सामना अग्रलेख – चीनशी कोणी लढायचे?

हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!

चीनने माघार घेतली व दोन देशांतील सैन्य कमांडरांमध्ये चर्चा होऊन तणाव निवळला हे जे रोज सांगितले जात होते त्यातला फोलपणा समोर आला आहे. लडाख व चीनच्या सीमेवर तणाव कायम असून हिंदुस्थानची डोकेदुखी वाढेल अशा हालचाली चीन करत आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच हे चीनचे राष्ट्रीय धोरण असावे. चीनला युद्ध नको आहे, पण सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून हिंदुस्थानला स्वस्थता लाभू द्यायची नाही, असे त्यांचे धोरण आहे. गलवान खोऱयातून आपले सैनिक व वाहने मागे घेण्याची तयारी चीनने दाखवली. पण त्याच वेळी चिनी लष्कराने लडाखच्या डेपसांग सेक्टरमध्ये नवे तंबू ठोकले. तोफा, रणगाडे आणले. लष्कर वाढवले. चीनची हेलिकॉप्टर तेथे उतरू लागली. म्हणजे काही झाले तरी चिनी सैन्य लडाख सोडायला तयार नाही. म्हणजे चीनने आता नवी चढाई केली आहे व ते आमच्या हद्दीतून मागे हटायला तयार नाहीत. चीनला युद्ध करायचे नाही, पण युद्धाची टांगती तलवार आमच्या डोक्यावर ठेवायची आहे. त्यामुळे पाकिस्तान, नेपाळसारखी राष्ट्रे चीनची अंकित राहतील. चीन दगाबाज आहे व त्याच्या कुरापती सदैव सुरूच राहतील. या कुरापती थांबविण्यासाठी आमची योजना काय आहे? योजना अशी आहे की, हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री रशियाचा दौरा करून आले व तेथून ते शस्त्र, दारूगोळा (ब्रह्मास्त्र) मागवणार आहेत. दुसरे असे की, भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील प्रमुख लोकांनी चीनवर

शाब्दिक हल्ले

सुरू केले आहेत. त्यामुळे सीमेवर हालचाली करणारी लाल माकडे घाबरून पळून जातील असे त्यांना वाटते. तिसरे म्हणजे, सरकारी कृपावंत मीडिया व सोशल माध्यमांवरील रिकाम्या फौजा ‘‘भारतीय कूटनीतीपुढे चीनची माघार किंवा शरणागती’’ अशा बातम्यांचे हवाबाण हरडे सोडून लोकांना भ्रमित करीत आहेत. शेवटची व अत्यंत महत्त्वाची युद्धनीती म्हणून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न विचारणाऱयांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करून त्यांच्यावरच चीनचे हस्तक किंवा दलाल असल्याचे ठपके ठेवले जात आहेत. काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारले. त्यावर उत्तर द्यायचे राहिले बाजूला. काँगेसला चीनकडून पैसे मिळत आहेत, अशी पुरवणी माहिती भाजप नेत्यांनी दिली. काँगेसला पैसे मिळतात म्हणजे काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली असा फुगा भाजपने फोडला आहे. भाजपने त्या देणगीची माहिती प्रसिद्ध केल्याने सीमेवरील चीनच्या हालचालीवर निर्बंध येणार आहेत काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे जे 20 जवान शहीद झाले त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे. गेल्या सहा वर्षांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन वेळा मोदी यांच्या आग्रहास्तव हिंदुस्थानात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष मोदी यांच्या गुजरातेत

पाहुणचार

झोडून गेले. म्हणजे मोदी सरकार व चीनचे संबंध मैत्रीचेच होते, पण चीनने आता दगाबाजी केली हे सत्य आहे. एका बाजूला चर्चेचे नाटक करायचे व दुसऱया बाजूला सीमेवर युद्धाच्या तोफा धडधडत ठेवायच्या हे चीनचे धोरण नवे नाही. गलवान खोऱयातून सैन्य-माघारीचे नाटक करायचे व दुसऱया बाजूला डेपसांग पठारावर सैन्य घुसवायचे. डेपसांगमधून मागे हटायचे व अरुणाचलमध्ये घुसायचे. हिंदुस्थानला चर्चेत ठेवून हवे ते घडवायचे ही चीनची नीती आहे. अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा. तसा तो उभा राहिलेला दिसत आहे. हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. काँगेस पक्षाच्या राजीव फाऊंडेशनला कोणत्या देशातून पैसे मिळाले यावर भाजपने यापूर्वी अनेकदा चर्चा केल्या. त्यात नवीन काय? आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!

आपली प्रतिक्रिया द्या