सामना अग्रलेख – काँगेस रस्त्यावर उतरली! इतरांचे काय?

लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळय़ा कपडय़ांचाच सोस आहे. भाजपनेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा!

महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणारा एकमेव पक्ष म्हणून काँग्रेसकडेच बोट दाखवावे लागेल. महागाईबरोबरच काँग्रसने ‘ईडी’च्या विरोधातही जोरदार एल्गार केला. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. संसदेत व संसदेबाहेर त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. प्रियंका गांधी यांना तर पोलीस फरफटत, ओढत घेऊन जात आहेत, हे चित्र देशाने पाहिले. महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. महागाई, बेरोजगारी हे विषय गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते. धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे. महागाईविरुद्ध आंदोलनाची खिल्ली उडवताना भाजपतर्फे हीच अफूची गोळी पुन्हा चारली आहे. महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजीच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून कोटय़वधी हिंदूंचे शेकडो वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यामुळे त्या घटनेस आमचा विरोध आहे, हे दाखविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांनी काळे कपडे घालून आजच्या दिवशी आंदोलन केले,’’ असे श्री. अमित शहा यांनी सांगितले. प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे?

महागाई-बेरोजगारीचा भस्मासूर

उसळला आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारातील कारणे काहीही असतील. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीवर गेले व त्याचा फटका सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यास बसत आहे. महागाई व बेरोजगारीवर राम मंदिर हा उतारा नाही. राम मंदिर ही श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्येत राम मंदिर होतच आहे. मात्र लोकांनी तुम्हाला सत्ता जी दिली आहे, ती सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करायला. पंतप्रधान मोदी यांचे बंधू श्री. प्रल्हादभाई मोदी हे राष्ट्रीय रेशनिंग दुकानदार संघटनेचे प्रश्न घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करायला उतरले. त्यांना विचारले, ‘‘काय हो, प्रल्हादभाई, पंतप्रधान तुमचे भाऊ असताना रस्त्यावर का उतरताय?’’ यावर प्रल्हादभाई ताडकन म्हणाले, ‘‘भाऊ पंतप्रधान आहे म्हणून उपाशी मरू का?’’ प्रल्हादभाईंच्या या उत्तरातच सगळे सार आले. राम मंदिर उभे राहणारच आहे, पण म्हणून महागाई, बेरोजगारी, जीएसटीवर आवाज उठवायचा नाही का? रोज हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जे पतधोरण जाहीर केले, त्यात रेपो दरात अर्धा टक्क्याने वाढ केली. या वाढीचा फटका कर्जदारांना बसणार आहे. रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, वाहन अशा सर्व प्रकारच्या कर्जांच्या ईएमआयचा बोजा वाढणार आहे. महागाई भडकली असली तरी निमूट त्या आगीत होरपळून मरा. महागाईविरुद्ध बोंब माराल तर याद राखा, असेच केंद्र सरकारचे धोरण आहे. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीची गळचेपी आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली, पण इतर विरोधी पक्ष कोठे आहेत? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे एक रहस्यच आहे. दिल्लीत काँग्रेस रस्त्यावर उतरली असताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहुधा दिल्लीतच होत्या व त्यांच्या

राज्याचा जीएसटी परतावा

मिळावा म्हणून विनवणी करीत होत्या. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थातूरमातूर कारणावरून त्यांनी मतदान केले नाही ही बाब आम्हाला गंभीर वाटते. प. बंगालात ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या राजकीय कारवाया वाढल्या. त्याचा हा परिणाम नसावा, पण राहुल व सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ने घेरले आहे तरी महागाई-बेरोजगारीविरुद्ध ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. अशा वेळी सर्व मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधकांच्या बेकीतच भाजपचे बळ आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत निर्माण केली जाते. राहुल गांधी यांनी बेडरपणे सांगितले आहे, ‘‘मी तुमच्या ‘ईडी’ला घाबरत नाही. हवी ती कारवाई करा!’’ महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यावर त्याच पद्धतीने सूडाची कारवाई होताच शिवसेनेनेही तीच आक्रमक भूमिका घेतली, पण विरोधी पक्षातील इतर पुढाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी चिंताजनक आहे. ‘ईडी’चा वापर करून राज्यातील सरकारे पाडली जातात व बनवली जातात. त्याच मार्गाचा अवलंब करून महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांवरही वाचा बंद केली जाते. याची नोंद काळय़ा इतिहासात होईल, हे आज शेपूट घालणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुळात लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळय़ा कपडय़ांचाच सोस आहे. भाजपनेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा!