सामना अग्रलेख – अतिवृष्टीचे संकट!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होऊ शकते. आधीच राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असताना नाशिक, पुणे, पालघरसह काही जिह्यांत 14 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंग बाका आहे. राज्यातील नवीन सरकारने केवळ प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव न करता अतिवृष्टीचे संकट व आपग्रस्तांच्या मदतीसाठी एका गांभीर्याने सज्ज राहायला हवे!

जून महिन्यात तोंडचे पाणी पळविणाऱ्या पावसाने जुलै महिना सुरू झाल्यापासून मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोरदार हजेरी लावली आहे. कुठे मुसळधार अतिवृष्टी, तर कुठे मध्यम स्वरूपाची संततधार सुरू असल्याने अवघा महाराष्ट्र ओलाचिंब झाला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसारखा राक्षसी पाऊस झाला. पाऊस आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 9 जण मृत्युमुखी पडले. या नऊ जणांसह 1 जूनपासून आतापर्यंत गेलेल्या पाऊसबळींची संख्या आता 76 वर जाऊन पोहोचली आहे. कुठे विजा कोसळून, कुठे पुरात वाहून तर कुठे भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडून हे बळी गेले. सलग आठवडाभर अविश्रांतपणे कोसळणाऱ्या या ‘धो-धो’ पावसाने केवळ मनुष्यहानीच झाली असे नाही, तर अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली. दुभत्या गाई, म्हशी व बैलांसह आतापर्यंत 125 गुरांच्या मृत्यूची नोंद सरकार दप्तरी झाली असली, तरी पंचनामे होईपर्यंत हा आकडा कितीतरी मोठा झालेला असेल. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आठशेहून अधिक घरे या पावसाने जमीनदोस्त केली. पुराचा फटका बसलेल्या भागातील सुमारे पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. काही ठिकाणी पुराच्या तडाख्याने आपग्रस्तांच्या डोळ्यांत अश्रू आणले, तर  मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेल्या ठिकाणी मात्र दुबार पेरणीचे संकट टळल्याने काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, असे

परस्परविरोधी चित्र

सध्या राज्यात दिसते आहे. जून महिन्यात महाराष्ट्राच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने हवामान खात्याचा यंदाचा अंदाज सपशेल खोटा ठरतो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. राज्याच्या अनेक भागांत खरिपाच्या पेरण्याही रखडल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी जूनमधील तुरळक पावसानंतर हवामान खात्याच्या भाकितावर विसंबून पेरण्या लगबगीने उरकून घेतल्या, ते शेतकरी नव्याने पेरणी करावी लागेल म्हणून चिंताक्रांत झाले होते. कधी या जिल्ह्यात तर कधी त्या तालुक्यात, असा विरळ पाऊस जून महिन्याने पाहिला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत पेरणीनंतर उगवलेल्या रोपांनी माना टाकायला सुरुवात झाली होती. मात्र, 30 जूननंतर सुरू झालेल्या आषाढसरींनी या पिकांना नक्कीच जीवदान दिले आहे. 11 जुलैपर्यंत झालेल्या पावसाने जून व जुलै या दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यात सरासरीपेक्षा 19 टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि एरवी कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडय़ात गेला आठवडाभर ‘धो धो’ पाऊस कोसळत आहे. नाशिक, कोल्हापूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तर पावसाने कहरच केला. या जिल्ह्यांतील सर्व नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरले आहेत. निम्म्याहून अधिक पावसाळा शिल्लक असतानाच अतिवृष्टी झालेल्या अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी

रस्ते व पूल पाण्याखाली गेले

तर नदी-नाल्यांकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले. रस्ते जलमय झाल्याने अनेक जिल्ह्यांत वाहतूक ठप्प झाली, तर पुराच्या पाण्याने शेकडो एकर जमिनीमधील पेरलेल्या बियाण्यांसह शेतजमीन खरवडून गेली. केवळ महाराष्ट्रातच नाही, उत्तरेकडील हिमाचल प्रदेशपासून ते दक्षिणेतील केरळपर्यंत सर्वच राज्यांमध्ये पावसाचे धूमशान सुरू आहे. गुजरातमध्ये तर मुसळधार पावसाने मोठाच हाहाकार उडविला आहे. संपूर्ण अहमदाबाद जलमय झाले असून अवघ्या शहराचेच ‘स्वीमिंग पुला’मध्ये रूपांतर झाले आहे. एरवी मुंबईत टीचभर पाणी साचले तरी मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ झाली म्हणून पालिकेची बदनामी करणारी तोंडे अहमदाबादमधील भयंकर परिस्थितीवर मात्र अवाक्षरही काढताना दिसत नाहीत. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत राजकारण व्हायला नको हे खरेच, पण हा न्याय देशातील सर्वच शहरांना का लागू नये? असो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होऊ शकते. आधीच राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असताना नाशिक, पुणे, पालघरसह काही जिल्ह्यांत 14 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंग बाका आहे. राज्यातील नवीन सरकारने केवळ प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव न करता अतिवृष्टीचे संकट व आपग्रस्तांच्या मदतीसाठी एका गांभीर्याने सज्ज राहायला हवे!