
खासदार गिरीश बापट हे रा. स्व. संघाचे खंदे शिलेदार होते. भाजपचा पुण्यातील ब्राह्मण चेहरा असूनही त्यांचे राजकारण आणि समाजकारण नेहमीच त्या चौकटीबाहेरचे राहिले. त्यांचे वागणे-बोलणे सर्वसमावेशकच राहिले. भाजपचा एक निष्ठावान शिलेदार आणि त्याचवेळी ‘अजातशत्रू’ राजकारणी ही आपली ओळख त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. भाजपच्या सध्याच्या राजकीय प्रतिमेत हे बसणारे नसले तरी सुसंस्कृत पुणेकर आणि तेथील सुसंवादी राजकारणाला त्यांची उणीव कायम भासेल.
अस्सल पुणेकर खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. लोकसभा निवडणूक जिंकून दिल्लीत गेल्यापासून ते आजारीच पडले. त्यांची प्रकृती खालावत गेली. बापट यांच्या प्रसन्न, जिंदादिल चेहऱयावर ऑक्सिजनच्या नळकांडय़ा पाहून त्यांच्या चाहत्यांचे मन गलबलून येत असे. कसब्यातील पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचे विकलांग दर्शन झाले, ते अस्वस्थ करणारे होते. व्हिलचेअरवर बसलेले व नाकात प्राणवायूच्या नळय़ा घातलेल्या बापट यांना भाजपास प्रचारात उतरवावे लागले, पण कसब्यात शेवटी भाजपचा पराभव झाला व आता अनेक वर्षे कसब्याचे विधानसभेत त्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे बापटही गेले. पुण्यात भारतीय जनता पक्ष रुजवण्यात ज्या जुन्याजाणत्या लोकांचा सहभाग होता त्यात बापटांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. पण बापट हे जुन्या वळणाचे भाजपाई होते. आजच्या ढोंगसम्राट भाजपवाल्यांच्या पठडीत बसणारे ते नव्हते. बापट यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव प्रदीर्घ होता. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुण्यातील कसब्यातून ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले व 2019 साली ते लोकसभेवर निवडून गेले. जात-धर्म इतकेच काय तर पक्षविरहित मतदार गिरीश बापट यांना मते टाकत. बापटांकडे नेमकी कोणती यंत्रणा आहे जी कसब्यात दरवेळी यशस्वी ठरते, असा प्रश्न भल्या भल्या राजकीय पंडितांना पडायचा. फक्त भाजपला मानणाऱया मतांवर आपण निवडून येणार नाही, याची पुरेपूर जाणीव बापटांना होती. त्यामुळेच
सगळय़ा जातीधर्माच्या
लोकांबरोबर बापट यांचे चांगले संबंध होते. त्यांचे वैशिष्टय़ असे की, भाजपचा ब्राह्मण चेहरा असूनही समस्त बहुजनांनाही ते आपले वाटत. हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय़ होते. अफाट जनसंपर्क व सर्वसमावेशक भूमिका घेणारे ते नेते होते, पण अनेकदा त्यांच्यातला बेरकी व मुरब्बी राजकारणी ‘पुणेरी’ अस्सलपणाची आठवण करून देई. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. पण त्यांची ओळख भाजपातील उत्तम संघटक अशीच होती. बापट यांचे वागणे, बोलणे हे कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारे होते व शेवटपर्यंत ते तसेच राहिले. बापट यांना पुण्याचे एकूण एक प्रश्न, समस्या माहीत असत. कसब्याचा तर कानाकोपरा ठाऊक होता. कसब्याच्या कुठल्याही कोपऱयातला नागरिक आपला प्रश्न घेऊन गिरीशभाऊंकडे सहज पोहोचू शकत होता. आमदारकी, मंत्रीपदाची झुल पांघरून ते कधीच वावरले नाहीत. बापट पुणेकरांची नस जाणून होते. त्यामुळेच ते अधूनमधुन पुणेकरांनाही चिमटे काढत. तळेगाव-दाभाडेसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या बापटांचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि बीएमसीसी महाविद्यालयात झाले. त्यानंतर टेल्को कंपनीत ते नोकरी करू लागले. कामगारांचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेता घेता गिरीशभाऊ राजकारणात आले. आणीबाणीच्या काळात बापटांना एकोणीस महिने तुरुंगवासही भोगावा लागला. नाशिक जेलमधून सुटका झाल्यानंतर खऱया अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते
पुणे महानगरपालिकेत
नगरसेवक झाले. ते अगदी सलग तीन वेळा निवडून आले. पालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायीचे अध्यक्षपद मिळविण्याचे कसब बापट यांनी त्यावेळी दाखविले होते. बापट म्हणजे सर्वपक्षीय संपर्क, मैत्री कशी असते याचे मूर्तिमंत उदाहरण. बापट यांना पुण्यातल्या राजकारणातील मैत्रीचा ‘चौक’ हे संबोधन अत्यंत चपखलपणे बसत होते. सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते या ‘चौका’तून आवर्जून जात-येत असत. बापट यांच्या वागण्यातील सहजता समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेत असे. अर्थात, त्यांनाही प्रतिस्पधी पक्षातील नेत्यांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांशीच अधिक संघर्ष करावा लागला. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या बापटांना खरे तर दिल्लीत आधीच जायचे होते. परंतु ‘परिवारा’चा रोष त्यांना आडवा आला. पण हरतील ते बापट कसले? बापटांनी पहिल्याच दमात खासदारकी जिंकली. परंतु प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. तरीही खासदार म्हणून बापटांनी आपल्या कामाची छाप पुणेकरांवर सोडली. खासदार गिरीश बापट हे रा. स्व. संघाचे खंदे शिलेदार होते. भाजपचा पुण्यातील ब्राह्मण चेहरा असूनही त्यांचे राजकारण आणि समाजकारण नेहमीच त्या चौकटीबाहेरचे राहिले. त्यांचे वागणे-बोलणे सर्वसमावेशकच राहिले. भाजपचा एक निष्ठावान शिलेदार आणि त्याचवेळी ‘अजातशत्रू’ राजकारणी ही आपली ओळख त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. भाजपच्या सध्याच्या राजकीय प्रतिमेत हे बसणारे नसले तरी सुसंस्कृत पुणेकर आणि तेथील सुसंवादी राजकारणाला त्यांची उणीव कायम भासेल.