सामना अग्रलेख – कश्मीरची ढाल, इम्रान खान के हसीन सपने

पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. त्यात आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. अर्थात, अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार हा प्रश्न सुटावा या त्यांच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल? कारण हिंदुस्थानसाठी कश्मीर हा प्रश्न कुठे आहे?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक कश्मीर प्रश्नाची उबळ आली आहे. कश्मीर प्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरजच उरणार नाही, असा साक्षात्कार इम्रान यांना झाला आहे. अर्थात, त्यातही त्यांचे वाकडे शेपूट वळवळलेच आहे. नेहमीप्रमाणे इम्रान यांनी त्यात अमेरिकेचे नाक ओढूनताणून खुपसलेच आहे. अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो, असे इम्रान महाशय म्हणाले आहेत. मुळात कश्मीरविषयी अमेरिकेसारख्या तिसऱया देशाचा संबंध येतोच कोठे? अमेरिका जागतिक महासत्ता वगैरे असेलही, पण म्हणून कश्मीरबाबत मध्यस्थी करण्याचा अधिकार तिला आहे असे होत नाही. खरे म्हणजे कश्मीर हा हिंदुस्थानसाठी मुद्दाच नाही. त्यामुळे तो ‘प्रश्न’ वगैरे देखील नाही. तरी पाकिस्तानकडून नेहमीच कश्मीरबाबत ‘तिसऱया’च्या मध्यस्थीची वकिली केली जात असते. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी यापूर्वी वरकरणी का होईना, तटस्थ भूमिका घेतली आहे. भले ते त्यांचे दाखवायचे दात असतील, पण तशी जाहीर भूमिका त्यांना घ्यावी लागली आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे अमेरिकेच्या

मध्यस्थीचे तुणतुणे

थांबलेले नाही. इम्रान खान यांनी आता तेच केले आहे. कश्मीरबाबत हिंदुस्थान कोणाचाही हस्तक्षेप कदापि मान्य करणार नाही, हे माहिती असले तरीही इम्रान खान असे म्हणाले याचाच अर्थ, त्यांनाही या विषयाशी देणेघेणे नाही. त्याआडून त्यांना एकीकडे अमेरिकेची आरती ओवाळायची आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानदेखील कसा अण्वस्त्रसंपन्न वगैरे आहे याविषयी बढाई मारायची आहे. पाकिस्तानच्या शस्त्रसाठय़ात सध्या 165 अण्वस्रे असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. पुन्हा त्यांची संख्या वाढविण्याची पाकिस्तानची इच्छाही लपून राहिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इम्रान यांना कश्मीर प्रश्नाची आठवण झाली, हे लक्षात घ्यायला हवे. तो सोडविण्याचा राग आळवत त्यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचे आणि ते वाढविण्याच्या त्यांच्या अधिकाराचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. पुन्हा अमेरिकेने डोळे वटारू नयेत यासाठी अमेरिकेची इच्छा आणि संकल्पाच्या तारादेखील छेडल्या आहेत. पाकडय़ांचे हे पूर्वापार राजकीय आणि लष्करी धोरण आहे. तेथे राष्ट्रप्रमुख किंवा लष्करप्रमुख

कोणीही असला तरी

या धोरणात बदल होत नाही. कारण ‘कश्मीर’ ही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांच्यासाठी सोयीनुसार वापरता येणारी ढाल आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्याच ‘गरजे’पोटी कश्मीरची ढाल पुढे केली आहे. सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी कश्मीर प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे, असे म्हटले होते. आता पुन्हा त्यांना या प्रश्नाचा ‘कळवळा’ आला आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. त्यात आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. अर्थात, अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार हा प्रश्न सुटावा या त्यांच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल? कारण हिंदुस्थानसाठी कश्मीर हा प्रश्न कुठे आहे?

आपली प्रतिक्रिया द्या