सामना अग्रलेख – विनम्र प्रेसिडेंट, प्रगल्भ संबोधन!

अमेरिकन जनतेने वाचाळ, उर्मट, बेताल आणि देश तोडणाऱ्या ट्रम्प यांना सत्तेतून बेदखल केले. महासत्तेचा राज्यशकट व मुकुट आता विनम्र, संयमी, परिपक्व आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या शिरावर आला आहे. प्रे. जो बायडेन यांच्या पहिल्याच भाषणात याची चुणूक दिसली. चीनसारखा बलाढय़ शत्रू ऊठसूट हिंदुस्थानची खुसपटे काढत असताना अमेरिकेसारख्या सामर्थ्यवान मित्राला आणि प्रे. जो बायडेन यांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात!

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेत लोकशाहीची पुनर्स्थापना झाली आहे. लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारे मावळते राष्ट्राध्यक्ष बोऱ्याबिस्तर गुंडाळून व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले आहेत आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधी समारंभानंतर प्रेसिडेंट बायडेन यांनी जे भाषण केले त्याची जगभर वाहवा होत आहे. जागतिक महासत्तेच्या प्रमुखाच्या तोंडी शोभेल असेच ते भाषण होते. छोटेखानीच, पण ट्रम्प यांनी मोडून तोडून ठेवलेल्या संपूर्ण अमेरिकेला कवेत घेणारे ते संबोधन होते. प्रे. बायडेन यांच्या प्रत्येक वाक्यातून एक जबाबदार राष्ट्रप्रमुख डोकावत होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीत लोकशाही आणि घटनेची यथेच्छ पायमल्ली झाली. त्यामुळेच ट्रम्प अमेरिकन जनतेच्या मनातून साफ उतरले होते. कसेही करून निवडणूक जिंकण्याची ट्रम्प यांची सर्व कारस्थाने धुळीला मिळाली. अगदी मित्रवर्य नरेंद्र मोदींचा ‘केम छो…’ इव्हेंटही ट्रम्प यांची बुडती नौका वाचवू शकला नाही. पुरता ‘निकाल’ लागल्यानंतरही ट्रम्प यांनी केलेले चिथावणीखोर भाषण आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी गोळीबार करत ‘कॅपिटल हिल’वर घडवलेला हिंसाचार यामुळे तर ‘सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र’ अशी बिरुदावली अभिमानाने मिरविणाऱ्या अमेरिकेची जगभर छी थू झाली. अमेरिकेची हीच शरमेने झुकलेली मान पुन्हा एकदा ताठ करण्याचा प्रयत्न नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्याच भाषणात केला. भाषणाच्या सुरुवातीलाच बायडेन यांनी

लोकशाहीचा गजर

केला तो सूचक आहे. ‘आजचा दिवस लोकशाहीचा आहे. आम्हाला संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करावेच लागेल’, असे प्रे. बायडेन यांनी ठणकावून सांगितले. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अमेरिकेत दुहीची बिजे पेरून वर्णविद्वेषाचा आधार घेत फोडा, झोडा आणि राज्य करा असे तंत्र ट्रम्प महाशयांनी राबविले होते. अध्यक्षीय भाषणात प्रे. बायडेन यांनी त्यालाही छेद दिला. अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे अमेरिकेतील जनतेची मने दुभंगली आहेत. ती मने सांधण्याचा आणि एका विशिष्ट वर्गसमूहाचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकन नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मी प्रयत्न करेन, असे आश्वासन बायडेन यांनी दिले. त्यावर झालेला टाळय़ांचा गजर बोलका होता. ज्यांनी मला किंवा माझ्या पक्षाला मतदान केले नाही त्यांचाही मी प्रेसिडेंट असेन, असा शब्द देणाऱ्या बायडेन यांचे कौतुक का होऊ नये? किती ही विन्रमता! सदैव मी… मी… म्हणून राज्य करणाऱ्या जगभरातील तमाम राष्ट्रप्रमुखांनी अशी नम्रता अंगी बाणवली तरच ती लोकशाही म्हणायची. मी कोणीतरी तीसमारखाँ आहे, मी एकटाच सगळी अमेरिका व सारे जग बदलून टाकेन, असा तोरा ट्रम्प महाशय कायम मिरवत राहिले. नव्या राष्ट्राध्यक्षांनी मात्र सर्वांना सोबत घेऊन अमेरिकेचे ऐक्य साधण्याचा निर्धार व्यक्त केला. केवळ देशातच नव्हे, तर जागतिक राजकारणाचे नेतृत्व करण्यासाठीदेखील बलप्रयोग करणार नाही, असे बायडेन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दुखावलेल्या मित्रांच्या आघाडय़ा पुन्हा बांधू आणि

सर्वांचा विकास व सर्वांचे संरक्षण

करू, असा शब्द प्रे. बायडेन यांनी दिला. अर्थात, जगभरात नाके खुपसून फौजदारकी करण्याचे अमेरिकेचे पारंपरिक परराष्ट्र धोरण बायडेन सपशेल मोडीत काढतील, असे समजणे मात्र धारिष्टय़ाचे ठरेल. सत्तेची सूत्रे स्वीकारता क्षणी बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक वादग्रस्त निर्णय रद्द केले. हवामान बदलविषयक पॅरिस करारातून आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचे निर्णय तडकाफडकी मागे घेतले. मुस्लिम देशांवरील निर्बंध मागे घेतानाच मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्दबातल केला. कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी मास्क बंधनकारक करून सामान्य जनतेला मोठय़ा प्रमाणावर मदत करण्याची घोषणा बायडेन यांनी केली. कोरोनामुळे अमेरिकेत गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सुमारे 4 लाख नागरिक मृत्युमुखी पडले. उद्योगधंदे बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले. अमेरिकेसाठी एकूणच हा सगळा परीक्षेचा काळ आहे, मात्र या परीक्षेत आपण यशस्वी होऊ, असा आशावाद प्रे. बायडेन यांनी पहिल्या भाषणात व्यक्त केला. तो खरा ठरावा. अमेरिकन जनतेने वाचाळ, उर्मट, बेताल आणि देश तोडणाऱ्या ट्रम्प यांना सत्तेतून बेदखल केले. महासत्तेचा राज्यशकट व मुकुट आता विनम्र, संयमी, परिपक्व आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या शिरावर आला आहे. प्रे. जो बायडेन यांच्या पहिल्याच भाषणात याची चुणूक दिसली. चीनसारखा बलाढय़ शत्रू ऊठसूट हिंदुस्थानची खुसपटे काढत असताना अमेरिकेसारख्या सामर्थ्यवान मित्राला आणि प्रे. जो बायडेन यांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात!

आपली प्रतिक्रिया द्या