सामना अग्रलेख – आता प्रवचने नकोत!

5821

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे. कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीदेखील आता दिली. कोरोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत!

को रोनाबाबतच्या बातम्या संमिश्र आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने आता कोरोनावर प्रवचने देऊ लागला आहे. डॉक्टर, पोलीस, परिचारिका, वॉर्डबॉय हे प्रत्यक्ष युद्धावर आहेत व त्यात त्यांना प्राण गमवावे लागत आहेत. मुंबईच्या उपनगरात कोरोनामुक्तीसाठी अहोरात्र झटणारे पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार हे कोरोनाशी लढताना शहीद झाले आहेत. वांद्रे पूर्व परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी खैरनार यांनी जिवाची बाजी लावली व त्यातच त्यांनी प्राण गमावला. हे असे लढवय्ये आहेत म्हणून कोरोनाशी आपण सामना करू शकतो. पडद्यावरचे महानायक अमिताभ बच्चन व त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली हे धक्कादायक आहे. बच्चन हे या संपूर्ण काळात घरीच होते व स्वतःची काळजी घेत होते. अधूनमधून समाजमाध्यमांवर तमाम जनतेला कोरोनाबाबत सकारात्मक मार्गदर्शन करत होते. तरीही श्रीमान बच्चन यांना कोरोनाने गाठलेच. हे चिंताजनक आहे. बच्चन व त्यांचे चिरंजीव हे लढाऊ बाण्याचे आहेत. या लढाईत ते विजयी होतील व सुखरूप घरी परत येतील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. कोरोनाचे संकट वाढत आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी पुन्हा एकदा कठोर लॉक डाऊन केले. त्यांना हे लॉक डाऊन का करावे लागले, हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योगी सरकारने जे कष्ट घेतले, जे एक यशस्वी ‘मॉडेल’ राबवले त्याचे कौतुक केले. आम्हीही त्याच मताचे आहोत.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात

‘कोरोना’ नियंत्रणात आल्याशिवाय देशात कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे कोरोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेश ‘मॉडेल’वर पुन्हा कडक लॉक डाऊन लादण्याची वेळ यावी याचा अर्थ काहीतरी चुकले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यामुळे भाजपास हे राज्यसुद्धा कोरोनासंदर्भात महत्त्वाचे आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर मुंबईतील धारावीसंदर्भात एक चांगली बातमी आली आहे. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले व त्याबद्दल शाबासकी दिली आहे. जगभरात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे निराशाजनक चित्र असले तरी अजूनही त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी येथे या रोगावर ज्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आले ते इतरांसाठी आदर्श असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍडॅनॉम ग्रेब्रेयासिस यांनी सांगितले. धारावी हा मुंबई उपनगराचा एक भाग आहे, पण आशिया खंडातील सगळय़ात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी नेहमीच स्वतंत्रपणे जागतिक नकाशावर येत राहिली. धारावीसारख्या अतिगर्दीच्या, नियोजन नसलेल्या, दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला व ते संक्रमण पसरले तर हाहाकार माजेल, कोरोनास येथून बाहेर काढणे कठीण जाईल असे वाटत होते, पण मुंबई

महानगरपालिका व पोलिसांनी

ही परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली व तेथून कोरोनास मागे रेटले. आज धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱया कपडय़ांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे? संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला कोरोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे. कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत!

 

आपली प्रतिक्रिया द्या