आजचा अग्रलेख – पाऊस आला धावून!

5749

जून महिन्याचा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा तब्बल बारा वर्षांनंतर अवघा महाराष्ट्र जून महिन्यात पावसात न्हाऊन निघाला. पावसाळ्य़ाच्या पहिल्याच महिन्यात खरिपाच्या सुमारे 60 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आता मुंबई-कोकणातही जूनच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात केली आहे. पाऊस आला धावून आणि कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेले संकट गेले वाहून असे झाले आणि यातून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती मिळाली तर त्यासारखा सुदिन कोणता असेल!

मान्सूनच्या आगमनाची जोरदार सलामी दिल्यानंतर मुंबई आणि परिसरात दडी मारून बसलेल्या पावसाने दणक्यात पुनरागमन केले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने मुंबईला चिंबचिंब केले. ठाणे, पालघर पट्टय़ातही पावसाने चांगली हजेरी लावली. रायगड, कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि कोकणातील रायगड जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आणखी दोन-तीन दिवस मुंबई शहर, उपनगरे आणि पालघर व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच तीन महिन्यांपासून अहोरात्र कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करणाऱया प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वास्तविक, मुंबई आणि कोकणाला पावसाची प्रतीक्षा कधी करावीच लागत नाही. सर्वसाधारणपणे मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनच कोकण-मुंबईतून होते. शिवाय येथील पावसाचा डौल आणि थाटही काही औरच असतो. मात्र यंदा मान्सूनपाठोपाठ आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्यामुळे मान्सून सक्रिय होण्याच्या मार्गात अडसर निर्माण झाला. अर्थात

‘निसर्ग’च्या प्रकोपानंतरही

मुंबई वगळता उर्वरित देशभरात मान्सूनने चांगलीच झेप घेतली. किंबहुना एरवीपेक्षा या वर्षी मान्सूनने अल्पावधीतच अवघा देश व्यापून टाकला. मुंबई आणि कोकणात मात्र जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्यात पाऊस ही सगळी कसर भरून काढण्याची चिन्हे आहेत. मुंबईत मोठय़ा ब्रेकनंतर आलेल्या पावसाची पहिल्या बारा तासांतच 54 मि.मी. नोंद झाली. जलसंचयामुळे सर्वतोमुखी झालेल्या माटुंगा, अंधेरी, कुर्ला, लालबाग, शीव, दादर, वरळी वगैरे भागांतील सखल परिसरात पाणी साचले. हिंदमाता परिसरात वाहतूक दुसऱया मार्गाने वळवावी लागली, तर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करावा लागला. अर्थात मुंबईतील पावसाचा चाकरमान्यांना जो फटका बसतो ते चित्र शुक्रवारी यंदा लॉक डाऊन असल्याने दिसले नाही. अनेक दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईकरांना घामाघूम करून सोडले होते. या उकाडय़ावर गार शिडकावा करण्याचे काम पावसाने केले आहे. पावसाळय़ाचा पहिला महिना आता जवळपास सरला आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीच मान्सूनने वेळेवर वर्दी दिली खरी, पण मुंबईपेक्षा उर्वरित महाराष्ट्रातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. खास करून एरवी दुष्काळात भरडून निघणाऱया मराठवाडय़ात जून महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्य महाराष्ट्रातही

दमदार पावसाची

नोंद झाली. सोलापूर जिह्यात सरासरीपेक्षा 111 टक्के अधिक इतका विक्रमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ संभाजीनगर जिह्यात 110 टक्के अधिक, नगरमध्ये 103 टक्के, बीडमध्ये 91 टक्के, लातूरमध्ये 79 टक्के, तर जालना जिह्यात सरासरीपेक्षा 72 टक्के अधिक पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, मराठवाडय़ातील धाराशीव, हिंगोली, परभणी आणि विदर्भातील बुलढाणा, वाशीम या जिह्यांनीही जूनमधील पावसाची सरासरी ओलांडली आहे. पालघर, मुंबई, अकोला व यवतमाळ इथेच फक्त सरासरीपेक्षा 22 ते 36 टक्के कमी पावसाची नोंद झाली. एकूणच जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जून महिन्याचा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा तब्बल बारा वर्षांनंतर अवघा महाराष्ट्र जून महिन्यात पावसात न्हाऊन निघाला. पावसाळ्य़ाच्या पहिल्याच महिन्यात खरिपाच्या सुमारे 60 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आता मुंबई-कोकणातही जूनच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात केली आहे. पाऊस आला धावून आणि कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेले संकट गेले वाहून असे झाले आणि यातून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती मिळाली तर त्यासारखा सुदिन कोणता असेल!

आपली प्रतिक्रिया द्या