सामना अग्रलेख – उपाशी जनता सिंहासन खाते!

देशाच्या इतिहासातील सगळय़ात भयावह स्थितीतून आपण सध्या जात आहोत. तरीही रवींद्रनाथ टागोर यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत जे म्हटले ते महत्त्वाचे, ‘‘माणसावरचा माझा विश्वास अजून नाहीसा झालेला नाही, हा परमेश्वराचा संदेश घेऊनच जगात प्रत्येक बालक जन्माला येत असते.’’ महाभूतांप्रमाणे राष्ट्रांच्या जीवन व्यवहारातही वाऱ्याची दिशा बदलत असते. समुद्राला भरती-ओहोटी येते, जहाज खडकांवर आदळतात. अशा वादळातही आपला देश टिकून राहिला, त्याचे श्रेय जनतेच्या समंजसपणास व संयमास द्यायला हवे, पण जनता उपाशी असेल तर ती सिंहासनसुद्धा खाऊन टाकते. इतिहास तेच सांगतो. श्रीलंकेतील जनतेने तेच केले. जगातील जनतेची मानसिकता वेगळी नाही. सिंहासन अमर नसते!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका जाहीर सभेत हत्या करण्यात आली. आबे हे हिंदुस्थानचे मित्र होते. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचा खास दोस्ताना होता. आबे हे अहमदाबादेतही जाऊन आले होते. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत सध्या जी थोडीफार उलाढाल सुरू आहे, त्यात शिंजो आबे यांचे योगदान आहे. जपानच्या मदतीने अनेक मोठे प्रकल्प आपल्याकडे सुरू आहेत. त्यामुळे आबे यांची हत्या हिंदुस्थानसाठी दुःखद आहे. एका माथेफिरूने आबे यांना भरसभेत गोळी घातली. त्यामागची कारणे बाहेर येतील. आबे रक्ताच्या थारोळय़ात पडले असतानाच आपल्या बाजूच्या श्रीलंकेत जनतेने उठाव केला. श्रीलंकेत आर्थिक संकट सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी अशा गर्तेत देश सापडला तो राज्यकर्त्यांनी मारलेल्या भूलथापांमुळे. त्यामुळे आधी पंतप्रधान राजपक्षे यांना लोकांनी पळवून लावले व आता लोक पुन्हा रस्त्यावर उतरले, हिंसक झाले. त्यामुळे राष्ट्रपती गोटाबाय यांना देश सोडून पळून जावे लागले. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. एकप्रकारे श्रीलंकेत अराजक माजले आहे. हिंसाचार, जाळपोळीचा कहर सुरू आहे. पोलीस व जनतेत रस्त्यारस्त्यांवर धुमश्चक्री सुरू आहे व सोन्याची लंका उद्ध्वस्त होताना दिसत आहे. रामायणात हनुमानाच्या शेपटीने लंका जाळली. आता राज्यकर्त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीने लंका जळत आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या का झाली, श्रीलंकेत उठाव का झाला व तेथील सत्ताधीशांना सिंहासन सोडून पळ का काढावा लागला याचे चिंतन आपल्या देशात होणे गरजेचे आहे. रोम जळत होते तेव्हा नीरो मस्तमौला होऊन फिडल वाजवत होता. तशीच स्थिती श्रीलंकेत निर्माण झाली.

