सामना अग्रलेख – कश्मीरातील रक्तपात, महाराष्ट्रात आक्रोश!

8766

कश्मीरात हिंदुस्थानी सैन्याचे नव्हे तर फक्त पाकड्यांचेच रक्ताचे पाट वाहत आहेत अशा बातम्या पसरवून सत्यस्थितीत फरक पडणार नाही. कारण संदीप सावंतसारख्या जवानांचे तिरंग्यात लपेटलेले मृतदेह गावोगावी जात आहेत. कश्मीरातील रक्तपात आणि महाराष्ट्रात होणारा शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे. सर्जिकल स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनोबल खचेल हा भ्रम ठरला आहे. उलट हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

कश्मीरात नवीन वर्षाची सुरुवात काही चांगली झाली नाही. साताऱ्याचे जवान संदीप सावंत कश्मीरात शहीद झाले आहेत. नौशेरा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात संदीप सावंत यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले. गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील सात-आठ जवानांना वीरमरण आले आहे. यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जबाबदार नाही हे समजून घेतले पाहिजे. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे असे वारंवार सांगितले जात आहे, पण ते किती सत्य आहे? 370 कलम हटवले हे चांगलेच झाले. त्याआधी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक झाले, पण इतके करूनही कश्मीरातील परिस्थिती सुधारली काय? दहशतवादी हल्ले सुरूच आहेत, पण त्याच्या बातम्या देण्यावर नियंत्रण आहे. बंदुकांची दणादण आणि किंकाळय़ा थांबलेल्या नाहीत. फक्त या किंकाळय़ा नसून आनंदाचे चित्कार आहेत असे सांगायचे आहे. कश्मीरमधील संपर्क व दळणवळण सेवा अद्यापि धडपणे सुरू झालेली नाही. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ‘एसएमएस’ सेवा सुरू केली, पण इंटरनेट सेवा अद्यापि बंदच आहे. 5 ऑगस्टला 370 कलम रद्द केल्यापासून कश्मीरात नक्की काय चालले आहे हे कळायला मार्ग नाही. फक्त चकमकीत आपले जवान बलिदान करीत असल्याच्या बातम्या तेवढ्या येत आहेत. जवानांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव त्यांच्या गावात पाठवावेच लागतात म्हणून, नाही तर त्यांच्या वीरमरणाच्या बातम्याही दडपण्यात आल्या असत्या.

अलीकडेच कोल्हापूरचे जवान जोतिबा चौघुले (वय 37) यांना वीरमरण आले. महाराष्ट्राच्या इतरही जिल्हय़ांतून अधूनमधून सीमेवर शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव पोहोचल्याच्या आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याच्या बातम्या येतच आहेत, कश्मीरातील, सीमेवरील हा रक्तपात आणि महाराष्ट्रासह इतरही राज्यांतील शहीद जवानांच्या कुटुंबीयांमध्ये जो आक्रोश आहे त्यावर किती राजकीय पक्ष मतप्रदर्शन करताना दिसतात? कश्मीरच्या सीमेवर ज्याअर्थी जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत याचा अर्थ असा की, कश्मीरात सगळे काही आलबेल नाही व पाक पुरस्कृत दहशतवाद आणि घुसखोरी थांबलेली नाही. तरीही सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय ‘टामटूम’ करण्याचा प्रयत्न झाला. बालाकोटवरील हल्ल्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यावर एक देशवासीय म्हणून आम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा, पण त्याच जागेवर पुन्हा नवे तळ निर्माण झाले असून हिंदुस्थानविरोधी कारवायांना बळ मिळू लागले आहे हेसुद्धा नाकारता येत नाही. पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा सांगतात तेच खरे आहे आणि कश्मीरात हिंदुस्थानी सैन्याचे नव्हे तर फक्त पाकडय़ांचेच रक्ताचे पाट वाहत आहेत अशा बातम्या पसरवून सत्यस्थितीत फरक पडणार नाही. कारण संदीप सावंतसारख्या जवानांचे तिरंग्यात लपेटलेले मृतदेह गावोगावी जात आहेत व लोकांच्या मनातील चीड वाढत आहे.

कश्मीरातील रक्तपात आणि महाराष्ट्रात होणारा शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे. सर्जिकल स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनोबल खचेल हा भ्रम ठरला आहे. उलट हल्ले मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानला कसे वठणीवर आणले याविषयी सरकार पक्षाने गाजावाजा तर खूप केला, पण पाकिस्तानचे वाकडे शेपूट खरेच सरळ झाले काय? उलट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून रोजच युद्धबंदीच्या चिंधडय़ा उडवल्या जात आहेत. कधी पूंछ भागात, कधी राजौरीत तर कधी कुठे गस्त घालणाऱया हिंदुस्थानी जवानांवर पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले चढवले जातात. जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांत आणि सरहद्दीवरील गावांत पाकिस्तानातून रात्री-अपरात्री अचानक तोफगोळय़ांचा वर्षाव होतो. यात हिंदुस्थानी जवान शहीद होतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानी सुभेदार वीरेश कुलहट्टी असेच शहीद झाले. कालपरवाही दोन जवान शहीद झाले. एकही आठवडा जात नाही ज्या आठवडय़ात पाकने शस्त्र्ासंधी मोडली नाही आणि हिंदुस्थानी जवानाचे पार्थिव सीमेवरून त्याच्या गावाकडे  पोहोचले नाही. यावर मात्र कोणीच बोलत नाही. नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या मते चीनवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांची दिशा बरोबर आहे, पण पाकिस्तानच्या सीमा आजही आमच्याच रक्ताने भिजत आहेत. कश्मीरात शांतता नाहीच व चीनच्या सीमेवरही अस्वस्थता आहे. सीमा अस्वस्थ राहणे देशाच्या प्रकृतीस धोकादायक आहे!

आपली प्रतिक्रिया द्या