सामना अग्रलेख – इम्रान यांच्यावरील हल्ला, सूडनाट्याचा नवा अंक

पाकिस्तानी लष्कराचे लाडके म्हणूनच इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा लाभ झाला होता. मात्र नंतरच्या काळात हे संबंध बिनसले आणि आता तर ते एका टोकावर आले आहेत. त्यातून इम्रान यांना ‘गोळीबाराचा इशारा’ दिला गेला का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. त्याला न जुमानता इम्रानमियांनी त्यांचा मोर्चा सुरूच ठेवला तर पाकिस्तानी लष्कर कितपत टोकाची भूमिका घेते हे भविष्यात दिसेलच. त्या देशात सुरू असलेला राजकीय सूडनाट्याचा नवा अंक आणि इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याने आधीच दिवाळखोरी आणि आर्थिक अराजकाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणाऱ्या पाकिस्तानला आता राजकीय निर्नायकीच्याही उंबरठ्यावर उभे केले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील गोळीबाराने त्या देशातील राजकीय सूडनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे. आपल्यावर अशा प्रकारचा हल्ला होणार, असे आरोप इम्रान यांनी केले आहेत. त्यावर हल्ल्याचे पुरावे इम्रान खान यांनी सादर करावेत, त्यात तथ्य आढळले तर आपण आणि गृहमंत्री दोघेही राजीनामा देऊ, असे प्रत्युत्तर सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिले आहे. हे आरोप-प्रत्यारोप आणखी काही काळ सुरूच राहतील. परंतु पाकिस्तानातील भीषण अराजकाची स्थिती आणखी भयंकर होऊ शकते यांचे संकेतच इम्रान खान यांच्यावरील गोळीबाराने दिले आहेत. मुळात पाकिस्तानचा जन्मच हिंदुस्थानच्या रक्तरंजित फाळणीतून झाला. त्यानंतरही तेथे लोकशाहीच्या मुखवट्याआड लष्करशाही आणि हुकूमशाहीच नांदली. लोकशाही मार्गाने बनलेले पंतप्रधान असोत किंवा लष्करी राजवटीच्या माध्यमातून बनलेले राष्ट्राध्यक्ष असोत, त्यांच्यामागे ‘माजी’ बिरुद लागले रे लागले की, नव्या राजवटीच्या राजकीय सूडाच्या कारवाईचे शुक्लकाष्ठही त्यांच्या मागे लागते. वेगवेगळ्या खटल्यांचा ससेमिरा मागे लागतो. काहींना दुसऱ्या देशात राजाश्रय घ्यावा लागतो. तुरुंगात काही काळ घालवावा लागतो, कधी कधी फासावरही लटकविले जाते. काहींचा ‘अपघाती’ मृत्यू होतो तर काहींवर खुनी हल्ल्यात

जीव गमविण्याची वेळ

येते. इम्रान खान यांच्यावरही 3 नोव्हेंबर रोजी असाच खुनी हल्ला झाला. त्यांचे सुदैव की ते थोडक्यात बचावले. गेल्या एप्रिलमध्ये पंतप्रधानपद सोडण्यास भाग पडल्यापासूनच इम्रान खान यांच्यामागे वेगवेगळ्या कारवायांचे शुक्लकाष्ठ लावण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानी सर्वोच्च निवडणूक मंडळाने इम्रान यांना एका प्रकरणात पाच वर्षे सार्वजनिक पदांवर राहण्यास अपात्र ठरविले होते. त्याआधी ‘आयजी’ आणि न्यायाधीश यांना ‘धमकी दिल्याच्या’ आरोपावरून त्यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. पाकिस्तानी सरकारच्या वरिष्ठ तपास यंत्रणा हात धुऊन त्यांच्यामागे लागल्या होत्या. एवढा सगळा दबाव असूनही इम्रान यांनी शाहबाज सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्याविरोधात जाहीर भूमिका घेण्याचे, त्यांच्यावर टीका करण्याचे थांबवले नव्हते. शाहबाज सरकारविरोधात त्यांनी अलीकडेच सुरू केलेला ‘हकीकी आझाद मार्च’, म्हणजे ‘खरेखुरे स्वातंत्र्य’ मागणारा मोर्चा त्याचाच एक भाग होता. याच यात्रेदरम्यान 3 नोव्हेंबर रोजी गुजरानवाला या शहरात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबार करणाऱ्या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे. इम्रान यांनी स्वतःची तुलना पैगंबरांशी केल्याने आपण त्यांना गोळी मारली, अशी कबुली हल्लेखोर तरुणाने दिली आहे ती हास्यास्पदच म्हणायला हवी. इम्रान यांनी शाहबाज सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्याविरोधात

उठविलेले काहूर

आणि त्यांच्या ‘हकीकी आझादी मार्च’ला तरुणवर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तेथील जनसामान्यांत रोष वाढत आहे. हे सगळे शाहबाज सरकारबरोबरच पाकिस्तानी लष्कराच्या आजवरच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देणारे ठरू शकते. त्याचा संबंध या गोळीबाराशी नाही, असे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. पाकिस्तानातील तथाकथित लोकशाहीला तेथील लष्कर आणि आयएसआय ही पाताळयंत्री गुप्तचर संस्था यांच्या पोलादी पंजातच वावरावे लागते. इम्रान खान यांनी त्यावरच घाव घालायला सुरुवात केल्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. वास्तविक, पाकिस्तानी लष्कराचे लाडके म्हणूनच इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा लाभ झाला होता. मात्र नंतरच्या काळात हे संबंध बिनसले आणि आता तर ते एका टोकावर आले आहेत. त्यातून इम्रान यांना ‘गोळीबाराचा इशारा’ दिला गेला का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. मात्र त्याला न जुमानता इम्रानमियांनी त्यांचा मोर्चा सुरूच ठेवला तर पाकिस्तानी लष्कर कितपत टोकाची भूमिका घेते हे भविष्यात दिसेलच. त्या देशात सुरू असलेला राजकीय सूडनाट्याचा नवा अंक आणि इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याने आधीच दिवाळखोरी आणि आर्थिक अराजकाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणाऱ्या पाकिस्तानला आता राजकीय निर्नायकीच्याही उंबरठ्यावर उभे केले आहे.