सामना अग्रलेख – एक अपेशी झुंज!

2137

हिंगणघाटच्या पीडितेसाठी समाज नंतर रस्त्यावर उतरला, मोर्चे काढले, बंद पुकारले; पण त्यातीलच दोनपाच लोकांनी वेळीच पुढे येऊन त्या नराधमास रोखले असते तरी पीडितेला वाचवता आले असते. आता पोलीस, कायदा व सरकारला दोष देणाऱ्या समाजाची काही जबाबदारी आहे की नाही? दिल्लीतील निर्भयानंतर समाज जागा झाला, पण अबलांवरील हे अत्याचार थांबले नाहीत. समाजाने प्रायश्चित्त घ्यावे असे हे हिंगणघाटच्या निर्भयाचे प्रकरण आहे. तिची झुंज अपेशी ठरली. एका अबलेची ही शेवटची झुंज ठरावी.

हिंगणघाटमधील पीडितेचा मृत्यू झाला असून झुंज अपयशी ठरली आहे. दिल्लीत निर्भयाकांड घडले व देश हादरला. असे गुन्हे करणाऱ्या नराधमांना जरब बसावी म्हणून संसदेने फाशीसारखे नवे कायदे मंजूर करूनही हिंगणघाटसारखे संतापजनक प्रकार घडत आहेत. कायद्याचा धाक नाही हे कारण जितके खरे, त्यापेक्षा समाजातील अशा विकृतीला अंत नाही हे समजून घेतले पाहिजे. बलात्कारासारख्या प्रकरणी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली, पण अशा प्रकरणात आतापर्यंत किती गुन्हेगारांना फाशी झाली? निर्भया प्रकरणातील चारही आरोपी कायद्याच्या पळवाटा शोधून स्वतःचा बचाव करीत आहेत. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळूनही त्यांच्या फाशीची अंमलबजावणी होऊ शकली नाही. फाशीची तारीख नक्की झाली, फाशीचा दोर आणि जल्लाद तिहार तुरुंगात पोहोचले; पण आरोपीच्या वकिलाने असा पेच टाकला की, सर्व आरोपींची फाशी पुन्हा अधांतरी लटकली. हा आमचा नपुंसक कायदा. कसली मानवता आणि कसला कायदा! हैदराबाद येथेही मध्यंतरी तरुणीवर सामूहिक अत्याचार करून जाळून टाकण्यात आले होते. त्यातील आरोपी नंतर हैदराबाद पोलिसांच्या कारवाईत ठार झाले होते. नेहमीप्रमाणे तथाकथित मानवतावाद्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी देशभरातून पोलिसी कारवाईचे स्वागतच झाले होते. बलात्काऱ्यांना शिक्षा झाली तरी कायदेशीर मार्गांनीच तिची अंमलबजावणी लांबवली जाते हे वास्तव आता समाजाला सहन होण्यापलीकडे गेले आहे. त्यामुळेच बलात्काऱ्यांना

हैदराबाद पोलिसांप्रमाणेच

शिक्षा’ मिळावी अशी जनभावना बनली आहे. हैदराबाद पोलिसांचे समर्थन करण्याची वेळ हिंगणघाट प्रकरणी नागरिकांवर येऊ नये हीच न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारला विनंती, अशी जळजळीत प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही व्यक्त केली आहे. ती प्रातिनिधिकच म्हटली पाहिजे. दिल्लीत निर्भयाची आई आक्रोश करीत आहे आणि हिंगणघाटमध्ये दुसऱ्या ‘निर्भया’चे पालक दुःखाची किंकाळी मारीत आहेत. हिंगणघाटमधील पीडितेच्या नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगितले. कायद्यावर विश्वास नाही, आरोपीला आमच्या ताब्यात द्या असे त्यांचे म्हणणे. कायदा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळेच अशा मागण्या होतात. बलात्कार आणि हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळत नाही, तर पीडितांच्या नातेवाईकांनाच शिक्षा भोगावी लागते. हिंगणघाटमधील पीडितेच्या कुटुंबाला सरकार नुकसानभरपाई देणार आहे व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल असे सांगण्यात आले. सरकारचे हे असे आणि इतकेच काम असते काय? हिंगणघाट पीडितेचा खटला ‘फास्ट ट्रक’ पद्धतीने चालवू असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने डॉक्टरांचे विशेष पथक नागपूरला पाठवूनही उपयोग झाला नाही. कारण भररस्त्यात पेट्रोल ओतून या मुलीला जाळले. रस्त्यावर ती तडफडत होती, मदतीसाठी याचना करीत होती, पण समाज हा अशा वेळी मुर्दाड आणि बघ्याच्या भूमिकेत असतो. हिंगणघाटच्या पीडितेसाठी

समाज नंतर रस्त्यावर

उतरला, मोर्चे काढले, बंद पुकारले, पण त्यातीलच दोन-पाच लोकांनी वेळीच पुढे येऊन त्या नराधमास रोखले असते तरी पीडितेला वाचवता आले असते. आता पोलीस, कायदा व सरकारला दोष देणाऱ्या समाजाची काही जबाबदारी आहे की नाही? दिल्लीत निर्भयाचे प्रकरण घडले तेव्हा रात्रीचा सुनसान अंधार होता व रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते, पण हिंगणघाटचे प्रकरण दिवसाढवळ्या भररस्त्यावर घडले. त्यामुळे समाजानेदेखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जबाबदारीचा ढेकूण समाजाला इतक्या सहजतेने झटकता येणार नाही. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे गेल्या आठ दिवसांत वाढली हे चित्र चांगले नाही. आरोपीला शिक्षा होईल हे नक्की, पण कधी होईल त्यावर शंका व्यक्त होताना दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणातील आरोपीला कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून त्याला फासावर लटकवू आणि महिला अत्याचारांबाबतचा कायदा आणखी कडक करू, असा शब्द जनतेला दिला आहे. राज्य सरकार तो नक्कीच खरा करेल, पण तरीही हिंगणघाटचे जळीतकांड हा महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेस लागलेला डाग आहे हे नक्की. त्याचे राजकारण करणे हेसुद्धा तितकेच दुःखद आहे. दिल्लीतील निर्भयानंतर समाज जागा झाला, पण अबलांवरील हे अत्याचार थांबले नाहीत. समाजाने प्रायश्चित्त घ्यावे असे हे हिंगणघाटच्या निर्भयाचे प्रकरण आहे. तिची झुंज अपेशी ठरली. एका अबलेची ही शेवटची झुंज ठरावी.

आपली प्रतिक्रिया द्या