
गुजरात म्हणजे मोदी-शहांचे होम पिच. पण तेच राज्य हातातून निसटले तर दिल्लीचे सिंहासनही डळमळीत होईल. त्यामुळेच गुजरातचा ‘पोपट’ जगवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिकस्त करत आहे. गुजरातच्या गदारोळात दिल्ली महापालिका निवडणुकीचा धुरळा त्यासाठीच उडविला गेला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे उद्योग, प्रकल्प, विकासाच्या योजना सारेकाही गुजरातला पळवून नेण्यामागे एकच रहस्य आहे. पोपट जगला पाहिजे. हा पोपट भाजपच्याच नजरकैदेत राहणार की गुजरातची जनता पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाची सुटका करणार हे 8 डिसेंबरलाच स्पष्ट होईल.
गुजरात विधानसभा निवडणुकीपाठोपाठ दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचाही बिगुल वाजला आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होईल, तर दिल्ली महापालिकेचे मतदान 4 डिसेंबर रोजी होईल. गुजरातची मतमोजणी हिमाचल प्रदेशसोबत 8 डिसेंबर रोजी, तर दिल्ली महापालिकेची एक दिवस आधी म्हणजे 7 डिसेंबर रोजी होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर केले जातील. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राबविणाऱ्या भाजपला गेल्या वेळी काँग्रेसने घाम फोडला होता, तर यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपच्या नाकात दम आणला आहे. केजरीवाल यांना गुजरातेत मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आधीच घाम फुटलेल्या भाजपच्या काळजीत भर पडली आहे. बहुधा त्यामुळेच केजरीवाल आणि ‘आप’च्या पायात दिल्ली महापालिका निवडणुकीचे ‘लोढणे’ टाकून त्यांची कोंडी करण्याची खेळी केली गेली आहे. गुजरात आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी केजरीवाल यांना आता लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यातही दिल्ली विधानसभेची पायरी म्हणून दिल्ली महापालिका महत्त्वाची असल्याने केजरीवाल यांना दिल्लीत एक पाय भक्कमपणे ठेवावा लागेल. त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये होऊ शकतो, असे गणित दिल्ली महापालिकेची निवडणूक याचदरम्यान लावण्यामागे असावे. खरे म्हणजे, गुजरात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम प्रत्यक्षात गेले दोन महिने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही आलटून पालटून दर आठवडय़ाला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातमध्ये दौरे करीत होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास प्रकल्पांची उद्घाटने, पायाभरणी वगैरे
समारंभी फार्सना
गुजरातमध्ये ऊत आला होता. मात्र, मोरबीच्या पूल दुर्घटनेमुळे तथाकथित गुजरात मॉडेलचा खरा चेहरा जगासमोर आला. पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे वारंवार दौरे आखून भाजपने शिजवलेली खिचडी एका क्षणात करपून गेली. मागे प. बंगालमधील पूल दुर्घटनेवरून भाजप व मोदींनी तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारविरुद्ध काहूर उठवले होते. पण नियतीचा न्याय पहा, ज्या प्रकारचा खड्डा भाजपने विरोधकांसाठी खोदला होता त्याच खड्डय़ात भाजप आज स्वतःच पडला. 25 दिवसांच्या निवडणूक प्रचारातील प्रत्येक प्रचार सभेत भाजपला मोरबीतील मृत्यूच्या तांडवाचा जाब विचारला जाईल. गुजरात हे राज्य तसे छोटे असले तरी भाजपची ती सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीला इतर कुठल्याही राज्यांपेक्षा अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे हे राज्य. शिवाय गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीकडे अगदीच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल किंवा रंगीत तालीम म्हणून पाहता येणार नाही. कारण गुजरातमध्ये एकतर विरोधकांकडे गमविण्यासारखे काही राहिलेले नाही आणि भाजपविरोधी मतांच्या फाटाफुटीमुळे कमविण्यासारखे काय उरले आहे, हाही प्रश्नच म्हणावा लागेल. वास्तविक, 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपला कडवी लढत दिली होती. 182 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या, तर 77 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. आकडय़ांचा विचार केला तर जेमतेम 22 चा फरक होता. याचा अर्थ इतकाच की, यावेळी काँग्रेसला गुजरातमध्ये खूप
मोठी संधी
होती. शिवाय बेफाम वाढलेली महागाई, गुजरातच्या समुद्रकिनारी पकडले गेलेले अब्जावधी रुपयांचे ड्रग्ज, दारूबंदी असतानाही गुजरातमध्ये गेलेले विषारी दारूचे बळी, मोरबीची ताजी पूल दुर्घटना आणि 27 वर्षांपासून असलेल्या सत्तेची ऍण्टी इन्कम्बन्सी असे सगळेच मुद्दे भाजपच्या विरोधात आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गोव्याप्रमाणेच गुजरात विधानसभेची निवडणूकही लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुरंगी झालेली निवडणूक आता तिरंगी होणार आहे. तिरंगी लढतीत भाजपविरोधी मतांची फाटाफूट होते व त्याचा लाभ भारतीय जनता पक्षालाच होतो हे गोव्यासह अनेक राज्यांत व लोकसभा निवडणुकीतही पुनः पुन्हा सिद्ध झाले आहे. तरीही गुजरातेत तिरंगी लढतीचेच पत्ते पिसले गेले. मोदी-शहांचे राज्य म्हणून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे साहजिकच साऱ्या देशाचे लक्ष आहे. गोष्टीतील राजाचा प्राण जसा पिंजऱ्यातील पोपटात अडकलेला असतो तसाच पंतप्रधान मोदींचा जीव गुजरातेत अडकला आहे. गुजरात म्हणजे मोदी-शहांचे होम पिच. पण तेच राज्य हातातून निसटले तर दिल्लीचे सिंहासनही डळमळीत होईल. त्यामुळेच गुजरातचा ‘पोपट’ जगवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिकस्त करत आहे. गुजरातच्या गदारोळात दिल्ली महापालिका निवडणुकीचा धुरळा त्यासाठीच उडविला गेला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे उद्योग, प्रकल्प, विकासाच्या योजना सारेकाही गुजरातला पळवून नेण्यामागे एकच रहस्य आहे. पोपट जगला पाहिजे. हा पोपट भाजपच्याच नजरकैदेत राहणार की गुजरातची जनता पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाची सुटका करणार हे 8 डिसेंबरलाच स्पष्ट होईल!