सामना अग्रलेख – पाच जवानांचे हत्याकांड; सूड उगवलाच पाहिजे!

जम्मूकश्मीरचे तमाम विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर कश्मीरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत. इतर धर्मीयांनी कश्मीरात पाऊलच ठेवू नये या विकृत मानसिकतेतून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अतिरेक्यांनी कश्मीरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चारच दिवसांपूर्वी कश्मिरी पंडित असलेल्या शिक्षकाची आणि शीख धर्मीय महिला प्राचार्याची हत्या केल्यानंतर बेभान झालेल्या अतिरेक्यांनी आता लष्कराच्या पाच जवानांचा बळी घेण्याचे धाडस केले आहे. सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचापाँच के पच्चीसअसा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे.

जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना सोमवारी आपले पाच जवान शहीद झाले. ही बातमी अस्वस्थ करणारी आहे. कधी सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारात, तर कधी पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात किंवा चकमकीत हिंदुस्थानी जवान धारातीर्थी पडल्याच्या घटना जेव्हा समोर येतात, तेव्हा कुठल्याही राष्ट्रभक्त नागरिकाचे रक्त उसळल्याशिवाय राहत नाही. पुन्हा थेट युद्धाला तोंड फुटलेले नसताना लपून-छपून केलेल्या भ्याड हल्ल्यांत आपल्या जवानांना जीव गमवावा लागतो हे अधिक संतापजनक आहे. गेले काही दिवस पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरातील शीख आणि हिंदू धर्मीयांना वेचून ठार मारण्याचे सत्र सुरू केले आहे. अतिरेक्यांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची धरपकड करण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र या शोधमोहिमेतच अतिरेक्यांनी घातपात केला आणि अतिरेक्यांचा पाठलाग करणाऱ्या आपल्या पाच जवानांना प्राण गमवावे लागले. पूंछ जिह्याच्या सुरनकोट भागात ही घटना घडली. हिंदुस्थान-पाक नियंत्रण रेषेजवळ असलेल्या जंगलात तीन-चार अतिरेकी दबा धरून बसले आहेत आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर

क्षणाचाही विलंब न करता

एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जवानांचे एक पथक अतिरेक्यांना शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने रवाना झाले. अतिरेक्यांचा माग काढत आपले जवान दाट जंगलात पोहोचताच मोठय़ा वृक्षांच्या मागे लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही ‘मूँहतोड जवाब’ देण्याचा प्रयत्न केला खरा, पण या चकमकीत दुर्दैवाने लपून वार करणारे अतिरेकी वरचढ ठरले. झाडांमागून अचानक झालेल्या गोळीबाराने जवानांच्या शरीराची चाळण झाली. लष्करातील जेसीओ दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य चार जवान गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांना तातडीने नजीकच्या लष्करी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, पाचही जवान शहीद झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी अतिरिक्त कुमक पाठवून या जंगलातील संपूर्ण भागाची नाकाबंदी केली आहे. पाच जवानांचे  हत्याकांड घडविणाऱ्या अतिरेक्यांना शोधून त्यांच्या चिंधडय़ा उडविल्याशिवाय हिंदुस्थानी मन शांत होणार नाही. सुरक्षा दलाचे जवानही आपल्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, जम्मू-कश्मीरात पुनःपुन्हा जाणारे जवानांचे हे बळी आणखी किती वर्षे आपल्याला सहन करावे लागणार आहेत? कश्मीरात अलीकडे घडणाऱ्या

हिंसाचाराच्या घटना

पाहता नव्वदच्या दशकात अतिरेक्यांनी जी दहशत निर्माण केली होती, त्याच दिशेने तर पुन्हा कश्मीरची वाटचाल सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या राक्षसी अत्याचारांमुळे हजारो कश्मिरी पंडित कच्च्या-बच्च्यांसह कश्मीरातील सगळी मालमत्ता सोडून गेली पंचवीस वर्षे तात्पुरत्या राहुटय़ांमध्ये नरकयातना भोगत आहेत. कश्मिरी पंडितांचा विजनवास संपावा म्हणून कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-कश्मीरचे तमाम विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर कश्मीरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत. इतर धर्मीयांनी कश्मीरात पाऊलच ठेवू नये या विकृत मानसिकतेतून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अतिरेक्यांनी कश्मीरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चारच दिवसांपूर्वी कश्मिरी पंडित असलेल्या शिक्षकाची आणि शीख धर्मीय महिला प्राचार्याची हत्या केल्यानंतर बेभान झालेल्या अतिरेक्यांनी आता लष्कराच्या पाच जवानांचा बळी घेण्याचे धाडस केले आहे. सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा ‘पाँच के पच्चीस’ असा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या