अलिबाग प्रख्यात आहे. थळ खत प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अलिबागकरांच्याच त्यागातून व कष्टातून उभा राहिला. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘वारे व लाटा’ याविरोधात अलिबागकरांनी आपले

स्वतंत्र विचारांचे निशाण

फडकत ठेवले. अलिबागमध्ये तुम्हाला कुणी भीक मागताना दिसणार नाही, रडताना दिसणार नाही. हे अलिबागचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ‘अलिबाग से आया क्या रे?’ हा वाक्प्रचार आनंदाने स्वीकारायला हवा. ‘बारामती’च्या करामती पन्नास वर्षे गाजत आहेत. पुणेकरांवरील दुपारच्या झोपेपासून ते त्यांच्या विक्षिप्त वागण्याच्या विनोदांवर अनेक पिढ्या पोसल्या आहेत. ज्या मातीत पेहेलवानकी रुजली, तो कोल्हापूरही स्वतःवर विनोद करतो, पण शाहू महाराज व रांगडेपण हीच कोल्हापूरची ओळख आहे. नागपूरवर विनोद होतात. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधींवर विनोद होतात. तसे या निवडणुकीत मोदी-शहांवरही झाले. लालू यादव यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर नकलाकारांनी विनोद केले व लालूंनी त्यास दाद दिली. शिखांवर काय कमी विनोद झाले? सरदारजींचे विनोद काही असले तरी शिखांचे शौर्य देशाच्या सुरक्षेची कवचकुंडले आहेत. अशा शिखांच्या विनोदाला काहीच आगापिछा नाही. उदाहरणार्थ, एक शीख आपल्या मित्राला सांगू लागला की, ‘‘मी रेल्वे कंपनीला आज मस्त फसवले.’’ मित्राने विचारले ‘‘कसे?’’ तेव्हा शीख म्हणाला, ‘‘मी लाहोरचं रिटर्न तिकीट काढलं आणि लाहोरला मुळी गेलोच नाही.’’ हे असे विनोद वर्षानुवर्षे  सुरू आहेत, पण मनमोहन सिंग यांनी सर्व विनोद सहन करीत देशाचे नेतृत्व दहा वर्षे केले, आर्थिक दलदलीतून देशाला बाहेर काढले. विनोद हा माणसाचा विरंगुळा आहे, आधार आहे. विनोदाकडे मानवजातीने कृतज्ञतेने पाहायला हवे. लोकांना रडवायला वेळ लागत नाही, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे कठीण आहे. तेव्हा न्यायालय म्हणतेय तेच खरे, ‘‘विनोदाचा आनंद घ्या, मजा करा, हसत रहा! हसा आणि हसवा!’’ अलिबागकरांनो, न्यायालयाचे ऐका!

आपली प्रतिक्रिया द्या