सामना अग्रलेख – कोरोना पुढे, देश मागे!

3470

कोरोनामुळे जग या 25 आठवड्यांत 25 वर्षे पिछाडीवर गेले आहे. आपल्या देशापुरता विचार केला तर केंद्र सरकारने 20 लाख कोटींचा ‘बूस्टर डोस’ अर्थव्यवस्थेला दिला आहे. तथापि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही. जग जसे कोरोनामुळे 25 आठवड्यांत 25 वर्षे मागे गेले तसाच हिंदुस्थानही मागे पडला आहे. जगात कोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी कायम आहे. जगातील कोरोनाग्रस्त देशांमध्ये दिसणारे हे चित्र आपल्याही देशात दिसत आहे. केंद्र सरकार वादे आणि दावे तर खूप करीत आहे; पण कोरोना पुढे, देश मागे हेच आपल्याही देशाचे वास्तव आहे आणि त्याचे चटके जनतेला सोसावे लागत आहेत.

जगात आणि देशात कोरोनाचा कहर थांबायला तयार नाही. आपल्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 50 लाखांपेक्षा वर गेली आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडाही 82 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. जगातदेखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. कोरोना रुग्णांचा आणि बळींचा आलेख खाली यायला तयार नाही. त्यामुळे होणारे दुष्परिणामही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोरोना हा भयंकर साथीचा आजार असल्याने मानवी आरोग्य तर धोक्यात आले आहेच, शिवाय लॉक डाऊनमुळे आर्थिक गतीही ठप्प झाली आहे. बिल ऍण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनच्या अहवालाने ही महाभयंकर वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. या कोरोनाग्रस्त महिन्यांनी जगातील चार कोटी लोकसंख्येला दारिद्रय रेषेखाली ढकलले आहे. या 25 आठवड्यांमुळे जग 25 वर्षे मागे गेले आहे, असे भीषण वास्तव या अहवालाने मांडले आहे. कोरोनाचा आर्थिक तडाखा सुमारे 12 अब्ज डॉलर्स एवढा असून जगाची गरिबी सात टक्क्यांनी वाढली आहे. जगातील दोनशेपेक्षा जास्त देश कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. त्यात आपला देशही आहे. आधीच गडगडलेली आपली अर्थव्यवस्था कोरोना आणि लॉक डाऊनमुळे रसातळाला गेली आहे. जीडीपीचा दर कधी नव्हे तो उणे 23 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कृषी क्षेत्र वगळता उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा

विकास ढेपाळला

आहे. निर्यातीतील घसरण सलग सहाव्या महिन्यात कायम राहिली आहे. आयातही खालावली आहे. त्यामुळे व्यापारी तूट कमी झाली हा दिलासा असला तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही परिस्थिती म्हणजे हिंदुस्थानच्या विकासाचा ‘रिव्हर्स गियर’ अशीच म्हणावी लागेल. गेटस् फाऊंडेशनच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष हाच आहे. आपल्या देशात 12 कोटींचा रोजगार आधीच बुडाला आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. जे सुरू आहेत तेदेखील रडतखडत सुरू आहेत. त्यात आणखी 1 कोटी 75 लाख छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे सगळे लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग असल्याने त्याचा थेट परिणाम बेरोजगारी वाढण्यात होणार आहे. साहजिकच लोकांची क्रयशक्ती आणखी कमी होईल. त्याचा प्रभाव खरेदी-विक्रीवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होईल. खासगी क्षेत्रातील खरेदी क्षमता आणि स्थिर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावेल असाही एक अंदाज आहे. हिंदुस्थानच नाही, तर जगात ज्या-ज्या देशांना कोरोनाचा तडाखा बसला आहे त्या प्रत्येक देशाची हीच अवस्था आहे. ‘अनलॉक’मुळे उद्योग-व्यवसायाचे, बाजारपेठेचे

बंद पडलेले श्वास

हळूहळू सुरू होत असले तरी झालेल्या नुकसानीचा महाभयंकर खड्डा भरून काढायचा आणि पुन्हा नव्याने झेप घ्यायची, हे कठीण आव्हान प्रत्येक कोरोनाग्रस्त देशासमोर आहे. लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प होते आणि अनलॉकमुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढतो अशी ही विचित्र कोंडी आहे. ती फोडण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करीत आहे. तथापि कोरोनाचा प्रसार जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेची घसरण नियंत्रणात येणार नाही. कारण कोरोनाच्या दहशतीमुळे ग्राहकांची मानसिकता सावधगिरीचीच राहील आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर होईल. म्हणजे ग्राहकवर्ग खर्चासाठी तर कंपन्या गुंतवणुकीसाठी हात आखडता घेतील. कोरोना संकटाचे सहा महिने उलटले तरी ही परिस्थिती कायम आहे. कोरोनामुळे जग या 25 आठवड्यांत 25 वर्षे पिछाडीवर गेले आहे. आपल्या देशापुरता विचार केला तर केंद्र सरकारने 20 लाख कोटींचा ‘बूस्टर डोस’ अर्थव्यवस्थेला दिला आहे. तथापि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही. जग जसे कोरोनामुळे 25 आठवड्यांत 25 वर्षे मागे गेले तसाच हिंदुस्थानही मागे पडला आहे. जगात कोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी कायम आहे. जगातील कोरोनाग्रस्त देशांमध्ये दिसणारे हे चित्र आपल्याही देशात दिसत आहे. केंद्र सरकार वादे आणि दावे तर खूप करीत आहे; पण कोरोना पुढे, देश मागे हेच आपल्याही देशाचे वास्तव आहे आणि त्याचे चटके जनतेला सोसावे लागत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या