आजचा अग्रलेख – 21 दिवस नाही; 2021 पर्यंत कोरोना युद्ध!

7307

चीनसोबत जगणे शक्य नाही यावर शिक्कामोर्तब होऊनही चीनचा शेजार आपल्याला वागवावाच लागणार आहे. तीच परिस्थिती चिनी व्हायरस म्हणजे कोरोना संक्रमणाच्या बाबतीतही आहे. कोरोना कितीही नको म्हटला तरी तो तूर्त तरी हटणारा नाही. थोडक्यात, चीन व त्यांनी पसरवलेला कोरोना व्हायरस राहणारच आहे. महाभारतापेक्षा कोरोनाविरुद्धचे आधुनिक भारताचे युद्ध अवघड आहे. 18 दिवसांत महाभारत युद्ध संपले होते. त्या युद्धात भीष्म पितामहांपासून अनेक योद्धे व सैन्य कामी आले. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत संपलेच नाही. ते 2021 पर्यंत चालेल. हिंदुस्थानने कोरोना संख्येत जगात उच्चांक गाठला ही त्याचीच सुरुवात. बाकी उद्योग, अर्थव्यवस्था, जीवनमान, रोजगार सर्वच कोसळले आहे. तरीही लढावेच लागेल!

कोरोनाग्रस्तांच्या यादीत हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. गेल्या चोवीस तासांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारांवर गेली. हे भयंकर तर आहेच, पण आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाचे दुर्दैवदेखील आहे. पुन्हा देशात महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर तामीळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा नंबर येतो. महाराष्ट्राने दोन लाखांचा, तामीळनाडू, दिल्लीने लाखाचा आकडा पार केला. रविवारी देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 87 हजारांवर म्हणजे जवळ जवळ 7 लाख झाली. हा उच्चांक ठरला. त्यामुळे आपण या आकडेवारीत रशियाला मागे टाकले. ही चढती भाजणी अशीच सुरू राहिली तर आपण या दुर्दैवी प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचू. महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. कोरोनाचे युद्ध आपण 21 दिवसांत जिंकूच जिंकू असा आत्मविश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता, पण शंभर दिवस उलटले तरी कोरोना मैदानात आहे व लढणारे थकले आहेत. महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे व रुग्ण मोठय़ा प्रमाणात बरे होऊन घरी जात आहेत, तरीही काही ठिकाणची स्थिती अस्वस्थ करणारी आहे. महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 6 हजार 555 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यात ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. एकटय़ा ठाणे जिल्हय़ात आतापर्यंत 40 हजार रुग्णांची नोंद झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. रुग्णांना उपचार आणि खाटांसाठी वणवण करावी लागू नये यासाठी तेथील प्रशासन

आटोकाट प्रयत्न

करीत आहे. तिकडे पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाचा धोका वाढला आहे. पुण्याचे महापौर श्री. मोहोळ हे सहकुटुंब कोरोनाग्रस्त झाले. पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचा बळी कोरोनाने घेतला आहे. राजकारणी, लोकप्रतिनिधी, पोलीस, आरोग्य कर्मचारी, प्रशासनाचे मुख्य लोक हे कोरोना युद्धात धाराशायी होत आहेत. हे सर्व घडत आहे ते काही देशाला व राज्यांना शोभादायक नाही. ‘लॉक डाऊनचे नियोजन केले नाही तसे अनलॉकचेही होत आहे काय? हे उघडा, ते उघडा, लोकांना बाहेर पडू द्या, किती दिवस कोंडून राहायचे?’ असे प्रश्न विचारले जात आहेत, पण घराबाहेर पडले की, कोरोनाचे दूत उभेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणात लॉक डाऊन शिथिल केले, पण रेल्वे बंद आहेत, सलून उघडले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज लवकरच खुले करू असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र याचा अर्थ सर्व आलबेल आहे व कोरोनाचे संकट संपलेय असे होत नाही. कोरोना राहणारच आहे व कोरोनाबरोबर जगायची तयारी केली पाहिजे. या प्रवासात धोका आहे, पण स्वतःला सुरक्षित ठेवून हा धोक्याचा प्रवास प्रत्येकाला करावा लागेल. कोरोनावर तूर्त तरी उपाय नाही. अमूक हे ठराविक औषध घेतल्याने कोरोना ‘छू मंतर’ होईल असा दावा कोणी करू शकत नाही. काळजी घेणे व कोरोना विषाणूशी लढण्यास शरीर व मन तयार करणे हाच उपचार तूर्तास आहे. कोरोनावरील लस 2021 पूर्वी शक्य नाही. जगात चाचण्या सुरू आहेत. पण ते फक्त प्रयोग आहेत. म्हणजे 2021 पर्यंत तरी कोरोनाला उशाशी घेऊनच झोपावे लागेल. एकूण सहा हिंदुस्थानी कंपन्या

‘कोव्हिड-19’च्या लसीवर

काम करीत आहेत. त्यात को-व्हॅक्सिन व ‘झायकोव्ह-डी’ या दोन लसी जवळपास तयार असल्याचे सांगितले जात आहे. जगात 11 लसी मानवी चाचण्यांसाठी तयार आहेत, पण कोणत्याही स्थितीत यापैकी एकही लस 2021च्या आधी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सीमेवर चीनचे व देशात चिनी व्हायरसचे संकट कायम राहील हे वास्तव स्वीकारावे लागेल. चिनी घुसखोरी व त्याच्या विस्तारवादास रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयोग व चाचण्या झाल्या. ‘कोरोनासोबत जगावे’ असा जो मंत्र आता सांगितला जात आहे तसे ‘हिंदी-चिनी भाई भाई’ असे सांगत चीनसोबत जगण्याची तयारीही केली गेली. तरीही चीनने आक्रमण करणे सोडले नाहीच. चीनसोबत जगणे शक्य नाही यावर शिक्कामोर्तब होऊनही चीनचा शेजार आपल्याला वागवावाच लागणार आहे. तीच परिस्थिती चिनी व्हायरस म्हणजे कोरोना संक्रमणाच्या बाबतीतही आहे. कोरोना कितीही नको म्हटला तरी तो तूर्त तरी हटणारा नाही. थोडक्यात, चीन व त्यांनी पसरवलेला कोरोना व्हायरस राहणारच आहे. महाभारतापेक्षा कोरोनाविरुद्धचे आधुनिक भारताचे युद्ध अवघड आहे. 18 दिवसांत महाभारत युद्ध संपले होते. त्या युद्धात भीष्म पितामहांपासून अनेक योद्धे व सैन्य कामी आले. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत संपलेच नाही. ते 2021 पर्यंत चालेल. हिंदुस्थानने कोरोना संख्येत जगात उच्चांक गाठला ही त्याचीच सुरुवात. बाकी उद्योग, अर्थव्यवस्था, जीवनमान, रोजगार सर्वच कोसळले आहे. तरीही लढावेच लागेल!

आपली प्रतिक्रिया द्या