सामना अग्रलेख – ‘वंचित’ का फुटली?

10188

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरवंचितका फुटली, यावर खल होत आहे. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्याइतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. आता महाराष्ट्र विधानसभेतही वेगळे काय घडणार आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले. ‘या वेळी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाचअसा फटका त्यांनी मारला. चंद्रकांत पाटलांनी निवडणुकांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता जाहीर केला. अजून बाजारात तुरी आहेत. तोवर या गमती जमतीचा आनंद घेत राहू.

निवडणूक आयोगाचे माहीत नाही, पण चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागेल व 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका होतील, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. चंद्रकांतदादा हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वतनदार आहेत व त्यांचे समर्थक त्यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पाहतात. त्यामुळे पाटील जे सांगतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. निवडणुका तर होतीलच व विधानसभा भंग करून नवीन विधानसभा येण्यास संविधानानुसार एक कालमर्यादा असते. त्यामुळे पाटील यांनी जाहीर केलेल्या तारखा ‘गुप्त’ वगैरे नाहीत. सध्या रहस्यमय आणि गोपनीय आहे ते जागावाटप, आघाड्या, वाटाघाटी, पक्षांतरे व त्यानिमित्ताने सुरू असलेल्या बेडूकउड्या. आम्हाला आश्चर्य वाटते ते प्रकाश आंबेडकर व मियाँ ओवेसी यांच्या दोस्तान्यात पडलेल्या मिठाच्या खड्याचे. लोकसभेदरम्यान मियाँ ओवेसी व प्रकाश आंबेडकर हे ‘एक जान हैं हम’ याच थाटात वावरत होते. ओवेसी यांनी तर एका जाहीर सभेत प्रकाशरावांना उचलूनच घेतले होते. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची सळसळ तेव्हा सुसाट सुटली होती. मात्र याच वंचित बहुजन आघाडीत आता उभी फूट पडली आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. प्रकाश आंबेडकर मात्र जोपर्यंत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम आहे, असा खुलासा करीत होते. तथापि आता खुद्द ओवेसी मियाँनीही जलील यांचीच री ओढली आहे. जलील हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्रबाबत

निर्णय घेण्याचा अधिकार

आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल असे ओवेसी म्हणाले आहेत. एकप्रकारे वंचित आणि एमआयएम यांची युती तुटण्यावर त्यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. प्रकाश आंबेडकर हे बुद्धिमान असले तरी हेकेखोर स्वभावामुळे ही आघाडी फार काळ टिकणार नाही असे भाकीत अनेकांनी केले होते. ते इतक्या लवकर खरे ठरेल असे वाटले नव्हते. लोकसभेत ‘वंचित’ने काँग्रेस-राष्ट्रवादीस जोरदार धक्का दिला, पण विधानसभा निवडणुकीआधी एमआयएम आणि आंबेडकर यांच्या वंचितमध्ये बेबनाव झाला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले, ‘‘आर.एस.एस.वाले आंबेडकरांचे कान भरत आहेत. त्यामुळेच आंबेडकर एमआयएमला झुलवत ठेवत आहेत.’’ जलील यांचे म्हणणे सत्य असेल तर प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची ‘वाजवणार’ हा प्रश्न निर्माण होतोच. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे भाजप-शिवसेनेस मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला. त्या आरोपात भंपकपणाच होता. ‘वंचित’ने काही मतदारसंघांत बऱ्यापैकी मते घेतली, पण मुसलमान समाजाची एकगठ्ठा मते वंचितकडे वळली नाहीत. ती बऱ्याच अंशी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेली. मात्र त्याच वेळी युतीच्या पारड्यातही पडली. त्यामुळे दलित आणि मुसलमानांच्या ‘मतबेरजे’वर राजकारण करता येईल हा भ्रम तेव्हाच तुटला आहे. महाराष्ट्रात एकजातीय किंवा एकधर्मीय राजकारण करता येणार नाही. वंचित आघाडीने ‘बहुजन’ शब्दावर जोर दिला असला तरी त्यास बहुजनांची साथ कितपत राहील? राज्यातील प्रत्येक पक्ष हा

बहुजनांच्या नावावरच बेगमी

करीत आहे. शिवसेनेसारखा पक्ष स्थापनेपासूनच बहुजनांतील सामान्य कार्यकर्त्यांना बळ देत आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू या महान मंडळींनी ‘बहुजनां’चा आवाज बुलंद केला तो काही जातीय विचार नव्हता. मायावती यांच्या पक्षातही ‘बहुजन’ आहे. त्यांचा पक्ष डॉ. आंबेडकरांचा विचार घेऊन जितका उत्तर हिंदुस्थानात वाढला, सत्ताधारी बनला, तितके बहुजनांचे राजकारण महाराष्ट्रात ना मायावतींना जमले, ना प्रकाश आंबेडकर यांना जमले, ना रिपब्लिकन गटातटांना साध्य झाले. रिपब्लिकन ‘गट-तट’ एकत्र येणे तर सोडाच, त्यांनी एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता मानली. वंचितांचे दुःख हे कायम कुणाच्या तरी वळचणीलाच आश्रित म्हणून पडून राहिले. म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांचा ‘स्वबळावर एकला चलो रे’चा नारा महत्त्वाचा वाटतो. ते काँग्रेसच्या वळचणीस गेले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादीस वगळून काँग्रेसलाच 144 जागांची ‘ऑफर’ केली. हा आत्मविश्वास येतो कुठून हे रहस्यच आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘वंचित’ का फुटली, यावर खल होत आहे. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्याइतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. आता महाराष्ट्र विधानसभेतही वेगळे काय घडणार आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले. ‘या वेळी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच’ असा फटका त्यांनी मारला. चंद्रकांत पाटलांनी निवडणुकांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता जाहीर केला. अजून बाजारात तुरी आहेत. तोवर या गमती जमतीचा आनंद घेत राहू.

आपली प्रतिक्रिया द्या