सामना अग्रलेख – ‘बाजारा’ला कोरोनाचा दंश!

2781

चीनमध्ये महासंहार घडवणाऱया कोरोनाच्या विषाणूंचा अमेरिकेसह जगभरातील 40 देशांमध्ये फैलाव झाला आहे. कोरोनाच्या या दहशतीचा जबर फटका हिंदुस्थानसह जागतिक शेअर बाजारांना बसला. आर्थिक आघाडीवर झालेले लाखो कोटींचे नुकसान भविष्यात कदाचित भरून निघेलही. मात्र कोरोनाच्या विषाणूवर कुठलेच औषधोपचार नसल्याने जगातील सर्वच देशांवर आता मृत्यूची टांगती तलवार लटकू लागली आहे. ‘बाजार’ तर झोपला आहेच, पण आता जीव वाचवण्याची चिंता जगाला करावी लागेल. हिंदुस्थानची तर सीमाच चीनला लागून आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपणही सज्ज झाले पाहिजे!

चीनमध्ये हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसने आता साऱ्याजगाचीच झोप उडवली आहे. किड्या-मुंग्यांप्रमाणे माणासांचे बळी घेत सुटलेल्या कोरोनाच्या विषाणूने चीनच्या सीमा ओलांडून एकंदर 40 देशांमध्ये शिरकाव केल्याच्या वृत्ताने तर मी मी म्हणणाऱया बडय़ा राष्ट्रांचीही पाचावर धारण बसली आहे. कोरोनाच्या या जीवघेण्या व्हायरसने जगभरातील माणसे तर धास्तावली आहेतच, पण हिंदुस्थानसह तमाम देशांच्या अर्थव्यवस्थांनीही आता या विषाणूचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या व्हायरसने शुक्रवारी जगातील सर्वच शेअर बाजारांना भयंकर दंश केला. चीनमधील कोरोनाचा फैलाव संपूर्ण जगभरातच होण्याच्या भयाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच शेअर बाजांरात शुक्रवारी मोठी उलथापालथ झाली. अमेरिकेतील शेअर बाजार ‘डाऊ जोन्स’ने तर आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण अनुभवली. एकाच दिवसात तब्बल 1191 अंकांनी निर्देशांक कोसळण्याची अमेरिकी शेअर बाजारातील ही पहिलीच घटना आहे. काही तासांतच अमेरिकी शेअर बाजार असा गडगडला की त्याचा निर्देशांक 2008 नंतरच्या सगळय़ात निचांकी स्तरावर जाऊन पोहचला. अमेरिका ही तर बोलूनचालून आर्थिक महासत्ता.

कोरोनाच्या दहशतीने सर्वशक्तिमान अमेरिकेचाच बाजार उठला तिथे हिंदुस्थानसारख्या आधीच मंदीच्या फेऱयात अडकलेल्या अर्थव्यवस्थेची काय कथा? त्यात हिंदुस्थानचा शेअर बाजार तर गोष्टीतील राजकन्येपेक्षाही नाजूक. कथेतील राजकन्या जशी साधी फुले वेचूनही दमते, तसाच हिंदुस्थानी शेअर बाजारही कुठल्याही हलक्याफुलक्या गोष्टींनी लगेच मान टाकतो. किंबहुना कोसळण्यासाठी हिंदुस्थानी शेअर बाजार कुठल्या तरी निमित्ताचीच वाट पाहत असतो. आता तर निमित्त मोठेच मिळाले. त्यामुळे पडझडही तशीच मोठी होणार हे ओघाने आलेच. कोरोनाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजार कोसळत असतानाच हिंदुस्थानी शेअर बाजारानेही शुक्रवारी मोठी आपटी खाल्ली. अमेरिकेलाही मागे टाकत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 1214 अंकांनी कोसळला. 39 हजार 745 वर असलेला मुंबई शेअर बाजार 38 हजार 531च्या पातळीवर येऊन पोहचला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही अशीच पडझड झाली. 364 अंकांसह 3.13 टक्क्यांनी निफ्टीचा निर्देशांक आपटला. शेअर बाजार उघडल्यानंतर लगेचच निर्देशांक असा रसातळाला गेल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी रुपये बुडाले. ही घसरण सामान्य नाही.

शेअर बाजाराचा आपटीबार तसा गेल्या आठवडाभरापासूनच सुरू आहे. मागच्या सहा दिवसांत 5 लाख कोटी आणि आता एकाच दिवसात 5 लाख कोटी असे गुंतवणूकदारांचे एकंदर 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन-चार लहान देशांचा आर्थिक गाडा वर्षभर चालवू शकेल असा हा आकडा आहे. या पडझडीत जपानी शेअर बाजार निक्केईला 4.02 टक्क्यांचा फटका बसला तर नॅस्डॅकमध्ये 4.61, एफटीएसईमध्ये 3.49 व शांघाय कंपोझिटमध्ये 3.37 टक्क्यांची घसरण झाली. कोरोनाच्या विषाणूने आता इतर देशांतही हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेण्याच्या मागे लागले आहेत.

चीनच्या हुवेई प्रांताची राजधानी वुहान येथून पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने संपूर्ण चीनमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत 2 हजार 788 लोक या विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्युमुखी पडले आहेत आणि सुमारे 80 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती चीन देत असला तरी प्रत्यक्षात मात्र हे आकडे कितीतरी पटीने अधिक असावेत, असे सांगितले जाते. जपानमध्येही 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि तिघे या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत. इटलीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 250 जणांना लागण झाली आहे. इराणमध्ये 26 जणांचे बळी गेले व 245 जणांना या विषाणूची बाधा झाली आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 2 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये महासंहार घडवणाऱया कोरोनाच्या विषाणूचा अमेरिकेसह जगभरातील 40 देशांमध्ये फैलाव झाला आहे. कोरोनाच्या या दहशतीचा जबर फटका हिंदुस्थानसह जागतिक शेअर बाजारांना बसला. आर्थिक आघाडीवर झालेले लाखो कोटींचे नुकसान भविष्यात कदाचित भरून निघेलही. मात्र कोरोनाच्या विषाणूवर कुठलेच औषधोपचार नसल्याने जगातील सर्वच देशांवर आता मृत्यूची टांगती तलवार लटकू लागली आहे. ‘बाजार’ तर झोपला आहेच, पण आता जीव वाचवण्याची चिंता जगाला करावी लागेल. हिंदुस्थानची तर सीमाच चीनला लागून आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपणही सज्ज झाले पाहिजे!

आपली प्रतिक्रिया द्या