सामना अग्रलेख – भाजपचे नवे शिवाजी; आमचे छत्रपती शिवराय!

5499

आज के शिवाजी नरेंद्र मोदीहे पुस्तक म्हणजे ढोंग चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे म्यानझाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही!’ असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत. पंतप्रधान मोदी यांनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजील उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात तसे आता झाले आहे. शिवरायांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसेच ‘‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन’’ हे छत्रपतींचे वाक्य इंग्रजी रेकॉर्डस्मध्ये आहे. हीच शिवरायांची प्रतिमा आहे. छत्रपती शिवरायांची पत्रे, मुद्रा, आज्ञा आता उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा विचार केला तर त्यांच्या ध्येयात कुठे स्वार्थ शिवला होता असे दिसत नाही. शिवराय लढले, त्यांनी शत्रूराज्यात घुसून लुटी केल्या, स्वाऱ्यांवर गेले. अर्थात ते शिवरायांनी केले; कारण ते स्वराज्यासाठी करणे आवश्यक होते. ती स्वराज्याची गरज होती म्हणून केले.

स्वराज्याच्या मार्गातील अडसर

दूर करण्यासाठी काही कृत्ये केली. या गोष्टी शिवरायांनी स्वतःसाठी न करता सर्वजनांचे हित साधावे म्हणून केल्या. परकीय इतिहासकारांच्या दृष्टीने शिवाजीराजे हे एक पराक्रमी महापुरुष होते. 1670 साली एका इंग्रज इतिहासकाराने लिहिलेले पत्र विचार करण्यासारखे आहे. त्या वेळी महाराज बंकापूर येथे मोहिमेवर होते. तो लिहितो की, ‘तोच विजयी होईल असे लोक बोलतात. (म्हणजे शिवाजी राजे)’ इंग्रजी इतिहासकार काय सांगत? तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले. असे इंग्रजांनी लिहून ठेवले आहे. त्यांनी शिवरायांची ऍलेक्झांडरशी तुलना केली आहे. ‘शिवराय तलवार कधी टाकीत नाहीत. कुठपर्यंत? दिल्ली जिंकून दिल्लीतच औरंगशहाला कैद करीपर्यंत तलवार हातातून ठेवणार नाही, असा त्याने पण केला आहे.’ असेही हा इतिहासकार म्हणतो. हा पत्रव्यवहार कधीकाळी प्रसिद्ध होईल याची कल्पना नसतानाही पाश्चात्त्यांनी छत्रपती शिवाजीराजांबद्दल ही मते व्यक्त केली आहेत. या प्रकारचे गौरवोद्गार पोर्तुगीजांच्या दफ्तरातही सापडतात. कवी परमानंदांच्या काव्यातदेखील वाचावयास मिळतात. शिवरायांचा विश्वासू म्हणून नेवाशाला राहणारा कवी परमानंद मानला जातो. त्याने आपल्या ‘शिवभारत’ ग्रंथात ‘चरितं शिवराजस्ये भरतेस्यव भारतम’ असे म्हटले आहे. बखरकारांप्रमाणे शंकराचा अवतार न म्हणता तो शिवरायांना विष्णूचा अवतार म्हणतो. आता ज्यांनी श्री. मोदी यांना ‘आज के शिवाजी’ संबोधिले त्याच लोकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना विष्णूचे तेरावे अवतार अशी मान्यता दिली. काल विष्णूचे अवतार, आज ‘शिवाजी.’ यात देश, देव, धर्माचाही अपमान आहेच, पण मोदी यांचीही कोंडी होत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे

ढोंग चमचेगिरीचा

सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे व दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत. म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्व गाद्यांचे वारसदार आज भाजपमध्ये आहेत. प्रत्येक गादीबद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्र संतापला असताना शिवरायांच्या वारसदारांनाही आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. छत्रपतींनी मोगलांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ‘स्वराज्य’ स्थापन झाले. त्यांनी चाकरीचा मार्ग स्वीकारला असता तर महाराष्ट्र निर्माण झाला नसता. शिवरायांनी दिल्लीश्वरांच्या मनसबदारीवर लाथ मारली म्हणून ‘मराठी बाणा’ आजही जागा आहे. शिवराय शूर होते व संयमी होते म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्र सदनावर ज्यांनी हल्ला केला त्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले. सदनावरील हल्ल्यात तेव्हा शिवरायांच्या प्रतिमेसही तडे गेले होते. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ‘‘आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!’’ आता यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या