महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता. लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे. मुख्यमंत्री मिंधे 1500 रुपये वाटत फिरत आहेत, तर पंतप्रधान ‘लखपती दीदी’ योजनेसाठी काल जळगावात येऊन गेले. हे खरे असले तरी बहिणी–दीदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही.
लाडकी बहीण योजनेच्या प्रचार सभा राज्यात जागोजागी होत आहेत व त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोंधळ होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री मिंधे हे महिलांना सारखे विचारत आहेत, ‘‘पैसे मिळाले ना? मिळाले ना पैसे? पैसे मिळाले ना?’’ यावर समोरच्या गर्दीतून एक महिला जोरात ओरडली, ‘‘होय होय, मिळाले. पैसे काय खोकेवाल्या सरकारच्या बापाचे आहेत काय?’’ महिलांच्या मनातला हा उद्रेक आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेवर विनोदही खूप चालले आहेत व जनता त्या विनोदाची मजा घेत आहे. एक बाई ओढय़ावर कपडे धुऊन येताना घसरून पडली. लाडक्या बहिणीच्या मागे फडणवीस, मिंधे व गुलाबी जॅकेटातले अजित पवार होते. त्यांनी बाईला उठायला मदत केली. बाईने म्हणजे लाडक्या बहिणीने त्यांचे आभार मानले. यावर फडणवीस म्हणाले, ‘‘माझ्या लाडक्या बहिणी, आम्हाला ओळखलेस ना? आम्ही तेच जे सध्या बहिणींना 1500 रुपये वाटत फिरत आहेत. मी फडणवीस, हे तर मिंधे आणि हे गुलाबी जॅकेटवाले अजित पवार. आम्ही तुम्हाला उठायला मदत केली. त्यासाठी 1500 रुपये मोजले. काय मग, 2024 मध्ये आम्हालाच मत देणार ना?’’ लाडकी बहीण हसली आणि म्हणाली, ‘‘लाडक्या भावा, चल हवा येऊ दे. मी पाठीवर पडले, डोक्यावर नाही.’’ तर एकंदरीत हे असे आहे. यवतमाळमध्ये ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमात गोंधळ झाल्याने मुख्यमंत्री मिंधे यांना भाषण थांबवावे लागले. यवतमाळमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचा
कार्यक्रम सुरू असताना
अजित पवार-फडणवीस यांची भाषणे आटोपली व मुख्यमंत्री मिंधे भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होताच महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अर्ज भरूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत, अशा घोषणा त्या महिला देऊ लागल्या. त्यामुळे मुख्यमंत्री मिंधे यांना भाषण थांबवून त्या महिलांची समजूत काढावी लागली. ‘‘पैसे मिळतील, पैसे मिळतील’’ असे वारंवार सांगावे लागले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत. प्रेक्षकगृहातील महिलांकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाबी पाकळय़ा उधळून घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता. लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व 1500 रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे. मुख्यमंत्री मिंधे 1500 रुपये वाटत फिरत आहेत, तर पंतप्रधान ‘लखपती दीदी’ योजनेसाठी काल जळगावात येऊन गेले. हे खरे असले तरी बहिणी-दीदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही. बांगलादेशातील हिंदूंवरील, तेथील महिलांवरील अत्याचारांवर देशाचे गृहमंत्री भाष्य करतात. बांगलादेशातील हिंदूंची त्यांना चिंता वाटते, पण महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’वरील अत्याचार त्यांना अस्वस्थ करीत नाहीत. लाडके भाऊ बेरोजगार आहेत. त्यांना काय मिळणार? त्यांना कोण देणार? महायुतीत सरकारकडे एक लाडका मुलगा आहे व एक लाडकी मुलगी आहे. हा लाडका मुलगाच सध्या ‘वर्षा’ बंगल्यावरून राज्याच्या प्रशासनास धमक्या देत राज्य चालवीत आहे. निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने
सगळेच लाडके
होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत. बेरोजगार तरुणांना त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करणे कठीण झालेय. निदान लाडक्या बेरोजगारांसाठी फोन रिचार्जची योजना तरी सरकारने जाहीर करावी अशी गमतीशीर मागणी झाली आहे. जालन्याच्या भुऱ्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. भुऱ्याने आपल्या खास शैलीत भाषणात सांगितले की, ‘‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे ‘लाडके लेकरू’ अशी लहान मुलांसाठीही योजना सरकारने सुरू करावी.’’ भुऱ्या म्हणतो, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्यासारख्या छोटय़ा पोरांना स्वातंत्र्य मिळालं का? कोणीही येतो आणि आमच्यासारख्या पोरांना काम सांगतो. घरातील सर्व बारीकसारीक कामं आम्हीच करतो. सुट्टी असली की, घरातली व रानातली अशी दोन्ही कामं आम्हालाच करावी लागतात. आता सरकार मोठय़ा पोरांना पगार सुरू करणार आहे. आधीच त्यांना काही कामधंदा नाही. आता ते दिवसभर मोबाईल चिवडत बसतील. सरकारने पगार सुरू केल्यावर मोठी पोरं आता रानातलं कामही करणार नाहीत. मग आमच्या सारख्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलंय? आम्हालाही पगार सुरू झाला पाहिजे. आम्हालाही खर्चापाण्याला पैसे लागतील. त्यासाठी सरकारने ‘लाडके लेकरू’ योजना आणून आम्हाला पगार सुरू करावा!’’ भुऱ्याने खरे तेच सांगितले. भुऱ्याला डोके आहे. त्यालादेखील ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हवाच आहे. भुऱ्यादेखील डोक्यावर पडलेला नाही हे डोके नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावे!