सामना अग्रलेख – इम्रान यांचे काय होणार?

आपल्या राजकीय विरोधकांना वाट्टेल त्या पद्धतीने संपवणे, खोटेनाटे आरोप करून तुरुंगात डांबणे, बदनामीच्या मोहिमा उघडणे, असे भयंकर प्रकार हल्ली देशोदेशीच्या राजकारणात प्रचलित झाले आहे. अशाच राजकीय सूडनाटय़ातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता अटक झाली. पंतप्रधानपद भोगलेल्या नेत्यांना पाकिस्तानात एक तर तुरुंगात पाठवले जाते, फासावर लटकवले जाते किंवा देशाबाहेर जाऊन परागंदा जीवन जगावे लागते. पाकिस्तानच्या या काळय़ाकुट्ट इतिहासात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले. क्रिकेटच्या  खेळातून राजकारणाच्या खेळखंडोब्यात पडलेल्या इम्रान यांचे पुढे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर आज तरी कोणीच देऊ शकत नाही!

आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानात अकलेचीही कशी दिवाळखोरी आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, ती संपूर्ण कारवाई म्हणजे राजकीय सूडनाटय़ाचाच एक भाग आहे व या नाटय़ाचा अंत कसा होईल, हे आज तरी कुणी सांगू शकणार नाही. पाकिस्तानी रेंजर्स अर्थात पाकिस्तानी निमलष्करी दलाची एक तुकडी अचानक इस्लामाबादच्या हायकोर्टात घुसते काय, एखाद्या गुंडांच्या टोळीने हल्ला चढवावा अशा पद्धतीने पाकिस्तानी रेंजर्स कोर्ट रूमच्या काचा फोडत, आरडाओरडा करीत जामीन अर्जासाठी न्यायालयात आलेल्या इम्रान खान यांना कोर्ट रूममधून बखोटीला धरून फरफटत लष्कराच्या वाहनात नेऊन कोंबतात काय, हा साराच प्रकार भयंकर आहे. प्रसारमाध्यमांतून इम्रान यांच्या अटकेची जी दृश्ये समोर आली आहेत ती पाहता ही अटक आहे की अपहरण? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे पाकिस्तानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत असले तरी या कारवाईमागे मोठे षड्यंत्र आहे. पाकिस्तानचे लष्कर व तेथील शरीफ सरकारने मिळून हे कारस्थान रचले व इम्रान खान यांना अटक झाली. पंतप्रधान पदावर असताना इम्रान यांनी अल-कदीर ट्रस्टच्या एका विद्यापीठाला कोटय़वधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली, असा आरोप आहे. पाकिस्तानचे एक अब्जाधीश उद्योगपती मलिक रियाज यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटकेची कारवाई झाली, असे

वरकरणी भासवले जात

असले तरी अटकेमागे हेच नेमके कारण आहे, यावर खुद्द पाकिस्तानची जनताही विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्षात इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ व परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्या विरोधात उघडलेली आघाडी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोप हेच इम्रान यांच्या अटकेचे खरे कारण आहे. तीनच दिवसांपूर्वी शनिवारी लाहोर येथे ‘तहेरिक-ए-इन्साफ’ या आपल्या पक्षाच्या सभेत बोलताना इम्रान खान यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल फैसल नसीर यांनी दोन वेळा आपली हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट इम्रान यांनी केल्यानंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली. लष्करावर टीका करणारे पाकिस्तानातील एक पत्रकार अरशद शरीफ यांची आयएसआयने केनियामध्ये कशी हत्या घडवून आणली, तो किस्साही इम्रान यांनी लाहोरच्या सभेत ऐकवला होता. या आरोपांमुळे पिसाळलेल्या पाकिस्तानी लष्कर व आयएसआयने इम्रान यांना तुरुंगात डांबण्याचा निर्णय घेतला; मात्र लष्कराची बदनामी टाळण्यासाठी समोर प्रकरण उभे केले ते भ्रष्टाचाराचे. इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आता ठिकठिकाणी इम्रान यांच्या पक्षाचे समर्थक कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत. इस्लामाबादेत अनेक ठिकाणी

तोडफोड व जाळपोळीच्या

घटना घडल्यानंतर तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लष्कराच्या या दडपशाही विरुद्ध प्रथमच पाकिस्तानातील जनता  रस्त्यावर उतरल्याचे चित्र अनेक शहरांत दिसते आहे. संतप्त जनता रस्त्यावर दिसेल त्या सैनिकांवर हल्ले चढवत आहे. रावळपिंडीत तर पाक सैन्याच्या एका कोअर कमांडरचा बंगलाच जमावाने पेटवून दिला. बंदुकांची पर्वा न करता लोक लष्कराच्या छावण्यांमध्ये घुसून तोडफोड जाळपोळ करीत आहेत. लष्कराची प्रचंड दहशत असलेल्या पाकिस्तानात आजवर असे दृश्य कधीच दिसले नव्हते. हे लोण देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले तर लोकशाहीचे रक्षण व सैन्य आणि सरकारच्या मुस्कटदाबी विरुद्ध पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडकाही उडू शकतो. अटकेनंतर  इम्रान यांना मारहाण केली जात आहे व पाकिस्तानी रेंजर्स त्यांचा छळ करीत आहेत, असा आरोप इम्रान यांच्या पक्षाने केला आहे. आपल्या राजकीय विरोधकांना वाट्टेल त्या पद्धतीने संपवणे, खोटेनाटे आरोप करून तुरुंगात डांबणे, बदनामीच्या मोहिमा उघडणे, असे भयंकर प्रकार हल्ली देशोदेशीच्या राजकारणात प्रचलित झाले आहे. अशाच राजकीय सूडनाटय़ातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता अटक झाली. पंतप्रधानपद भोगलेल्या नेत्यांना पाकिस्तानात एक तर तुरुंगात पाठवले जाते, फासावर लटकवले जाते किंवा देशाबाहेर जाऊन परागंदा जीवन जगावे लागते. पाकिस्तानच्या या काळय़ाकुट्ट इतिहासात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले. क्रिकेटच्या  खेळातून राजकारणाच्या खेळखंडोब्यात पडलेल्या इम्रान यांचे पुढे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर आज तरी कोणीच देऊ शकत नाही!