सामना अग्रलेख – फडणवीस समाधानी! आणखी काय हवे?

विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो कोरोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजही तितकेच तरुण, तडफदार वगैरे आहेत, जितके ते मुख्यमंत्रीपदावर असताना होते. फडणवीस यांचे एक भावनिक आणि हृदयस्पर्शी वक्तव्य समोर आले आहे. फडणवीसांनी त्यांचे खास सहकारी गिरीश महाजन यांना कळकळीने सांगितले आहे की, ‘‘गिरीश, मला कोरोना वगैरे झालाच तर एक कर, मला काही झाले तरी सरकारी इस्पितळातच दाखल कर.’’ फडणवीस यांच्या या भावनेचे कौतुक होण्याऐवजी टीका होत आहे, खिल्ली उडवली जात आहे. हे काही बरोबर नाही. सध्या समाज माध्यमांवर ‘ट्रोल’ भैरवांच्या दोन टोळय़ा किंवा गट पडले आहेत व हे दोन गट एकमेकांविरुद्ध सतत दंड थोपटून उभे असतात. सरकार पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष हा सामना म्हणजे एक शाब्दिक युद्धच ठरते. फडणवीस यांनी केलेल्या भावनिक विधानाबाबत नेमके तेच होताना दिसत आहे. फडणवीस यांचे नेहमीचेच टुमणे असते की, ‘सामना’तून कधी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही. त्यांचे हे म्हणणे म्हणजे अर्धसत्य आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असताना ‘सामना’ वाचत नव्हते असा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर केलेले कौतुकाचे क्षण वाचनातून निसटले असावेत. ‘वाचाल तर वाचाल’ असा एक मंत्र आहे. त्यामुळे ‘सामना’ सोडून श्री. फडणवीस इतर काही वाचत असावेत व त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना

नियमित ‘सामना’

वाचावा लागतो. फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करीत आहेत असे आम्ही याच स्तंभात अनेकदा सांगितले. ही कौतुकाची थाप नाही काय? ही तर सगळय़ात मोठी शाबासकी आहे. कोविडप्रकरणी सरकारी यंत्रणा कशी काम करते आहे, कोठे काम करायला हवे व काय त्रुटी आहेत यासाठी विरोधी पक्षनेते राज्यभरात पाहणी दौरे करीत आहेत. विरोधी पक्षनेते पोहोचल्यामुळे प्रशासन गतिमान होते हा आमचा अनुभव आहे. फडणवीस हे अनेक इस्पितळांत कोरोना सुविधा केंद्रास भेटी देतात व सरकारवर त्यांचा तोफखाना सोडतात. त्यामुळे प्रशासनाची धावपळ होते, पण एकंदरीत सरकारने जे कार्य केले त्याबाबत श्री. फडणवीस हे संपूर्ण समाधानी आहेत व उद्या आपल्याला कोरोना झालाच तर कोणत्याही खासगी इस्पितळात न पाठवता सरकारी इस्पितळातच दाखल करावे असे ‘विल’ म्हणजे इच्छापत्र त्यांनी गिरीश महाजनांवर सोपवले. काहींना यातही फडणवीस यांचा ‘स्टंट’ वाटतो आहे. मात्र त्यांनी त्यांच्या सहज भावना व्यक्त केल्या आहेत. त्याला स्टंट वगैरे म्हणणे योग्य नाही. किंबहुना, या त्यांच्या भावनांचे कौतुक करावेच लागेल व समस्त महाराष्ट्रीय जनतेने त्यांची पाठ थोपटावी असा हा प्रसंग आहे. फडणवीस हे काल राज्यकर्ते होते. त्यामुळे सरकारी यंत्रणा काय होती, काय आहे याचे भान त्यांना आहे. विरोधी पक्ष म्हणून ते टीका करतात हा त्यांचा अधिकार आहे.

तुकारामांनी सांगितलेच

आहे, ‘‘निंदकाचे घर असावे शेजारी!’’ आम्ही तर त्याही पुढे जाऊन सांगतो, ‘‘निंदकाचे घर आपल्या उंबरठय़ावरच, अंगणात असावे’’. असे संत कबीरच म्हणत आहेत.

निंदक नियरे राखिए, आँगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल रे सुभाय!

हे जे कबीर त्यांच्या दोहय़ात सांगतात तेच आपल्या लोकशाहीचे मर्म आहे. जो आपल्यावर टीका करतो, त्याचा द्वेष करू नका. त्याला आपल्या जवळच ठेवा. बिनपाणी व साबणाशिवाय तो आपले मन स्वच्छ करीत असतो. साबणाने शरीर स्वच्छ होईल फार तर, पण विरोधकांच्या टीकेने मन व कार्य स्वच्छ होईल याच उदात्त विचारात महाराष्ट्राचा विरोधी पक्ष काम करीत आहे. श्री. फडणवीस यांची टीका व शब्दतोफा विधायक दृष्टिकोनातून घेतल्या तर बरे होईल. श्री. फडणवीस यांना कोरोना वगैरे होऊ नये. त्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभोच, त्यांचे बाल-बच्चे व राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत ही आमच्यासारख्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो कोरोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे?

आपली प्रतिक्रिया द्या