सामना अग्रलेख – एन्काऊंटरवर प्रश्न कशाला?

विकास दुबे हा एक गँगस्टर आणि दहशतवादी होता. तो पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या एन्काऊंटरवर प्रश्न कशाला? त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे दुबेने घडविलेल्या हत्याकांडातील आठ पोलिसांच्या हौतात्म्याचा अपमान आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना कधीकधी कठोर व्हावे लागते. मध्यंतरी तेलंगणा पोलिसांनी केलेले चार गुन्हेगारांचे एन्काऊंटर असेच गाजले. तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे स्वागत केले होते. विकास दुबेच्या एन्काऊंटरवर प्रश्न करणाऱ्यांनी विकास दुबेसारखे गँगस्टर निर्माण करणाऱ्या यंत्रणेचे ‘एन्काऊंटर’ कधी होणार का, याचा जाब विचारायला हवा.

आठ पोलिसांचे क्रूर हत्याकांड घडविणाऱ्या कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याचे नामोनिशाण उत्तर पोलिसांनी कायमचे मिटविले आहे. एका गुन्हेगाराचा, गँगस्टरचा, माफियाचा जसा अंत व्हायला हवा, तसाच विकास दुबेचा झाला. याला कोणी कथा म्हणो, पटकथा म्हणो किंवा काही, पण सत्य हेच आहे की, विकास दुबे नावाचा एक कर्दनकाळ संपला, त्यावर इतका शोक कशासाठी? विकास दुबेच्या एन्काऊंटरबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यात तथ्य असेलही, पण त्याच्या मृत्यूनंतर मानवतावाद्यांनी गळे काढत जो आक्रोश सुरू केला आहे, तो अनाकलनीय आहे. विकास दुबे हा काही संत-महात्मा किंवा कोणी समाजसेवक नव्हता. कोणाच्याही सुपाऱया घेऊन किड्या-मुंग्यांप्रमाणे व निर्दयीपणे माणसे मारणारा तो गुन्हेगार होता. त्यामुळे दुबेचा चकमकीतील मृत्यू कोणी एवढा मनाला लावून घेण्याचे कारणच काय? विश्वास बसो किंवा न बसो, पण पोलिसांनी विकास दुबेच्या एन्काऊंटरची जी कहाणी सांगितली ती अशी आहे. गुरुवारी मध्य प्रदेशात आत्मसमर्पण केल्यानंतर विकास दुबेला उज्जैनमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यात आले. स्पेशल टास्क फोर्सची तुकडी, कानपूर पोलिसांचे पथक आणि पोलीस गाडय़ांच्या ताफ्यासह कडेकोट बंदोबस्तात दुबेला घेऊन निघाले होते. नेमके कानपूरजवळ आल्यानंतरच दुबे बसलेल्या गाडीला अपघात झाला. उलटलेल्या गाडीतून दुबे बाहेर पडला. जखमी पोलिसांच्या कमरेचे पिस्तूल काढून पळत सुटला. पाठलाग करणाऱया पोलिसांवर त्याने गोळीबार केला आणि अखेर पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये तो मारला गेला. या चकमकीत काही पोलीसही जखमी झाले आणि छाती व कमरेत चार-पाच गोळ्या घुसल्यामुळे विकास दुबे नावाचा आतंक रक्ताच्या थारोळय़ात गतप्राण झाला. एक

