सामना अग्रलेख – अमंगल ते नष्ट व्हावे!

कोरोनाचे जीवघेणे संकट दोन वर्षांपासून पाठ सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागतो आहे. विघ्नहर्त्या गणरायानेच आता कोरोनाच्या या संकटातून अखिल मानव जातीची मुक्तता करावी. जे जे अमंगल ते ते नष्ट व्हावे आणि मांगल्याचे, एकमेकांत मिसळण्याचे दिवस परत यावेत, हीच त्या मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना!

मराठी माणसाची अतूट श्रद्धा असलेला गणेशोत्सव आजपासून सुरू होतो आहे. विघ्नहर्ता गणराय हे मुळातच महाराष्ट्राचे लाडके दैवत. अशा मूर्तिमंत चैतन्य घेऊन येणाऱ्या मंगलमूर्तीचे आगमन होणार म्हटल्यानंतर मराठीजनांमध्ये आणि मनांमध्ये उत्साहाचे उधाण तर येणारच. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱया वर्षीदेखील नाइलाजाने या उत्साहाला थोडीशी मुरड घालावी लागणार आहे. एरवी अलोट गर्दीत, धूमधडाक्यात आणि अपूर्व जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही साधेपणानेच पार पाडावा लागेल. कोरोनाच्या दोन लाटांनी गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात दाणादाण उडवली. अवघे विश्वच ठप्प झाले. कोविडच्या विषाणूने हिंदुस्थानसह जगभरात धुमाकूळ घातला. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या प्राणघातक विषाणूने जगाच्या कानाकोपऱयात आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोकांचे बळी घेतले. अमेरिका, ब्रिटन आदी महासत्ता व प्रगत देशांमध्येही कोरोनाने भयंकर थैमान घातले. जगभरातील 20 कोटींहून अधिक लोकांना आजवर कोरोनाची बाधा झाली. अजूनही महाराष्ट्रात, देशात आणि जगातील अनेक देशांमध्ये रोज कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल होतच आहेत. अनेक रुग्णांची परिस्थिती आजही गंभीर आहे. रुग्ण दाखल होण्याचा आलेख पुन्हा वाढीस लागल्याने

कोरोनाची तिसरी लाट

उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, असे वैद्यकशास्त्रातील जाणकार मंडळी सांगत आहेत. या सगळ्या संवेदनशील पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात केवळ प्रशासनानेच नव्हे तर जनतेनेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे तितकेच आवश्यक आहे. गर्दी हीच कोरोनाच्या विषाणूची मुख्य वाहक असल्याचे आधीच्या दोन्ही लाटांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा करतानाच सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. या नियमांना सण किंवा उत्सवावरील निर्बंध न मानता शिस्तीचे बंधन समजून जागरूक नागरिकाचे कर्तव्य आपल्याला बजावावे लागेल. महाराष्ट्रासह सातासमुद्रापलीकडे जिथे कुठे मराठी माणूस वास्तव्याला असेल, त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरात आज श्री गणराय स्थानापन्न होतील. महाराष्ट्रात तर गणेशोत्सवाचा उत्साह अंमळ अधिकच असतो. मात्र, गणरायाचे आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये, गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये मुखदर्शनाची परवानगी देऊ नये आणि आरती व भजन, कीर्तनासारख्या कार्यक्रमांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, अशी

आचारसंहिता

सरकारने घालून दिली आहे. जनतेच्या जीविताची काळजी घेणे आणि जनतेचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठीच सरकारने या उपाययोजना केल्या आहेत, हे सर्वांनीच समजून घेणे आवश्यक आहे. कधीकाळी घरापुरता मर्यादित असलेल्या या सणाला लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेच्या मनातील असंतोषाला तोंड फोडण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. त्याला आता सवाशे वर्षांहून अधिक काळ लोटला. तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध जनतेला जागे करण्यासाठी जसा गणेशोत्सवाचा योग्य वापर झाला, त्याच धर्तीवर कोरोनाविषयी जनतेला अधिक जागरूक करण्यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्न करायला हवेत. जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी ते गरजेचे आहे. कोरोनाचे जीवघेणे संकट दोन वर्षांपासून पाठ सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत सलग दुसऱया वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागतो आहे. विघ्नहर्त्या गणरायानेच आता कोरोनाच्या या संकटातून अखिल मानव जातीची मुक्तता करावी. जे जे अमंगल ते ते नष्ट व्हावे आणि मांगल्याचे, एकमेकांत मिसळण्याचे दिवस परत यावेत, हीच त्या मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना!

आपली प्रतिक्रिया द्या