
सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!
दिवाळीचा सण म्हणजे एक चैतन्य पर्वच असते. हे चैतन्य पर्व यावेळी अत्यंत जल्लोषात साजरे झाले. सर्व काही थाटामाटात, आनंद उत्साहात साजरे झाले. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा वगैरे प्रत्येक दिवस मस्त झगमगाटात साजरा झाला. व्यापारी वर्गाचे चोपडा पूजन झाले. नरक चतुर्दशीस अनेक नरकासुर पायाखाली कचाकच चिरडून मारले गेले. भाऊबीजेचा थाटही यावेळी वेगळाच होता. गेल्या 75 वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात श्री. मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच. मुंबईच्या सराफा बाजारात कालच्या धनत्रयोदशीला साधारण 1200 कोटी रुपयांच्या सोने खरेदीचे व्यवहार झाले. मागील वर्षापेक्षा ही उलाढाल 25 टक्क्यांनी जास्त झाली. सामान्य लोक, कनिष्ठ मध्यमवर्गीय वगैरे ‘आनंदाचा शिधा’ सोडून एका उत्साहात फक्त सोने खरेदीसाठीच बाहेर पडले. सोन्या-चांदीच्या दुकानांत पाय ठेवायला जागाच नव्हती. रेशनच्या दुकानात गर्दी कमी, पण सोने-चांदी व इतर अलंकार खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीनिमित्त सर्वच सराफी दुकानांत जी गर्दी उसळली, लोकांनी जे भरभरून सोने खरेदी केले, त्याचे श्रेय फक्त पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात मिंधे-फडणवीस यांच्या सरकारला जाते. महाराष्ट्रातील राजकीय ‘सामना’ मिंधे गटाने म्हणे तीन महिन्यांपूर्वी जिंकला. पुन्हा सामना अद्यापि सुरूच असल्याने या दिवाळीत वेगवेगळय़ा तलावांवर भल्या पहाटेच ‘सोन्याचा धूर’ निघाला. द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. लक्ष्मीपूजनही थाटामाटात झाले. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे ‘सामना’ जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात 1900 किलो सोन्याची खरेदी झाली. कोरोनादरम्यान सोन्याचा दर 50 हजार रुपये
प्रति तोळा
झाला होता. त्यानंतर तो 48 हजार रुपयांवर आला. रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान हा दर 55 हजार रुपयांवर गेला, तो आता 50 हजार रुपयांवर आल्याने हा ‘आनंदाचा सुवर्ण शिधा’ खरेदी करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले व महाराष्ट्र झळाळून निघाला. हे सर्व मिंधे-फडणवीस सरकारमुळेच घडले. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना जाहीर केली, राज्यातील तब्बल 7 कोटी लोकांनी ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ घेतला, असा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र याबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या काय सांगत आहेत? लाखो लोकांना तो मिळालाच नाही. शंभर रुपयांत दिवाळीच्या फराळासाठी जिन्नस मिळणार होते. लोक दोन-दोन दिवस रांगेत तिष्ठत उभे राहिले, पण जिन्नस मिळालेच नाहीत. जेथे मिळत होते तेथे आनंदाच्या शिध्याचा काळा बाजार सुरू होता. शेवटी लोकांनी ठरवले शिधा गेला तेल लावत. मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकला आहे. त्यामुळे शिधा कशाला घ्यायचा, आपण सराफ बाजार आणि शेअर बाजारात जाऊ. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले. मिंधे गटाच्या चाळीस खोकेबाज आमदारांमुळे सोन्याचा बाजार आणि शेअर बाजारही वधारला. हे सर्व शक्य झाले ते तीन महिन्यांपूर्वी मिंधे गटाने सामना जिंकल्यामुळेच. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे
संपूर्ण श्रेय
मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने आमच्यावर दीडशे वर्षे राज्य करून आम्हाला गुलाम करून ठेवले, त्या ब्रिटनवर आता एका भारतीय वंशाच्या तरुण पंतप्रधानांचे राज्य आले. ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. हे टपाल लंडनला पोहोचवून ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल. सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय? याचा खुलासा झालेला नाही. शिवाय जे खासदार सुनक यांना पाठिंबा देणार नाहीत त्यांना येथील ‘ईडी’ने ‘टाइट’ केले काय? ते मिंधे महाशयच सांगू शकतील, पण सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. लोक बेरोजगारी आणि उपासमारीने हवालदिल आहेत; पण सोने खरेदीच्या, शेअर बाजार वधारल्याच्या बातम्या आहेत. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही 755 कोटींचे अर्थसहाय्य केले असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे त्यांचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात दारूचे ‘थेंब’ उडवीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी दारूगप्पा मारीत आहेत. उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!