सामना अग्रलेख – पुणेकरांचे आनंद तरंग!

आनंदाबाबत कोणते शहर पुढे आणि कोणते मागे यावरून दुःख तरी कशाला करायचे? शेवटी सगळी शहरे एकाच महाराष्ट्र राज्याचे भाग आहेत. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी आणि जात-पात, प्रांत असा भेद न करता सर्वांना आनंदी ठेवणारी मुंबई ही तर अशीही आनंदनगरीच आहे. आता पुणेदेखील आनंदनगर ठरले. पुणेकरांनीही आनंदी आनंद गडे म्हणत जगायचे ठरविले असेल तर इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही. देशाच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये पुण्याने घेतलेल्या भरारीचा तोच अर्थ असावा. पुणेकरांच्या जीवनात उठलेले हे आनंद तरंग यापुढेही असेच कायम राहोत!

देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तीन शहरांची नावे झळकली आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर. एका सर्वेक्षणात हे निष्कर्ष समोर आले आहेत. महाराष्ट्रासाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे. खरे तर ज्या महाराष्ट्रात आनंदवनसारखे तीर्थक्षेत्र आहे, जी भूमी संतांची आणि पुण्यात्म्यांची आहे तेथील आणखीही अनेक शहरांची नावे या यादीत असायला काहीच हरकत नव्हती. महाराष्ट्र हा आनंदी राहतो आणि दुसऱयालाही आनंदी ठेवतो. त्यामुळे ही जी काही आनंदी शहरांची यादी जाहीर झाली आहे ते सर्व ठीक आहे. एका सर्वेक्षणाचा तो निष्कर्ष आहे. तो महाराष्ट्रासाठी आनंददायीच आहे, पण त्यातही पुणेकरांना जास्त आनंद देणारा आहे. आनंदी शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश हा एक भाग आणि त्याबाबत मुंबई-नागपूरला मागे टाकणे हा दुसरा भाग. एवढं सगळं म्हटल्यावर पुणेकरांना आनंदाचे डोही आनंद तरंग वाटणारच. मुळात पुणे आणि पुणेकर या नेहमीच्या समीकरणाचा विचार केला तर एखाद्याला या बातमीबद्दल आश्चर्य वाटू शकते. कारण पुणे आणि पुणेकरांची स्वभाववैशिष्टय़े हा पूर्वापार चर्चेचा विषय आहे. सध्या जमाना सोशल मीडियाचा असल्याने तर त्यासंदर्भातील पोस्टस्चा पाऊस समाजमाध्यमांवर बारा महिने पडत असतो. पुणे, पुणेकर, त्यांच्याविषयीचे वाद-प्रवाद आणि त्यावरून

झडणाऱया चर्चाही

नेहमीच्याच आहेत. या चर्चा करणारे झडकरीदेखील त्या हिरीरीने करीत असतात. म्हणजे पुणे आता खूप बदलले आहे, असे तावातावाने बोलणारेही पुणेकर अजून अगदी तसेच आहेत असेदेखील अभिमानाने सांगतात. परंपरागत स्वभाववैशिष्टय़े कटाक्षाने जपणारी, ती मिरविणारी आणि तीच कशी बरोबर आहेत, असे अट्टहासाने सांगणारी पक्की पुणेकर मंडळी आजही पुण्यात दिसतेच. त्यामुळे पुणे हे मुंबई आणि नागपूरपेक्षाही आनंदी ही बातमी वाचताना पुणेकर वगळता इतरांच्या ओठांचा चंबू होऊ शकतो. अर्थात पुण्याच्या हॅपीनेस इंडेक्सने भरारी घेतली असेल तर तेही ठीकच आहे. पुणे बदलले तसे पुणेकरही बदलले असतील, बदलत असतील, हॅपी गो लकी होत असतील तर त्यात इतरांनी दुःखी होण्यासारखे काय आहे? खरे तर कोरोना महामारीच्या काळात पुणेकरांवर कोसळलेले कोरोनाचे संकट भयंकर होते. याबाबतही पुणे हे मुंबई-नागपूरच्या पुढेच होते. पुणे आणि परिसर दीर्घकाळ कोरोना हॉट स्पॉट होता. त्यासाठी पुणेकरांच्या सवयी आणि त्या न बदलण्याचा त्यांचा स्वभाव कारणीभूत होता असे अनेकांनी त्यावेळी बोलून दाखविले होते हा भाग वेगळा! पण आता आनंदी राहण्यातही पुढचा क्रमांक मिळवून पुणेकरांनी ते आनंदीदेखील राहू शकतात हेच दाखवून दिले आहे.

पुणे तेथे काय उणे

हा डायलॉग तसा जुनाच आहे. त्यात आता पुणे आनंदातही नाही उणे याची भर पडली. जीवनाचा आपल्या पद्धतीने आस्वाद घेणारे, पटले तर खळखळून हसणारे, मनमुराद दाद देणारे, पण पटले नाही तर समोरच्याचे माप काढून ते त्याच्याच पदरात घालणारे पुणेकर आता आनंदी पुणेकर म्हणूनही ओळखले जातील. देशातील अव्वल 25 आनंदी शहरांत बारावा क्रमांक मिळवून पुण्याने आपले एम.एच.-12 हे समीकरणही सार्थ ठरविले. आनंदाबाबत कोणते शहर पुढे आणि कोणते मागे यावरून दुःख तरी कशाला करायचे? शेवटी सगळी शहरे एकाच महाराष्ट्र राज्याचे भाग आहेत. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी आणि जात-पात, प्रांत असा भेद न करता सर्वांना आनंदी ठेवणारी मुंबई ही तर अशीही आनंदनगरीच आहे. आता पुणेदेखील आनंदनगर ठरले. मुंबई काय किंवा पुणे काय, ही तशी जुळी भावंडेच. स्वभाव, गुणधर्म, वैशिष्टय़े, जातपुळी वेगळी असली म्हणून काय झाले? पुणेकरांनीही आनंदी आनंद गडे म्हणत जगायचे ठरविले असेल तर इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही. टिपीकल पुणेकर आनंदी पुणेकर म्हणूनही जीवनाचा आनंदानुभव घेऊ शकतात. देशाच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये पुण्याने घेतलेल्या भरारीचा तोच अर्थ असावा. पुणेकरांच्या जीवनात उठलेले हे आनंद तरंग यापुढेही असेच कायम राहोत!

आपली प्रतिक्रिया द्या