सामना अग्रलेख – उपासमारीचा देश!

आपल्या राजवटीत सारं कसं आलबेल आहे, सगळीकडे कसा आनंदी आनंद पसरला आहे, याचेच गोडवे जो तो राष्ट्रप्रमुख आणि त्यांचे स्तुतीपाठक सदैव गात असतात. हिंदुस्थानपुरते बोलायचे तर ग्लोबल हंगर इंडेक्सचा हा अहवाल आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण भूक आणि उपासमारीच्या बाबतीत हिंदुस्थान नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानच्याही मागच्या रांगेत जाऊन बसला आहे. ‘उपासमारीचा देश’ ही ओळख आता मिटवावीच लागेल. राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला हातात हात घालून त्यासाठी काम करावे लागेल.

आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने हिंदुस्थानची घोडदौड सुरू आहे असे ढोल आपल्याकडे अधूनमधून वाजत असतात. गेल्या पाच-सात वर्षांत तर अशा वल्गना अंमळ अधिकच वाढल्या आहेत. आर्थिक महासत्ता होण्यासाठी कशी दोनच बोटे उरली आहेत, अशा गमज्या मारणारा पाळीव फौजफाटा होलसेलात उपलब्ध असल्यामुळे अर्थव्यवस्थेत उभारी दिसो पिंवा नसो, पण मोबाईलचे पडदे आणि सोशल मीडियावर मात्र आर्थिक महासत्तेचा वारू चौखूर उधळताना दिसतो. हिंदुस्थान आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला यावा हे प्रत्येक देशवासीयाचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण व्हायलाच हवे, पण या स्वप्नातून खडबडून जागे करणारी एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. भूक आणि कुपोषणाच्या नोंदी घेऊन जगभरातील विपन्नावस्थेवर लक्ष ठेवणाऱया ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने भुकेच्या बाबतीत हिंदुस्थानात असलेल्या विदारक स्थितीचे जळजळीत वास्तव समोर आणले आहे. 2015 मध्ये म्हणजे सहा वर्षांपूर्वी भुकेच्या निर्देशांकात जगातील एकूण देशांच्या संख्येत हिंदुस्थान 93व्या स्थानावर होता. उपासमारीतील हे स्थान आता शंभरी ओलांडून 101 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत समाविष्ट असलेल्या 117 देशांमध्ये हिंदुस्थानचा क्रमांक इतक्या वरचा लागला असेल तर ‘अच्छे दिन’ नेमके कोणाचे आले? हा प्रश्नच आहे. जर्मनीची ‘वेल्ट हंगर हिल्फे’ आणि आयर्लंडची ‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ या

गरिबी व उपासमारीच्या

मुद्दय़ावर काम करणाऱया सेवाभावी संस्था दरवर्षी संयुक्तपणे जागतिक उपासमारीचा आढावा घेऊन गरिबी आणि दारिद्रय़ातून होणाऱया उपासमारीची भयंकर परिस्थिती जगभरातील राष्ट्रांसमोर मांडत असतात. या दोन संस्थांच्या अहवालामुळे भूक आणि उपासमारीच्या बाबतीत आपण कुठे आहोत, हे प्रत्येक देशाला कळते. या अहवालाची नोंद घेऊन कोणते देश उपासमार कमी करण्यासाठी काय प्रयत्न करतात, हा मुद्दा अलाहिदा असला तरी त्या त्या देशातील जनतेपर्यंत किमान अशा अहवालाच्या निमित्ताने वास्तविक चित्र तरी पोहोचते, हेदेखील कमी नाही. अन्यथा आपल्या राजवटीत सारं कसं आलबेल आहे, सगळीकडे कसा आनंदी आनंद पसरला आहे, याचेच गोडवे जो तो राष्ट्रप्रमुख आणि त्यांचे स्तुतीपाठक सदैव गात असतात. हिंदुस्थानपुरते बोलायचे तर ग्लोबल हंगर इंडेक्सचा हा अहवाल आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण भूक आणि उपासमारीच्या बाबतीत हिंदुस्थान नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानच्याही मागच्या रांगेत जाऊन बसला आहे. उपाशीपोटी झोपणाऱया लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान 94 व्या, नेपाळ 73 व्या, श्रीलंका 66 व्या आणि बांगलादेश 88 व्या स्थानावर आहे. म्हणजेच उपासमारी रोखण्याच्या कामात या सर्व देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची कामगिरी अत्यंत सुमार म्हणावी अशी आहे. दारिद्रय़ आणि गरिबीने जर्जर झालेल्या पापुआ न्यू गिनी (102), नायजेरिया (103), कांगो (105) आणि अफगाणिस्तान

हे देश तेवढे

हिंदुस्थानच्या (101) पुढे असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आली आहे. अर्थात या विदारक परिस्थितीला केवळ राज्यकर्तेच जबाबदार आहेत असे नाही. आपल्या समाज व्यवस्थेतील दोषही उपासमारीच्या गंभीर समस्येला तेवढेच जबाबदार आहेत. ज्या देशातील कोटय़वधी लोक दररोज एकवेळ तरी उपाशीपोटी झोपतात, त्याच देशातील एकूण अन्नधान्य व खाद्य उत्पादनापैकी 40 टक्के खाद्यान्ने वापराअभावी सडतात, नष्ट होतात. देशातील गोदामांमध्ये तर अन्नधान्याची नासाडी होतेच, पण देशात दररोज शिजविल्या जाणाऱया अन्नापैकी एक तृतीयांश अन्न उकिरडय़ावर आणि नाल्यांमध्ये फेकून दिले जाते. हिंदुस्थानात दररोज किमान 244 कोटी रुपयांचे म्हणजेच दरवर्षी 88 हजार 800 कोटी रुपयांचे तयार अन्न कचरापुंडय़ांत टाकून दिले जाते आणि दुसरीकडे आपल्याच देशातील कोटय़वधी गोरगरीब जनता उपाशीपोटी झोपते, हा एक प्रकारचा क्रूर विरोधाभास आहे. भुकेने व्याकूळ असलेल्या आणि उपासमार सहन करणाऱया लोकसंख्येच्या देशात हिंदुस्थानसारखा प्राचीन खंडप्राय देश शंभरावरच्या स्थानावर पोहोचावा हे चित्र देशवासीयांची मान शरमेने खाली झुकवणारे आहे. ‘उपासमारीचा देश’ ही ओळख आता मिटवावीच लागेल. राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला हातात हात घालून त्यासाठी काम करावे लागेल.