सामना अग्रलेख – ओल्या दुष्काळाचे संकट!

आधी सोसाट्याचा वारा, मग भरदिवसा अंधारून टाकणाऱया काळ्य़ा ढगांचे आक्रमण, त्यापाठोपाठ ढगांचा गडगडाट व कानठळ्या बसवणाऱ्या विजांच्या कडकडाटाची भयंकर जुगलबंदी आणि विध्वंसक पाऊस असे राक्षसी तांडव गेले काही दिवस महाराष्ट्र अनुभवतो आहे. मराठवाडा, विदर्भ या कायम दुष्काळी भागांबरोबरच उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावरही ओल्या दुष्काळाचे संकट कोसळल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱ्यांनाच. राज्यातील शेतकऱ्यांचे सरकार या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना कदापि वाऱयावर सोडणार नाही. बळीराजालाही याची खात्री आहेच!

‘आले निसर्गाच्या मना, तिथे कोणाचे चालेना’ अशी परिस्थिती सध्या परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रावर ओढवली आहे. जिकडे पाहावे तिकडे भयंकर पाऊस, रौद्ररूप धारण केलेल्या नद्या, महापूर आणि गावेच काय, शहरेही जलमय अशी बिकट परिस्थिती अनेक जिह्यांत निर्माण झाली आहे. सतत कोसळणारी संकटे पाहता 2020 हे आपत्ती वर्ष म्हणूनच खरे तर आता जाहीर व्हायला हवे. एकापाठोपाठ ओढवणाऱया संकटांची मालिका महाराष्ट्राची पाठच सोडायला तयार नाही. पावसाळ्य़ाच्या प्रारंभी निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीत मोठा विध्वंस घडवला, तेव्हापासून डेरेदाखल झालेले अस्मानी संकट पावसाळ्य़ाचे चार महिने संपले तरी माघार घ्यायला तयार नाही. कोरोनाचे वैश्विक संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नसतानाच परतीचा पाऊसही मानगूट सोडायला तयार नसल्यामुळे ‘घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं’ अशी कठीण परिस्थिती ओढवताना दिसत आहे. शेतातील उभी पिके, कापून ठेवलेली पिके परतीच्या भयंकर पावसात उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले. शेती आणि शेतकऱयांना उभारी मिळूच द्यायची नाही असेच बहुधा निसर्गाने ठरवले असावे. प्रत्येक वेळी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेतो. कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी चक्रीवादळ, तर कधी अतिवृष्टी अशी संकटे शेतकऱयांच्या जणू पाचवीलाच पुजली आहेत. गेल्या चार दिवसांत

भयंकर थैमान

घालणाऱया परतीच्या पावसानेही शेतीचे असेच नुकसान केले. सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोकणात तर जणू आभाळच कोसळले. ढगफुटीसारख्या पडणाऱया पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला. रेड ऍलर्ट मिळालेल्या मुंबई, ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला. मात्र सर्वाधिक फटका बसला तो पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील काही जिह्यांना. संततधार कोसळणाऱया तुफानी पावसामुळे काही तासांतच नद्यांनी आपले पात्र सोडून लगतच्या शेतशिवारांना जलसमाधी दिली. पुण्यासारख्या शहरातही रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यासह पुण्यातील टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता, बाजीराव रस्ता व अन्यत्र पाणी तुंबले. एरवी मुंबई शहरात दहा मिनिटे पाणी तुंबले तरी महापालिकेच्या नावाने ठणाणा करणाऱयांची पुण्यातील साचलेल्या पाण्याबद्दल मात्र दातखीळ बसली. कमी वेळेत पडणारा विक्रमी पाऊस ही आपत्तीच असते. त्याचे राजकारण करायला नको हे आता तरी या मंडळींना कळायला हवे. वास्तविक ऋतुचक्रानुसार जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चारच महिने पावसाळ्य़ाचे. साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यास परतीचा पाऊस सुरू होतो आणि अंगाची काहिली करणारी उष्णता घेऊन ऑक्टोबर महिना उजाडतो. यंदा मात्र आक्रीतच घडते आहे. सप्टेंबरच्या अखेरीस

परतीचा पाऊस

सुरू झाला तो अजूनही धो धो कोसळतोच आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टय़ाचे क्षेत्र निर्माण झाले आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू झाला. आधी सोसाटय़ाचा वारा, मग भरदिवसा अंधारून टाकणाऱया काळ्य़ा ढगांचे आक्रमण, त्यापाठोपाठ ढगांचा गडगडाट व कानठळ्य़ा बसवणाऱया विजांच्या कडकडाटाची भयंकर जुगलबंदी आणि विध्वंसक पाऊस असे राक्षसी तांडव गेले काही दिवस महाराष्ट्र अनुभवतो आहे. विठुरायाच्या पंढरपुरात तर चंद्रभागा नदीच्या किनाऱयावर असलेला घाट कोसळून सहा जण मृत्युमुखी पडले. राज्याच्या इतरही भागांत विजा कोसळून आणि पुरात वाहून मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. परतीला तयारच नसलेल्या या पावसाने मका, कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर ही पिके नेस्तनाबूत केली. कोकणातही कापणीला आलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. मराठवाडा, विदर्भ या कायम दुष्काळी भागांबरोबरच उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावरही ओल्या दुष्काळाचे संकट कोसळल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱयांनाच. राज्यातील शेतकऱयांचे सरकार या कठीण प्रसंगात शेतकऱयांना कदापि वाऱयावर सोडणार नाही. बळीराजालाही याची खात्री आहेच!

आपली प्रतिक्रिया द्या