सामना अग्रलेख – विठुराया, यंदा समजून घे!

‘वारीशिवाय पुण्य नाही’ ही वारकऱ्यांची श्रद्धा यावेळी केवळ नाइलाजाने पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र लाखो वारकरी, भाविक आज शरीराने नाही, तरी मनाने आणि भावाने पंढरपुरातच असणार आहेत. या मनोभावाला आणि मनोवेगाला कोण रोखू शकणार आहे? विठुराया, भक्तांची ही व्याकुळता आणि मनोपूजा समजून घे. शेकडो वर्षांच्या वारीवर ज्या कोरोनामुळे निर्बंध घालावे लागले ते संकट लवकर दूर कर आणि महाराष्ट्राचे हे ‘आनंदनिधान’ पुन्हा सुरळीत होईल असा आशीर्वाद दे. विठुराया, यंदा मात्र समजून घे!

यावर्षी आपल्या सर्वच महत्त्वाच्या सण-उत्सवांवर कोरोना संकटाचे सावट आहे. आजच्या आषाढी एकादशीचे पंढरपुरातील चित्रदेखील यापेक्षा वेगळे कुठे आहे? दरवर्षी लाखो भक्तांच्या महापुराने गजबजलेली पंढरी आज तशी सुनीसुनीच राहणार आहे. ‘चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ’ असे म्हणत पवित्र स्नान करणाऱया वारकऱ्यांची उणीव आज चंद्रभागेच्या पात्रालाही भासेल. विठ्ठलभक्तांची पावले उमटली नाहीत म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटाला यंदाची आषाढी रखरखीतच वाटेल. ‘भेटी लागी जिवा लागलीसे आस’ असे म्हणणाऱया आणि ‘श्रीमुख दावी देवा’ असे आर्जव विठुरायाला करणाऱया वारकऱ्यांची पावले यंदा पंढरीची वाट चालू शकली नाहीत. ना दिंड्या-पताका नाचल्या, ना रिंगण सोहळे झाले. फक्त मानाच्या नऊ पालख्यांना आज पंढरपुरात प्रवेश मिळेल. तोदेखील कोरोना निर्बंधाचे पालन करीत. एवढे वगळता पंढरपुरात आजच्या आषाढीला बाकी शांत शांत असेल. हे सगळे तसे अवघड असले तरी कोरोना संकटातून लाखो भाविकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी दुसरा पर्याय तरी कुठे होता? वारकरी समुदायानेही ‘मानसवारी’चा मध्यममार्ग निवडून साथ दिली हे महत्त्वाचे. वारी, आषाढी एकादशी आणि त्या दिवशी पंढरपुरात लाखो भाविकांना होणारा

विठ्ठल दर्शनाचा सोहळा

ही महाराष्ट्राची फक्त आध्यात्मिक परंपरा नाही, तर एक आनंद सोहळा आहे. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव…’ असे आर्जव करीत लाखो वारकरी या आनंद सोहळय़ात वर्षानुवर्षे देहभान विसरत सहभागी होत आले आहेत. मात्र यंदा ‘कोरोना’ संकटाचे सावट याही आनंद सोहळय़ावर आले. तथापि सगळय़ांच्या सहकार्याने त्याला कुठले गालबोट लागले नाही हीदेखील विठुरायाचीच कृपा. महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावरच आज कोरोनाचे भयंकर संकट कोसळले आहे. महाराष्ट्रातील लॉक डाऊनचा टप्पा आता 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला असला तरी त्याच वेळी ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याचीही घोषणा राज्य सरकारने केली आहे. तरीही कोरोना संसर्ग आणि प्रादुर्भावाचा धोका कायमच आहे. लॉक डाऊनमुळे मंदावलेले अर्थचक्र गतिमान होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’चा शंखध्वनी केलाच आहे. त्यानुसार अर्थचक्र हळूहळू सुरूही झाले आहे. मात्र अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी कोरोना युद्ध आपल्याला जिंकावे लागणार आहे. ते जिंकण्याची ताकद आणि सामर्थ्य द्यावे

असेच साकडे

आ ज महाराष्ट्रातील जनता पांडुरंगाला घालत आहे. मुंबई वगळता राज्यात बऱयाच भागांत यंदा पर्जन्यराजाने हजेरी लावली आहे. बळीराजा त्यामुळे सुखावला आहे. खरिपाची लगबग सुरू झाली आहे. विठुराया, बळीराजाचा हा आनंद असाच कायम ठेव. वरुणराजाची लहर फिरू देऊ नकोस. देशात कोरोनाचे थैमान आणि सीमेवर चीनचे घमासान या दुहेरी संकटातून मार्ग काढण्याची शक्ती दे. पांडुरंगा, आजच्या आषाढी एकादशीला चंद्रभागेवर आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले नाहीत, पंढरीत विठुनामाचा गजर घुमला नाही, चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून गेले नाही, भजन-कीर्तनाने पंढरीचा परिसर दुमदुमला नाही. भक्तांना दर्शन देण्याची तुझी इच्छा यंदा कोरोनामुळे अपुरी राहिली म्हणून रागावू नकोस. ‘वारीशिवाय पुण्य नाही’ ही वारकऱ्यांची श्रद्धा यावेळी केवळ नाइलाजाने पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र लाखो वारकरी, भाविक आज शरीराने नाही, तरी मनाने आणि भावाने पंढरपुरातच असणार आहेत. या मनोभावाला आणि मनोवेगाला कोण रोखू शकणार आहे? विठुराया, भक्तांची ही व्याकुळता आणि मनोपूजा समजून घे. शेकडो वर्षांच्या वारीवर ज्या कोरोनामुळे निर्बंध घालावे लागले ते संकट लवकर दूर कर आणि महाराष्ट्राचे हे ‘आनंदनिधान’ पुन्हा सुरळीत होईल असा आशीर्वाद दे. विठुराया, यंदा मात्र समजून घे!

आपली प्रतिक्रिया द्या