सामना अग्रलेख – दिवाळीतील शुकशुकाट!

देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकाटच अधिक झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पातळ्यांवरील हा शुकशुकाट एकच सवाल करतो आहे… ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’

दिवाळी म्हणजे मराठी जनतेचा तमाम हिंदू धर्मीयांचा चैतन्यदायी सण. घरातीलच नव्हे तर मनामनांतील साचलेली जळमटे, केरकचरा स्वच्छ करून सारं काही लख्ख आणि चकचकीत करणारा सण ही दिवाळीची खरी ओळख आहे. मध्यमवर्गीयांचा छोटा फ्लॅट असो की गरीबाची चंद्रमौळी झोपडी, प्रत्येक घरट्याचा उंबरठा पणत्यांनी, दिव्यांनी आणि आकाशकंदिलांनी उजळून निघाला आहे. राव असो की रंक, अंधारावर मात करणारा प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात उल्हास आणि आनंदच घेऊन येतो. हिंदू धर्मात सणवार आणि उत्सवांची तशी कमतरता नाही. मात्र इतर कुठल्याही सणांपेक्षा सर्वाधिक उत्साहाचे वातावरण असते ते दिवाळीतच. किंबहुना आतुरतेने वाट पाहायला लावणारा एकमेव सण म्हणून दिवाळीचाच उल्लेख करावा लागतो. दिवाळी आणि प्रतीक्षा यांचं नातंच अतूट आहे. शहरांत स्थिरावलेली मुलं, सुना, नातवंडे घरी येणार म्हणून गावाकडची वडीलधारी मंडळी डोळ्यात प्राण आणून आपल्या आप्तेष्टांची प्रतीक्षा करीत असतात. दिवाळीत लक्ष्मीच्या आगमनाची जशी प्रतीक्षा असते, तशीच प्रत्येक बहीण औक्षण करण्यासाठी भाऊबिजेला भावाची प्रतीक्षा करते. शिवाय पाडव्याला यजमानांकडून काय भेट मिळणार याची उत्सुकता प्रत्येक गृहिणीला असतेच. मांगल्याबरोबरच नावीन्य हे दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़. गोरगरीबाचे घर असो की गर्भश्रीमंताचे, ‘दिवाळीला काय नवीन घेणार’, किंवानवीन काय घेतलंहा प्रश्न प्रत्येक घरात हमखास विचारला जातोच. लक्ष्मी जशी प्रसन्न असेल, त्यानुसार

आपल्या ऐपतीप्रमाणे

कोणी नवीन घर खरेदी करतं, कोणी कार, कोणी दुचाकी, कोणी दागिने तर कोणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करतो. दिवाळीसाठी साठवून ठेवलेली पुंजी आणि तुटपुंजा का असेना, पण पगाराशिवाय मिळालेला बोनस यामुळे चाकरमानी मंडळी खिसे रिकामे होईपर्यंत दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटतात. शेतकरी, शेतमजुरांच्या नशिबी मात्र हे पगार, बोनस वगैरेचे सुख नाही. वर्षाचे जे काही उत्पन्न त्यांना मिळते तेही निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून असते. कधी दुष्काळ पडतो आणि काहीच पिकत नाही तर कधी अतिवृष्टी होते आणि पिकलेलं जे काही असेल ते वाहून किंवा सडून जातं. सगळाच बेभरवशाचा मामला. यंदाच्या दिवाळीतही राज्यातील शेतकऱ्यांचे असेच हाल झाले. पावसाळा संपून महिना झाला तरी अजूनही राज्यभर धो धो पाऊस कोसळतो आहे. कापूस, मका, सोयाबीन आदी हाताशी आलेल्या पिकांबरोबरच फळबागांचीही नासाडी होत आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेलं शेतकऱ्यांचं हे नुकसान मोठं आहे. केंद्रातील मायबाप सरकार सांगतं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. शेतकरीही त्यासाठी खूप काबाडकष्ट घेतात, पण मध्येच अशी नैसर्गिक आपत्ती येते आणि कित्येकदा शेतीवर केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न निघत नाही. त्यावर काय उपाय करायचा हे कोणीच सांगत नाही. आज देशभरात आर्थिक मंदी आहे. दिवाळीसाठी म्हणून बाजारपेठेत फटाक्यांबरोबरच खरेदीचा जो धुमधडाका असायला हवा, तो अजूनही दिसत नाही. वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन पार पडले. पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दोन दिवस आणखी शिल्लक आहेत. मात्र

मंदीच्या सावटामुळे

30 ते 40 टक्के खरेदी कमी झाल्याने बाजारपेठांतील रौनकच हरवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. कारखानदारी धोक्यात आली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, रोज नवनवीन कंपन्या आणि प्रतिष्ठाने स्वतःला दिवाळखोर जाहीर करत आहेत. बँकांचे दिवाळे वाजताना दिसत आहे. जनतेचा खिसा तर रिकामा झाला आहेच, पण सरकारी तिजोरीतही खडखडाटच दिसतो आहे. त्यामुळेच युद्धकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील पावणेदोन लाख कोटी रुपये काढून घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. घरातले सोने मोडण्यासाठी आजवर जनताच सराफांकडे जात असे, पण आता तर देशातील रिझर्व्ह बँकही आपल्याकडील सोन्याचा साठा मोडायला निघाली आहे. देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकाटच अधिक झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पातळ्यांवरील हा शुकशुकाट एकच सवाल करतो आहे… ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’

आपली प्रतिक्रिया द्या