गुन्हेगार संपला म्हणा

किंवा संपविला, काय फरक पडतो? गुन्हेगाराला सहानुभूती दाखवून कुठल्या पद्धतीने त्याला मारले, यात खोट काढून त्याच्या मृत्यूवर दुःख कशासाठी व्यक्त करायचे? विकास दुबेच्या एन्काऊंटरमुळे दुःखी-कष्टी झालेल्यांनी दुबे व त्याच्या टोळीने ठार केलेल्या आठ पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दुःख समजून घ्यायला हवे. 3 जुलै रोजी पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रा तीन पोलीस ठाण्यांच्या पथकासह बिकरू या गावातील विकास दुबेच्या मुसक्या आवळण्यासाठी गेले होते. मात्र, रस्त्यात जेसीबी लावून दुबेने पोलीस पथकाचा मार्ग अडविला आणि किल्ल्यालाही लाजविणाऱ्या आपल्या बंगल्याच्या छतावरून पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्या डीएसपी मिश्रांनी दुबेची दहशत मोडून काढण्यासाठी त्याचे तंगडे तोडण्याची कसम खाल्ली होती, त्याच अधिकाऱ्याचे पाय या क्रूरकर्म्याने कुऱहाडीने तोडले. आठ पोलिसांचे हत्याकांड घडविल्यानंतर डिझेल टाकून त्यांना जाळून टाकण्याचा क्रूर प्रयत्न दुबेने केला. पोलिसांचे बळी घेताना जराही दयामाया न दाखविणाऱ्या विकास दुबेला पोलिसांनी मात्र दयामाया दाखवायला हवी ही अपेक्षाच मुळी नादानपणाची आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशभरातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मानवतावादी आणि लोकशाहीचे संरक्षक काही म्हणोत, पण जनता मात्र या एन्काऊंटरचे स्वागत करीत आहे. पळूनच जायचे असते तर विकास दुबेने आत्मसमर्पण कशाला केले असते, असा प्रश्न काही बुद्धिवादी करत आहेत. लोकशाहीत असे प्रश्न उपस्थित करण्याची सूट असली तरी

पोलिसांचे मनोधैर्य खचेल

इतका थयथयाट मात्र बरा नव्हे. विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून पोलिसांवर चिखलफेक करण्याऐवजी हा खतरनाक गुन्हेगार आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशात कसा पोहोचला, नाक्या-नाक्यांवर प्रत्येक गाडी अडवून दुबे उज्जैनपर्यंत कसा आला, त्याला नेमके कोण मदत करत होते याचा शोध घेतला पाहिजे. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या नेत्याची पोलीस ठाण्यात घुसून हत्या करणारा हा नामचीन गुन्हेगार इतके दिवस मोकाट राहिलाच कसा? सुमारे 20 पोलीस हा खून उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि यापैकी एकही पोलीस कोर्टात दुबेविरुद्ध साक्ष देत नाही. आणखी मुडदे पाडण्यासाठी दुबे निर्दोष सुटतो, अनेकांचे खून पाडतो. एवढे होऊनही कानपूरच्या मोस्ट वॉण्टेड टॉप टेन गुन्हेगारांच्या यादीत विकास दुबेचे नाव झळकत नाही. दुबेच्या एन्काऊंटरबद्दल शोक करणाऱ्यांनी प्रश्न करायचेच तर या सडलेल्या व्यवस्थेवर करावेत. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शंभरावर गुन्हेगारांना पोलिसांनी ठार मारले. त्या कारवाईचे स्वागत झाले खरे, पण त्या मृत गुन्हेगारांच्या यादीत त्याच वेळी विकास दुबेचे नाव आले असते तर आठ पोलिसांचे हत्याकांड नक्कीच टळले असते. विकास दुबे हा काही सामान्य पाकीटमार नव्हता, तो एक गँगस्टर आणि दहशतवादी होता. तो पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या एन्काऊंटरवर प्रश्न कशाला? त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे दुबेने घडविलेल्या हत्याकांडातील आठ पोलिसांच्या हौतात्म्याचा अपमान आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना कधीकधी कठोर व्हावे लागते. महाराष्ट्रासह देशाच्या इतरही राज्यांत अशी अनेक एन्काऊंटर झाली आहेत. मध्यंतरी तेलंगणा पोलिसांनी केलेले चार गुन्हेगारांचे एन्काऊंटर असेच गाजले. तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे स्वागत केले होते. विकास दुबेच्या एन्काऊंटरवर प्रश्न करणाऱयांनी विकास दुबेसारखे गँगस्टर निर्माण करणाऱ्या यंत्रणेचे ‘एन्काऊंटर’ कधी होणार का, याचा जाब विचारायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या