लोकांच्या संयमाचा बांध तुटला

सुरक्षा दल, बंदुकांची पर्वा न करता जनता रस्त्यावर आली. आर्थिक संकट इतके गंभीर आहे की, लंका विजेअभावी अंधारात आहे. लोकांना पेट्रोल, डिझेल, रॉकेल, धान्य मिळत नाही. लोकांना पगार मिळू शकत नाहीत. राज्यकर्ते फक्त आश्वासनांवर आश्वासनेच देत राहिले. त्या आश्वासनांत दम नाही हे लक्षात येताच लोकांनी उठाव केला. कोलंबोतील सुरक्षा व्यवस्थेची पर्वा न करता जनता राष्ट्राध्यक्ष निवासात घुसली. लोकांच्या हातात श्रीलंकेचा राष्ट्रध्वज होता व ते देशभक्तिपर घोषणा देत होते. जे सत्तेवर असतात तेच फक्त राष्ट्रभक्त नसतात, तर जनता भुकेने व्याकुळ असते व हक्कांसाठी रस्त्यावर उतरते तेव्हा ती सर्वात जास्त राष्ट्रभक्त बनते. देश लुटणाऱ्यांच्या विरोधात ती मरण्या-मारण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिने डोक्याला जवळ जवळ कफनच बांधलेले असते. हिंदुस्थानने श्रीलंका व जपानमधील घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. श्रीलंकेतील परिस्थितीशी आपल्या देशाची तुलना करणे चूक आहे, पण स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर 1052 रुपये झाले. महिलांना स्वस्ताईचे व चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवून मोदींचा भाजप राजसत्तेवर आला. गेल्या एक वर्षात आठवेळा स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्या, महागाईने सामान्यांची कंबर तोडली आहे. देशातील गरीब परिवारांना केंद्र सरकारतर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले. त्याचे राजकीय सोहळे पार पडले, पण उज्ज्वला लाभार्थ्यांनादेखील प्रतिसिलिंडर 853 रुपये मोजावे लागत आहेत आणि हे 853 रुपये गरीबांना परवडणारे नाहीत. वरुण गांधी यांनी सांगितले आहे की, सिलिंडरला आता घरातील शोभेची वस्तू बनवू नका.

महागाई वाढता वाढता वाढतच

आहे. लोकांचा रोजगार हिरावला जातोय. रुपया डॉलर्सच्या तुलनेत 80 रुपयांच्या नीचांकावर जाऊन कोसळला. आर्थिक मंदीतून मार्ग निघताना दिसत नाही, पण त्याच वेळी विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी दोनेक हजार कोटी रुपये सहज उधळले जातात. अशा पाडापाडीचा लाभ गरीब जनतेला अजिबात होत नसतो. देशातील राजकारण हे खालच्या पातळीवर पोहोचले आहे, पण ते इतके रसातळास नेले जाईल असे कुणास वाटले नव्हते. ‘साऱ्या जगातील कोणत्या भूमीवर निसर्गाने मुक्तहस्ते संपत्ती, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची उधळण केली आहे? या भूतलावरचे नंदनवन कोणते आहे? असे जर मला कोणी विचारले तर मी भारताकडेच अंगुलिनिर्देश करीन’, असे वर्णन प्रसिद्ध पाश्चात्य इतिहासकार मॅक्स मुल्लरने त्या काळात करून ठेवले. त्या नंदनवनात लोकशाही, न्यायव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्याचा मुक्त संचार होता. आज त्या अर्थाने नंदनवन उरलेले दिसत नाही. देशाच्या इतिहासातील सगळय़ात भयावह स्थितीतून आपण सध्या जात आहोत. तरीही रवींद्रनाथ टागोर यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत जे म्हटले ते महत्त्वाचे, ‘‘माणसावरचा माझा विश्वास अजून नाहीसा झालेला नाही, हा परमेश्वराचा संदेश घेऊनच जगात प्रत्येक बालक जन्माला येत असते.’’ महाभूतांप्रमाणे राष्ट्रांच्या जीवन व्यवहारातही वाऱ्याची दिशा बदलत असते. समुद्राला भरती-ओहोटी येते, जहाज खडकांवर आदळतात. अशा वादळातही आपला देश टिकून राहिला, त्याचे श्रेय जनतेच्या समंजसपणास व संयमास द्यायला हवे, पण जनता उपाशी असेल तर ती सिंहासनसुद्धा खाऊन टाकते. इतिहास तेच सांगतो. श्रीलंकेतील जनतेने तेच केले. जगातील जनतेची मानसिकता वेगळी नाही. सिंहासन अमर नसते!