सामना अग्रलेख – दिल्ली गढूळ, महाराष्ट्र स्वच्छ! पुढचे पाऊल कधी?

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौलदिला आहेदिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची!

देशात आणि आपापल्या राज्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतील तो पहिला धडा असतो. सध्या महाराष्ट्रात काय चालले आहे हे जाणून घेण्याची धडपड संपूर्ण देशात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.’ मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हरकत नाही. मुख्यमंत्री अमित शहा यांना भेटून सरकार स्थापण्याचे भाष्य करतात म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल व बहुमताचा आकडा वस्त्रगाळ करून जमवला असेल. जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मा. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दिसले. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. धूळ व इतर विषारी द्रव्ये त्या हवेत पसरून सर्वत्र काळोख असल्यासारखे चित्र दिसत आहे. लोक धड पाहू शकत नाहीत व श्वास घेऊ शकत नाहीत.

नाकास फडकी

बांधून व खिशात प्राणवायूची नळी ठेवून लोकांना दिल्लीत जगावे लागत आहे. देशाच्या राजधानीत एकप्रकारे आरोग्य आणीबाणीच जाहीर झाली आहे. त्या गढूळ वातावरणात महाराष्ट्राला प्रकाश दाखवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. दिल्लीची हवा गढूळ, विषारी असली तरी महाराष्ट्राची हवा स्वच्छ व शुभ्र आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट आणि लख्ख दिसत आहे. कोणाचे काय चालले आहे व कोणाच्या काय भावना आहेत ते लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राची हवा गढूळ नसली तरी ओला दुष्काळ आणि महागाईच्या आगीत जनतेची कोंडी झाली आहे. गॅसचा सिलिंडर 651 रुपये झाला, कोथिंबिरीची जुडी 100 रुपये पार झाली. भाजप 144 पार झाला नाही व शिवसेनाही शंभर पार झाली नाही तरी गाजर, मटार, भेंडी, आले, गवारसारख्या भाज्यांनी ‘120’ पार केले आहे. हे सगळे कसे शमवायचे? हा प्रश्नही आहेच. सरकार स्थापनेसाठी ‘आकडा’ वाढता असणे आवश्यक असले तरी भाजीपाल्याच्या वाढलेल्या दराचा आकडा लवकर कमी होणे त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. सरकारसाठी लागणाऱ्या

बहुमताचा आकडा

गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे श्री. शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. मऱहाटी जनतेला कमी लेखू नका. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची!

आपली प्रतिक्रिया द्या