सामना अग्रलेख – वास्तव आणि विसंगती

चिनी सैनिक सीमेवरून हटतच नाहीत, असे खुद्द लष्करप्रमुखांनाच सांगण्याची वेळ का आली? कारण सरकार कितीही सांगत असले तरी सीमेवरील चिनी सैन्याने माघार घेतलेली नाही हेच वास्तवआहे. प्रश्न इतकाच आहे की, लष्करप्रमुखांनी सांगितलेले सत्यआणि त्याच वेळी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेला जशास तसेउत्तर देण्याचा इशारा यांची संगती लावायची कशी? चिनी सीमेवरील वास्तवआणि सरकारचे कारवाईचे इशारेनगारे आतापर्यंत कधीच सुसंगत राहिलेले नाहीत, त्याचाच हा परिणाम आहे. कबुलीतील वास्तवआणि इशाऱ्यांतील विसंगतीदेशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच घातक ठरली आहे. सीमेवर आपले सैन्य कणखरपणे लढतच आहे, तोच कणखरपणा सरकारच्या धोरणातही यायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही!

हिंदुस्थानकडे कोणी वाकडय़ा नजरेने बघितले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. त्याच वेळी सीमेवरून चिनी सैन्य हटायलाच तयार नाही. त्यामुळे हिंदुस्थान-चीन सीमेवर तणाव वाढू शकतो, अशी कबुली लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुख यांनी एकाच वेळी केलेली ही विधाने आहेत. ती परस्परांना छेद देणारी आहेत. संरक्षण मंत्री एकीकडे देशाची खोडी काढणाऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत त्याच वेळी सीमेवरील सैन्यसंख्या चीन कमी करीत नसून बांधकामे करण्याचे उद्योगही चीनने थांबविलेले नाहीत, अशी धोक्याची जाणीव लष्करप्रमुख करून देत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी सीमेवरही घुसखोरी वाढली आहे, असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी दिला आहे. म्हणजे चिनी सीमा काय पिंवा पाकिस्तानी सीमा काय, दोन्ही ठिकाणी परिस्थिती ‘शांत, पण तणावपूर्ण’ आहे. लष्करप्रमुख आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक या दोघांनी दिलेल्या इशाऱ्याचा अर्थ तोच आहे. चीन आणि पाकिस्तान या दोघांच्याही हिंदुस्थानविरोधी कुरापती नेहमीच्याच आहेत. त्या कायमच सुरू असतात. त्यामुळे आताही त्या सुरू असतील तर त्यात अनपेक्षित काहीच नाही. प्रश्न इतकाच आहे की, सर्जिकल स्ट्राइकचा शंखध्वनी करणारे आणि स्वतःला

शक्तिमानवगैरे

म्हणवून घेणारे सत्तेत असतानाही हे का घडत आहे? कश्मीर प्रश्न असो की चीनसोबतचा सीमावाद, पाकिस्तानशी संबंध असोत की बांगलादेशशी… प्रत्येक गोष्टीचे खापर पं. नेहरूंवर, आधीच्या काँग्रेस राजवटींवर पह्डण्याचा एककलमी कार्यक्रम गेल्या सात-आठ वर्षांत सुरू आहे; पण आता तर मागील आठ वर्षे तुमचीच एकहाती सत्ता पेंद्रात आहे ना? मग तरीही चिनी ड्रगन तुमच्या आटोक्यात का येऊ शकलेला नाही? पाकिस्तानच्या सीमांवरील घुसखोरी, पाकपुरस्कृत दहशतवाद यांना आळा का घातला गेलेला नाही? आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केले, चिन्यांना गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत ‘न भूतो’ धडा शिकविला, कधी नव्हे ते चिनी माकडांची त्यामुळे पाचावर धारण बसली, 370 कलम हटविले गेले या सर्व गोष्टी आहेतच. पण तरीही चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवरील कुरापती सुरूच आहेत, त्याचे काय? ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या गर्जना केल्या जात असल्या तरी त्याचा नेमका किती परिणाम चीन आणि पाकिस्तानवर झाला आहे, हा प्रश्नच आहे. चीन हा तर आपला अत्यंत बलाढय़ शत्रू आहे. मधल्या काळात त्यांनी सैन्य माघारी करण्यास मान्यता देत काही पावले मागे घेतली. मात्र चिनी सैनिकांची संख्या कमी झालेली नाही, असे आज खुद्द आपले लष्करप्रमुख सांगत असतील तर मग

चीनविरोधातील कणखर

वगैरे सरकारी धोरणाचा नेमका फायदा काय झाला, हा प्रश्न उरतोच. एकीकडे कमांडर स्तरावरील बैठकांचे गुऱहाळ चालू ठेवायचे आणि दुसरीकडे हिंदुस्थानी सीमांवर सैन्याची जमवाजमव कायम ठेवायची, बांधकामे थांबवायची नाहीत, हा चिनी कावा नेहमीचाच आहे. लडाखमधील जियानान डाबन क्षेत्रातील चिनी आणि हिंदुस्थानी सैन्य नियोजनबद्धरीत्या मागे घेण्यात येत असून हा हिंदुस्थानच्या मुत्सद्देगिरीचा विजय वगैरे आहे, असे ढोल दोनच महिन्यांपूर्वी सरकार पक्षाकडून पिटले गेले होते. मग आता चिनी सैनिक सीमेवरून हटतच नाहीत, असे खुद्द लष्करप्रमुखांनाच सांगण्याची वेळ का आली? कारण सरकार कितीही सांगत असले तरी सीमेवरील चिनी सैन्याने माघार घेतलेली नाही हेच ‘वास्तव’ आहे. प्रश्न इतकाच आहे की, लष्करप्रमुखांनी सांगितलेले ‘सत्य’ आणि त्याच वेळी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा यांची संगती लावायची कशी? जर तुमचा इशारा जोरदार, दमदार आहे तर ठरल्याप्रमाणे चीनने सीमेवरील त्यांचे सैनिक मागे घ्यायला हवे होते. मात्र तसे घडलेले नाही. चिनी सीमेवरील ‘वास्तव’ आणि सरकारचे कारवाईचे इशारे-नगारे आतापर्यंत कधीच सुसंगत राहिलेले नाहीत, त्याचाच हा परिणाम आहे. कबुलीतील ‘वास्तव’ आणि इशाऱ्यांतील ‘विसंगती’ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच घातक ठरली आहे. सीमेवर आपले सैन्य कणखरपणे लढतच आहे, तोच कणखरपणा सरकारच्या धोरणातही यायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही!