सामना अग्रलेख – ट्रम्प यांची ‘हवा’हवाई!

डोनाल्ड ट्रम्प हे उथळ बोलण्यासाठी आणि अजब तर्कट मांडण्यासाठीच ‘प्रसिद्ध’ आहेत. त्यामुळे कधी स्वतःच्या कोरोनावरून तर कधी मुलाच्या कोरोनावरून मजेशीर विधाने करीत आहेत. पराभव झाला तर सहजासहजी सत्ता न सोडण्याच्या उघड धमक्या देत आहेत. गेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या रशियाने ट्रम्प यांना मदत केल्याचा आरोप झाला त्याच रशियाला ‘विषारी वायूचा देश’ म्हणून संबोधत आहेत. ‘मित्र’ असलेल्या हिंदुस्थानलाही त्याच तागडीत तोलत आहेत. अमेरिकेची हवा खराबच असल्याचे ‘सत्य’ टोपलीखाली झाकायचे आणि हिंदुस्थानसह रशिया, चीन यांच्या खराब हवेची ‘बांग’ द्यायची! डोनाल्ड ट्रम्प यांची ही ‘हवा’हवाई राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची ‘हवा’ किती बदलते हे निकालानंतर दिसेलच!

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची ‘हवा’ चांगलीच तापली आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळ्या वेगवेगळ्यामुद्द्यांचा धुरळा उडवला जात आहे. त्यातही अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अनेक वादग्रस्त आणि मजेशीर विधानांचे ‘फुगे’ हवेत सोडत आहेत. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा ‘इव्हेंट’ केला. नऊच दिवसांत ते व्हाइट हाऊसमधून प्रचारासाठी बाहेर पडले. आता त्यावरही कडी करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांचा 14 वर्षीय मुलगा बॅरन याने कोरोनावर 15 मिनिटांत मात केली, असे ट्रम्प म्हणाले. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हा फुगा सोडला. ते म्हणाले, ‘बॅरन याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांना यांच्या तब्येतीविषयी विचारले असता त्यांनी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असे सांगितले. 15 मिनिटांनी मी जेव्हा त्यांना पुन्हा विचारले तेव्हा डॉक्टरांनी कोरोना निघून गेला असे सांगितले.’ ट्रम्प महाशय हे गंभीरपणे बोलले की प्रचाराची ‘हवा’ हलकी करण्यासाठी बोलले हे त्यांचे त्यांनाच माहिती, पण त्यामुळे ट्रम्प यांच्या नेहमीच्या ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या

स्वभावाचे प्रत्यंतर

आले. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष स्वतःच्या प्रचारसभेत अशी बडबड करतो हे तेथील जनतेला किती रुचले हे निकालानंतरच समजेल. अर्थात ट्रम्प आणि उथळपणा हे समीकरण नवीन नाही. त्यांच्या वाट्टेल ते बोलण्याचे किस्से अनेक आहेत. आदल्या दिवशी हिंदुस्थानचे कौतुक करणारे ट्रम्प दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानवर घसरलेले अनेकदा दिसले आहेत. दोनच दिवसांपूर्वी ‘हिंदुस्थान हा विषारी हवा सोडणारा देश आहे’ अशी टीका या महाशयांनी केली होती. एकीकडे ‘हाऊडी मोदी’सारखे इव्हेंट करून अमेरिकेतील हिंदुस्थानी मतदारांना चुचकारायचे, पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा हवाला द्यायचा आणि दुसरीकडे हिंदुस्थानची विषारी हवा पसरविणारा देश म्हणून संभावना करायची. हे तिरपागडे उद्योग ट्रम्पच करू शकतात. पुन्हा हिंदुस्थान, चीन आणि रशियाकडे विषारी हवेचे देश म्हणून बोट दाखविणारे ट्रम्प स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते पाहत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्याच पर्यावरण विभागाने ट्रम्प यांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. गेल्या वर्षी जो ‘एमिशन गॅप रिपोर्ट’ प्रसिद्ध झाला त्यात अमेरिकेच्या हवेचे ‘सत्य’ आणि ट्रम्प महाशयांचे ‘असत्य’ ढळढळीतपणे समोर आले होते. या अहवालानुसार आधीही आणि आतादेखील अमेरिका ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनाबाबत

पहिल्या क्रमांकावर

आहे. म्हणजे जे स्वतःच्या देशाची हवा शुद्ध करू शकले नाहीत, जे ‘पॅरिस करारा’मधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहेत ते हिंदुस्थानच्या हवेबाबत बोलत आहेत. निवडणूक प्रचारात अनेकदा अशा गोष्टी होत असल्या तरी यातून ट्रम्प यांची वाचाळकीच पुन्हा दिसली. अर्थात ट्रम्प काय किंवा पूर्वीचे इतर अमेरिकन राज्यकर्ते काय, सगळय़ांचे धोरण ‘माझा तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे’ असेच राहिले आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प हे उथळ बोलण्यासाठी आणि अजब तर्कट मांडण्यासाठीच ‘प्रसिद्ध’ आहेत. त्यामुळे कधी स्वतःच्या कोरोनावरून तर कधी मुलाच्या कोरोनावरून मजेशीर विधाने करीत आहेत. पराभव झाला तर सहजासहजी सत्ता न सोडण्याच्या उघड धमक्या देत आहेत. गेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या रशियाने ट्रम्प यांना मदत केल्याचा आरोप झाला त्याच रशियाला ‘विषारी वायूचा देश’ म्हणून संबोधत आहेत. ‘मित्र’ असलेल्या हिंदुस्थानलाही त्याच तागडीत तोलत आहेत. अमेरिकेची हवा खराबच असल्याचे ‘सत्य’ टोपलीखाली झाकायचे आणि हिंदुस्थानसह रशिया, चीन यांच्या खराब हवेची ‘बांग’ द्यायची! डोनाल्ड ट्रम्प यांची ही ‘हवा’हवाई राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची ‘हवा’ किती बदलते हे निकालानंतर दिसेलच!

आपली प्रतिक्रिया द्या