आजचा अग्रलेख : काँग्रेसचा मीना बाजार!

3601
sonia-gandhi

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव होऊनही आम्हीच देशाचे राज्यकर्तेया मोगलीमानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. सारा देश ‘370’ कलम हटवल्याचे स्वागत करीत असताना जीर्णशीर्ण काँग्रेस पक्ष ‘370’ची जळमटे आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही.   त्यामुळे काँगेसचा दिल्लीच्या एका गल्लीतील मीना बाजार झाला आहे. जुनी गिऱ्हाईके तिथे वावरताना दिसतात इतकेच. काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदीशहा जबाबदार नसून ते स्वतःच जबाबदार आहेत. 73 वर्षांच्या सोनियांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेसुरले सत्त्वही गमावले आहे.

73वर्षांच्या सोनिया गांधी यांना पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यावे लागले. सोनिया गांधी वारंवार आजारी पडतात. उपचारांसाठी त्यांना परदेशात जावे लागते. अधूनमधून त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व करण्याचे ओझे त्यांना वाहावे लागणे हे अमानुष आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 75 दिवस झाले. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार नवीन अध्यक्ष निवडा असे राहुल गांधींचे म्हणणे होते. अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा असेही त्यांचे सांगणे होते. गांधी कुटुंबाचा पांगुळगाडा त्यागावा व पक्षाने उभारी घ्यावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले. पक्षाने मनधरणी करूनही ते मागे हटले नाहीत हे महत्त्वाचे. प्रियंका गांधी यांच्या नावाचा धोषा काही मंडळींनी लावताच राहुल गांधी यांनी त्यांना झापले. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होत आला आहे व त्याबाबत गांधी कुटुंबास जबाबदार धरले जात आहे. त्यातून राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला व त्यांच्या निर्णयाचा सन्मान होणे गरजेचे होते, पण 75 दिवसांनंतरही काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष सापडला नाही व 73 वर्षांच्या सोनिया गांधी पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा बनल्या आहेत. काँग्रेस पक्षात सध्या नेतृत्वाची पहिली फळी अस्तित्वात राहिलेली नाही. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटनी ही ‘फक्त’ भेगा पडलेली फळी आहे. महाराष्ट्राचे सुशीलकुमार शिंदेही त्याच फळीतले आहेत. या

फळीच्या आधाराने

काँग्रेस पक्ष पुढे जाणे शक्य नाही. तरीही पक्षाध्यक्षपदाचा घोळ 75 दिवस सुरूच राहिला. आताही पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ज्या नावांवर चर्चा झाली असे म्हणतात, ती नावे म्हणजे ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी अवस्था म्हणावी लागेल. तरुणांच्या हाती काँग्रेसची धुरा द्यावी हा विचार चांगलाच होता, पण काँग्रेस पक्षात तरुणांची भरती गेल्या पंचवीस वर्षांपासून बंद झाली आहे. फक्त वयाने तरुण असून चालत नाही, तर त्या नेत्यांभोवती तरुणांना आकर्षित करण्याचे वलय असावे लागते. वयाच्या 84 व्या वर्षीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तरुणांचे नेते होते. मोदी हे वयाची 65 वर्षे पूर्ण करून पुढे गेले, पण देशातील नवतरुण त्यांच्या नेतृत्वाभोवती आकर्षित झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत आजही शरद पवार यांच्याभोवती तरुणांचा घेरा आहे व अखिलेश यादवांकडे तरुणांनी पाठ फिरवली. आजही तरुण वर्ग मुलायमसिंग यादवांना मानतो. लालू यादव यांच्या घरातील दोन तरुण पोरांनी ‘राजद’चा बाडबिस्तारा गुंडाळायला सुरुवात केल्याने उरलेला पक्ष आजही तुरुंगातील लालू यादवांकडेच नेता म्हणून अपेक्षेने पाहत आहे. शिवसेनेकडे आजही तरुणांची फौज आहेच व नवा कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रिया सुरूच आहे. प्रश्न इतकाच आहे की, काँग्रेस पक्षात गेल्या 25 वर्षांत नवा कार्यकर्ता निर्माण झाला नसेल तर त्यास जबाबदार कोण? नेहरू-गांधींचा जयजयकार करणारा तरुण वर्ग त्या-त्या काळात होताच, पण काळ बदलत गेला तरी काँगेसला कात टाकून सळसळ करावी असे वाटले नाही व गांधी घराण्याशी ‘निष्ठा’ हाच त्यांचा

दरबारी कार्यक्रम

बनला. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत सध्या पुराचे थैमान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चिखलात उतरून काम करीत आहेत. कधीकाळी काँग्रेसच्या ‘सेवा दला’चे तरुण लोक मदतकार्यासाठी पुढे जात. आज ‘सेवा’ शब्द संपला असून फक्त ‘दलदल’ उरली आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य संग्रामात दिलेले योगदान नक्कीच महत्त्वाचे आहे, पण तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. रस्त्यावर येऊन तो इंग्रजांशी लढला व तेव्हा काँग्रेस हाच देशाचा आवाज होता. त्या लढय़ात तरुणांचा सहभाग होता. मात्र स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसने वेळ आली तेव्हा प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली नाही. एवढेच नव्हे तर आता लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव होऊनही ‘आम्हीच देशाचे राज्यकर्ते’ या ‘मोगली’ मानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. सारा देश ‘370’ कलम हटवल्याचे स्वागत करीत असताना जीर्णशीर्ण काँग्रेस पक्ष ‘370’ची जळमटे आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यांच्या पक्षातच यावर दोन तट पडले आहेत. ट्रिपल तलाकच्या बाबतीत राजीव गांधी यांनी केलेली घोडचूक यावेळी सुधारता आली असती, पण काँग्रेसने इतिहासातील चुकांपासून शिकण्याची तयारी दाखवली नाही. त्यामुळे काँगेसचा दिल्लीच्या एका गल्लीतील मीना बाजार झाला आहे. जुनी गिऱ्हाईके तिथे वावरताना दिसतात इतकेच. काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी-शहा जबाबदार नसून ते स्वतःच जबाबदार आहेत. 73 वर्षांच्या सोनियांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेसुरले सत्त्वही गमावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या