आजचा अग्रलेख : आता युद्धनौकाच पाठवा! खरेच ‘खरे’ खुनी शोधा!!

231

दाभोलकर, पानसरेप्रकरणी अनेक खुनी पकडले व त्यांनी खुनाची कबुली दिली. त्या कबुलीजबाबाची शाई वाळण्याआधीच नवा खुनी पकडला जातो हे एक रहस्यच आहे. दाभोलकर हत्येत वापरलेले एक पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खाडीपात्रात पिस्तूल शोधण्यासाठी खाडीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा प्लॅटफॉर्म बांधण्याची परवानगी सी.बी.आय.ने राज्य सरकारकडे मागितली आहे. सरकारने या तपासासाठी वाटल्यास युद्धनौका पुरवाव्यात. राफेल विमाने द्यावीत. सैन्याचाही वापर करावा, पण खुन्यांचा तपास लावा एकदाचा. ‘खरेखुनी खरेच शोधा! मतभेदाचा आवाज बंद कोणी केला हे कळायलाच हवे.

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे खुनी (अर्थात खरे) कधी सापडतील हा जगापुढील गहन प्रश्न आहेच. पोलीस, विशेष तपास पथके, सी. बी. आय. आणि उच्च न्यायालयही तपासात सक्रिय झाले आहे. ‘सामना’ चित्रपटात ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ हा प्रश्न विचारला गेला तसाच या सगळय़ा विचारवंतांचे खून कोणी केले? हा जटील प्रश्न आहे. या सगळय़ा महत्त्वाच्या लोकांचे खून झाले व त्यांचे खुनी सापडत नाहीत. दिवसाउजेडी झालेले हे खून आहेत व आतापर्यंत ‘खुनी सापडले हो!!’ असे दावे करीत किमान पाच-पंचवीस ‘खुनी’ अनेक यंत्रणांकडून पकडण्यात आले. या सर्व खुन्यांना अटका झाल्यावर त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली, हत्यारे सापडली. सूत्रधार तसेच धागेदोरेही सापडले असे सांगण्यात आले. पण काही दिवसांतच ‘खुनी’ जेलमध्ये असताना याच प्रकरणातील दुसरे कुणीतरी ‘खुनी’ म्हणून पकडले जातात. अशा पन्नासेक खुन्यांनी आतापर्यंत आपणच हे सर्व खून केल्याची कबुली दिली आहे. तितकीच हत्यारे जप्त केली गेली आहेत आणि हे सर्व कारस्थान उघड केल्याचे तपासयंत्रणांनी जाहीर केले आहे. आता न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, ‘दाभोलकर, पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या करून या हत्येच्या मुख्य सूत्रधारांनी बहुसंख्याकांच्या मताशी असहमती दर्शवणारा, त्या विरोधात भूमिका मांडणारा ‘आवाज’ बंद करण्यात येईल, असा संदेश एकप्रकारे समाजाला दिला आहे.’ हे न्यायालयाचे निरीक्षण आहे व त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे. पण अशी स्वतंत्र व परखड निरीक्षणे इतरांचीही असू शकतात. मुळात

मतभेदांचा आवाज

म्हणजे काय? मतभेदांचे विषय काय होते व या मंडळींनी असे कोणते क्रांतिकारक विचार मांडले की त्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्याक लोकांची मने दुखावली. यावर ना मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश टाकला, ना आमच्या प्रिय न्यायालयाने. दाभोलकर यांनी कोणताही नवा विचार मांडला नव्हता. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चोख करीत होते, पण दाभोलकर हे काही असे काम करणारे एकमेव नव्हते. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या विरोधात लढण्याची परांपराच महाराष्ट्राला आहेच. गाडगेमहाराज हे अंधश्रद्धेविरुद्ध लढलेच. पण देवधर्माच्या पोकळ संकल्पना, रूढींविरुद्धही लढले. म्हणून महाराष्ट्रात त्यांचा कोणी खून केला नाही. ‘सुधारक’कर्ते आगरकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, तुकडोजी महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे या सगळय़ांचे अंधश्रद्धेविरुद्धचे लढे दिवंगत दाभोलकरांपेक्षा अधिक प्रखर होते. त्यांनाही विरोध झालाच होता, पण कुणी त्यांचे खून केले नाहीत. कारण महाराष्ट्राची ती परंपरा नाही. त्यामुळे दाभोलकर, पानसरे यांच्याबाबतीत आवाज बंद करण्यासाठी खून झाले हा विचार पटणारा नाही. पानसरे हे कम्युनिस्ट होते व कोल्हापूरपलीकडे त्यांची ओळख नसावी. कॉ. पानसरे यांनी हिंदू धर्मावर चिखलफेक केली, पण कोणताही दिव्य विचार मांडला नव्हता. हिंदू धर्मावर टीका करणे हे कम्युनिस्टांचे धोरण आहे व कम्युनिस्टांचा आवाज देशभरात जनतेने लोकशाही मार्गानेच बंद केला. पानसरे यांची टीका महाराष्ट्रात कोणीच गांभीर्याने घेत नव्हते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. सोमनाथ चटर्जी यांच्यासह अनेकांनी त्यांची मते मांडली. ही मते अनेकदा प्रवाहाविरुद्ध मांडली. पण त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही.

महाराष्ट्राची हीच परंपरा

आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा विषय कर्नाटकातला आहे. गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव प्रकरणात ‘विचारवंत’ नक्षलवाद्यांनी राज्य सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे पुरावे समोर आले आहेत. हिंदू धर्मावर प्रहार करायचे, दलित, मुसलमानांची माथी भडकवायची, समाजात असंतोष, देशात अस्थिरता पेरायची हे या बुद्धिवंत विचारवंतांचे धोरण असेल तर त्यांच्याशी मतभेद राहणारच. मात्र म्हणून कुणी त्यांचे खून करणार नाही. दाभोलकर, पानसरे यांचे खून कोणी केले हा प्रश्न न्यायालयास पडला आहे पण तसा तो महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करतात. इतरही प्रश्न आहेतच. पण सरकारवर सगळय़ात मोठे पातक दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाचे आहे. दाभोलकर, पानसरेप्रकरणी अनेक खुनी पकडले व त्यांनी खुनाची कबुली दिली. त्या कबुलीजबाबाची शाई वाळण्याआधीच नवा खुनी पकडला जातो हे एक रहस्यच आहे. दाभोलकर हत्येत वापरलेले एक पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खाडीपात्रात पिस्तूल शोधण्यासाठी खाडीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा प्लॅटफॉर्म बांधण्याची परवानगी सी.बी.आय.ने राज्य सरकारकडे मागितली आहे. पण त्याला सरकार सहकार्य करीत नसल्याची तक्रार सी.बी.आय.ने न्यायालयात केली. असे खरेच घडले असेल तर ते योग्य नाही. सरकारने या तपासासाठी वाटल्यास युद्धनौका पुरवाव्यात. राफेल विमाने द्यावीत. सैन्याचाही वापर करावा, पण खुन्यांचा तपास लावा एकदाचा. ‘खरे’ खुनी खरेच शोधा! मतभेदाचा आवाज बंद कोणी केला हे कळायलाच हवे.

आपली प्रतिक्रिया द्या