
मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत. असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल!
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून इतर सर्व सणांमध्ये गुढीपाडव्याचे एक आगळेवेगळे स्थान आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नको तितक्या प्रभावामुळे 1 जानेवारीला सुरू होते तेच खरे नवीन वर्ष असा गैरसमज नवीन पिढीचा होऊ शकतो. मात्र मराठी पंचांगानुसार चैत्र मासारंभ म्हणजे गुढीपाडव्यालाच नूतन वर्षाची सुरुवात मानले जाते. सालाबादच्या रीतिरिवाजाप्रमाणे घराघरांवर आज गुढय़ा उभारल्या जातील. वेळूच्या काठीला रंगीबेरंगी भरजरी वस्त्रे परिधान करून त्यावर मंगल कलश ठेवलेली गुढी सकाळीच उभारली जाईल. साखरगाठीची माळ, फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी यांसह उभी राहणारी ही गुढी म्हणजे घराघरांवर फडकणारी विजयपताकाच. शिवाय दारात सुबक रांगोळी, गोडधोड, मिष्टान्नांची रेलचेल आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करत प्रत्येक मराठी माणूस गुढीपाडव्याचे मोठे हर्षोल्हासात स्वागत करतो. गुढीपाडव्याचे महत्त्व केवळ हिंदू धर्मापुरते मर्यादित नाही. अखिल ब्रह्मांडाचा अर्थात तमाम सृष्टीचा वाढदिवस म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. ब्रह्मदेवाने ज्या दिवशी या समस्त सृष्टीची निर्मिती केली, सप्तलोक अस्तित्वात आणले आणि विश्व निर्माण केले, तो हा दिवस. संपूर्ण
विश्वरचनेची निर्मिती झाल्यानंतर
ज्या दिवशी सूर्य पहिल्यांदा उगवला ती मंगल तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणूनच तर कुठलेही मंगलकार्य अथवा नवनिर्मितीच्या प्रकल्पासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अगदी डोळे झाकून निवडला जातो. हिंदू धर्मात जे प्रमुख साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यापैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा निःपात करून प्रभू रामचंद्र अयोध्यानगरीत परतले, तो हा दिवस. अयोध्येच्या प्रजेने घराघरांवर गुढय़ा उभारून आपल्या लाडक्या राजाचे स्वागत केले आणि तेव्हापासून रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली, असेही सांगितले जाते. शिशिर ऋतूतील पानगळ संपवून गुढीपाडव्याला वसंत ऋतूचे आगमन होते. वृक्षसंपदेवरील जुनी पाने झडून त्यांना नवी पालवी फुटू लागते. पळस, गुलमोहर इत्यादी वृक्षांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण दिसू लागते. आंबा बहरतो व पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या अर्थाने जीवसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडवणारा आणि निसर्गातील मरगळ झटकून नवचैतन्य बहाल करणारा सण म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा अशी झाली की, गुढीपाडव्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिसकावून घेतला. शेतकरी
वर्षभर काबाडकष्ट
करतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढवले आहे. मात्र या वाढीव उत्पादनास खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा भाव मिळत असल्याने यशाची आणि संपन्नतेची गुढी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. पेन्शनच्या मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेला संप आता सुदैवाने संपला आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे जे प्रचंड नुकसान झाले, त्याचे पंचनामे झटपट करणे आता सहज शक्य आहे. हे काम सत्वर झाले तर गुढीपाडव्यानंतर का होईना, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकेल. मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत. असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल!