सामना अग्रलेख – शरणागतांची कानटोचणी!

अन्यायाविरुद्ध विद्रोह करणे हा अनेक लेखकांसाठी आज देशद्रोहाचा मामला ठरलाच आहे. 2014 सालीच स्वातंत्र्य मिळाले असे सांगणाऱ्यांच्या देशात शेकडो निर्दोष लोक सरकारी निर्णयांचे बळी ठरले आहेत. नोटाबंदी, कोविड, शेतकरी आंदोलनात सात वर्षांत लोकांना मरण पत्करावे लागले. हे सर्व लेखकांचे, कवींचे चिंतनाचे विषय का ठरू नयेत? जावेद अख्तर यांनी नेमके त्याच मुद्दय़ावर बोट ठेवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले असले तरी जावेद अख्तर यांच्या भाषणावर आणखी काही काळ चर्चा ही होत राहील!

नाशिकच्या 94 व्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेला काय दिले यापेक्षा देशाला आणि समाजाला काय दिले? हाच प्रश्न आहे. महाराष्ट्राने देशाला सदैव देण्याचीच भूमिका घेतली. त्यात मराठी भाषेचेही योगदान आहे. नाशकातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी साहित्यिकांना आवाहन केले आहे की, ‘‘शरणागत होऊ नका, गुडघे टेकू नका.’’ मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून श्री. जावेद यांनी संपूर्ण देशाला हा संदेश दिला आहे. जावेद अख्तर हे परखड वक्ते व कवी आहेत. त्यांच्या लिखाणातली आग अमिताभसारख्या नटाच्या मुखातून बाहेर पडली. देशात सध्या अघोषित निर्बंधांचा काळ सुरू आहे. लिहिणारे व बोलणारे दबले आहेत, तर काही जण या दबावतंत्राची वाहवा करण्यातच धन्यता मानीत आहेत. हे भय आहे. त्यांना उद्देशून जावेद यांनी सांगितले,

‘‘जो बात कहने डरते है सब

तू वो बात लिख।

इतनी अंधेरी थी न पहेले कभी रात लिख।।’’

जावेद अख्तर यांनी नाशिकच्या भूमीवरून साहित्यिकांना केलेले हे आवाहन महत्त्वाचे आहे. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा हाच त्यांच्या भाषणाचा गाभा आहे. नाशिक ही कवी कुसुमाग्रजांची नगरी, त्याचप्रमाणे क्रांतिकारी कवी-लेखक विनायक दामोदर सावरकरांची भूमी. साहित्य संमेलन नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले तसे एखाद्या प्रमुख दालनास अथवा प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव देऊन त्यांना मानवंदना देता आली असती, पण सावरकरांना थोडे लांबच ठेवले गेले. अर्थात, ‘‘शरणागत होऊ नका’’ हा अख्तर यांचा संदेश

सावरकरांच्याच भूमिकेशी जुळता

आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकरांमधील लेखकाने स्पष्टच सांगितले होते, ‘‘लेखण्या मोडा व हाती बंदुका घ्या!’’ पण सावरकर सोडले तर कोणीच हाती बंदूक घेतली नाही. लिहिण्या-बोलण्यावर निर्बंध येतात तेव्हा लेखक मंडळी सगळय़ात आधी बोटचेपी भूमिका घेतात व आपण कसे कुंपणावरचे, तटस्थ आहोत असे दाखवतात. श्री. अख्तर यांनी साहित्यिकांच्या या धोरणावर हल्ला चढविला आहे. पूर्वी ठामपणे बोलणाऱ्यांना धोकादायक म्हटले जायचे. आता त्यांना देशद्रोही ठरवले जाते. तरीही आपण बोलते राहिले पाहिजे, असे श्री. अख्तर सांगतात. ‘‘लोकांना एकमेकांशी सहज बोलता यावे म्हणून भाषा निर्माण झाली, पण भाषा हीच आजच्या संवादातील भिंत झाली आहे. भाषेच्या पलीकडे जग आहे हे आपण  विसरलो आहोत. अख्तर पुढे सांगतात ते महत्त्वाचे. लोकशाहीमध्ये सरकार आणि राजकारणी जसे महत्त्वाचे, तसेच साहित्यिक आणि सामान्य नागरिक यांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याचे बळ जात, धर्म, प्रांत या भेदाभेदात नव्हे, तर भारतीयांच्या एकतेतून येते. साहित्यिक सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत नसतील तर तुमची लेखणी काय कामाची? हा सवाल त्यांना विचारायला हवा, असेही श्री. अख्तर सांगतात व सद्यस्थितीवर त्यांनी लेखकांचेही कान उपटले आहेत. भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळय़ा-मेंढय़ांच्या शेपटय़ांप्रमाणे आहेत. या शेपटय़ा देशाच्या कामाच्या नाहीत. स्पष्ट बोलणाऱ्यांना घेराबंदी करून टोचले जाते. जावेद अख्तरही त्या परिस्थितीतून गेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या मनातील वेदना उसळून बाहेर पडली. आणीबाणीत लेखन स्वातंत्र्याची गळचेपी झाली, त्याचा शोक आजही व्यक्त केला जातो. त्या काळातही

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हाल

झाले. लेखण्या शरणागत झाल्या. काही वृत्तपत्रांना टाळी लागली. काहींनी तर विनाकारण गुडघे टेकले. त्यावर लालकृष्ण आडवाणी यांनी चांगले भाष्य केले होते, ‘‘त्यांनी फक्त वाकायला सांगितले होते. तुम्ही सर्व रांगायलाच लागलात!’’ आजही वेगळे चित्र नाही. अशा परिस्थितीत लेखक, पत्रकारांनी नाही बोलायचे तर कोणी बोलायचे? मराठी भाषा म्हणजे क्रांतीची फुले आहेत. संतसाहित्यापासून क्रांती, विद्रोही लेखनापर्यंत सतत भाषेच्या ठिणग्या उडत राहिल्या. मराठी भाषेने जनांची मने आणि मनगटे पेटवलीच आहेत. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे शब्दसामर्थ्य अग्निफुलांच्या सामर्थ्याप्रमाणे होते. वीर सावरकरसुद्धा त्याच पंथातले. ‘‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’’ असे सांगणारे कुसुमाग्रज व ‘‘मोडले असेल घर, पण मोडला नाही कणा; पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’’, असा आत्मविश्वास देणारे कुसुमाग्रज हे लढणाऱ्यांचेच नेते होते. दुर्गा भागवतांसारख्या लेखिका आणीबाणीतील निर्बंधांविरोधात बोलत आणि लिहीत राहिल्या व शेवटी तुरुंगात गेल्या. आजही लेखक, कवी, पत्रकार तुरुंगात जात आहेत. अन्यायाविरुद्ध विद्रोह करणे हा अनेक लेखकांसाठी आज देशद्रोहाचा मामला ठरलाच आहे. लेखक, पत्रकारांवर पाळत ठेवली जात आहे. 2014 सालीच स्वातंत्र्य मिळाले असे सांगणाऱ्यांच्या देशात शेकडो निर्दोष लोक सरकारी निर्णयांचे बळी ठरले आहेत. नोटाबंदी, कोविड, शेतकरी आंदोलनात सात वर्षांत लोकांना मरण पत्करावे लागले. हे सर्व लेखकांचे, कवींचे चिंतनाचे विषय का ठरू नयेत? जावेद अख्तर यांनी नेमके त्याच मुद्दय़ावर बोट ठेवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले असले तरी जावेद अख्तर यांच्या भाषणावर आणखी काही काळ चर्चा ही होत राहील!