सामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा

20042

इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपवाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी. ही पंतप्रधान मोदींची तर बदनामी आहेच, पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या वैचारिक वारशालाही धक्का देणारे हे वर्तन आहे. प्रे. ट्रम्प हे तर मोदींचे पक्के चाहते आहेत. त्यांनी मोदींचे लांगुनचालनच केले, पण तरीही अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडविला आहे. न्यूयॉर्कसारखे शहर मृतवत झाले आहे. सांगलीतील इस्लामपूर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना कोणी शिक्षा दिली, याचा कोणी खुलासा करेल काय? 

देशभरात कोरोनाचा हैदोस सुरू असताना राजकारणी लोक तोंडास येईल ते बोलत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पंचवीसच्यावर कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्याचे खापर भाजप प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांवर फोडले आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी उशिरा केलेल्या `लॉक डाऊन’संदर्भात मोदींवर टीका केल्याची शिक्षा म्हणूनच इस्लामपुरात कोरोनाचे रुग्ण वाढले असे भाजपचे सांगणे आहे. जयंतरावांचे असे म्हणणे होते की, देशभरातला `लॉक डाऊन’ आधीच जाहीर करायला हवा होता. रात्री 8 वाजता जाहीर करायला `लॉक डाऊन’ म्हणजे नोटाबंदी नव्हे, असे जयंत पाटील म्हणाले होते. अर्थात, जयंत पाटील हे फक्त राज्याचे मंत्री नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडले. यावर भाजपला इतक्या

मिरच्या झोंबायचे

कारण काय? म्हणजे ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यांमध्ये कोरोना घुसू द्या व बळी जाऊ द्या असे भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावे. मोदींवर टीका करण्याची शिक्षा मृत्युदंडाच्या रूपाने मिळावी असेही बहुधा त्यांचे म्हणणे असावे. देशातील वातावरण काय आहे आणि हे लोक काय पद्धतीने अकलेचे तारे तोडत आहेत? मोदी हे विष्णूचे तेरावे की चौदावे अवतार आहेत अशा प्रकारची मुक्ताफळे उधळणाऱ्यांनीच महाराष्ट्राला हा कोरोनाचा शाप दिला आहे, असे उद्या कोणी म्हटले तर? इस्लामपुरातील कोरोना संक्रमणाची कारणे समोर आली आहेत. हज यात्रेला गेलेले तीन-चार लोक इस्लामपुरातील आपल्या घरी पोचले व हे लोक तीर्थयात्रेवरून परतले म्हणून त्यांच्या आगत-स्वागताचे, गळाभेटीचे कार्यक्रम पार पडले. त्यातून कोरोनाने इस्लामपूरला विळखा घातला हे सत्य आहे. काल दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या 29 रुग्णांची भर पडली. दिल्लीत तर मोदींवर कोणीच टीका केली नव्हती. फडणवीस-गडकरींच्या नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 वर गेला आहे. त्या शहरातही कोणी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचे दिसत नाही. उलट उत्तर प्रदेश, भोपाळ, गुरगावात भाजपचे राज्य आहे आणि तेथे रोजच कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. मोदींवर टीका न करणाऱ्या राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वाढत असतील तर तो

मोदींच्या ‘देवत्वा’चा पराभव

आहे, हे इस्लामपूरवाल्यांना समजले पाहिजे. पंतप्रधान मोदी व त्यांची टीम कोरोनाशी लढा देत आहे. संपूर्ण देश या लढ्यात मोदींच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनीही मोदींच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. कोणाच्याही मनात किंतु परंतु नाही. मात्र स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत. इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपवाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सवादोनशेच्या घरात पोहोचला आहे. `लॉक डाऊन’ कठोरपणे राबवूनही लोक बाहेर पडतात तेव्हा ते आपल्या व दुसऱ्यांच्या जिवाशी खेळतात. यात ना मोदींचा संबंध ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दोष! परदेश प्रवास लपवून ठेवणाऱ्यांनी आणि क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्यांनी महाराष्ट्रावर हे संकट आणले आहे. अर्थात, हा इतका अभ्यासही भाजपच्या लोकांकडे नसल्यामुळेच इस्लामपुरातील कोरोना हा मोदींच्या देवत्वाचा प्रकोप असल्याचे विधान केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसाठी ही योग्य केस आहे. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी. रस्त्यावर फिरणाऱ्यांना दंडुका मारणे ठीक आहे, पण महामारीबाबत इस्लामपुरी अफवा पसरवणे, अंधश्रद्धा बळावेल अशी विधाने करणे हे राज्य विघातक आहे. ही पंतप्रधान मोदींची तर बदनामी आहेच, पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या वैचारिक वारशालाही धक्का देणारे हे वर्तन आहे. प्रे. ट्रम्प हे तर मोदींचे पक्के चाहते आहेत. त्यांनी मोदींचे लांगुनचालनच केले, पण तरीही अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडविला आहे. न्यूयॉर्कसारखे शहर मृतवत झाले आहे. सांगलीतील इस्लामपूर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना कोणी शिक्षा दिली, याचा कोणी खुलासा करेल काय?

आपली प्रतिक्रिया द्या