सामना अग्रलेख – परतीच्या पावसाचा तडाखा

एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हा उफराटा न्याय बळीराजाच्याच नशिबी निसर्ग का देतो? कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी गारपीट, कधी परतीच्या पावसाचा तडाखा. निसर्गाची लहर आपल्या हातात नाही, पण त्याने दिलेल्या तडाख्यांनी खचलेल्या बळीराजाला हात देणे, पुन्हा उभे करणे आपल्या हातात आहे. कोरोना, लॉक डाऊनमुळे आर्थिक संकट असले, जीएसटीच्या हक्काच्या परताव्याबाबत केंद्राचे हात आखडते असले तरी परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाला राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला मदतीचा भक्कम आधार देऊन नव्या उमेदीने रब्बीच्या हंगामासाठी उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

मान्सूनने या वर्षी महाराष्ट्रावर कृपा केली असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने दगाफटका केला आहे. राज्याच्या विविध भागांत परतीचा पाऊस उभी पिके आडवी करीत आहे. हवामान खात्याचा अंदाज विचारात घेतला तर पुढील दोन-तीन दिवस परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच राहील अशी चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. राज्याच्या सर्वच भागांत या पावसाने हजेरी लावली असली तरी प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हा तडाखा जास्त बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास हिरावला गेला आहे. यंदा मान्सूनची कृपा झाली. पाऊस नेहमीप्रमाणे अनियमितच पडला. मान्सूनचा लहरीपणा यंदाही कायमच राहिला, पण गेल्या वर्षीसारखीच त्याने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली. त्यामुळे बहुतेक भागांचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सुटला. छोटी-मोठी धरणे, सिंचन प्रकल्प, तलाव, जलाशय, गावतळी जवळजवळ पूर्ण भरली. पाऊस व्यवस्थित झाल्याने पीकपाणीही शेतात तरारून आले. पिकांच्या कापणीची सुरुवातही झाली होती. कोकणात भात पीक कापणीसाठी तयार होते. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी काढणीची वाट पाहत होते, तर अनेक ठिकाणी त्याची काढणी सुरू होती. तीच अवस्था कापूस, बाजरी, तूर आदी पिकांचीही होती. मात्र या

ऐन मोक्यावरच

परतीच्या पावसाने घाला घातला आणि बळीराजासाठी होत्याचे नव्हते केले. एकीकडे वातावरणात वाढलेली उष्णता आणि दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा अशा कात्रीत कोकणातील भात, नाचणी आणि वरी ही पिके सापडली आहेत. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासंह मुसळधार पाऊस झाला. त्याआधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी जिल्हय़ांना तडाखा दिला होता. त्यात आता परतीच्या पावसाने तयार भातशेती, नाचणी आणि वरीची शेती भुईसपाट झाली आहे. मराठवाडा आणि खान्देश या परंपरागत दुष्काळी भागांत यंदा पर्जन्यराजाने चांगले माप पदरात टाकले. त्यामुळे तेथील बळीराजा आनंदात असतानाच परतीच्या पावसाने त्यावर विरजण घातले आहे. महिनाभरापूर्वी मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पावसाने चांगल्या खरीप हंगामाला अपशकुन केलाच होता. आता परतीच्या पावसाने तर ही पिकेच उद्ध्वस्त केली आहेत. धरणे ओव्हरफ्लो झाली हे मराठवाडय़ासाठी चांगले असले तरी सध्याच्या स्थितीत नद्या-नाल्यांना आलेले पूर लगतच्या शेतीसाठी घातक ठरले आहेत. तिकडे खान्देशात, प्रामुख्याने जळगाव जिल्हय़ातही परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मक्याची भरली कणसे काळी पडली आहेत तर बोंडातून बाहेर आलेला कापूस भिजल्यामुळे वायाच गेला आहे. विदर्भातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या वर्षी तेथे

पाऊस तसा उशिराच

झाला. तरीही नंतर सरासरी भरून काढली. त्यामुळे खरीपाच्या पिकाने शेतकऱ्याला हात दिला, मात्र परतीच्या पावसाने दिलेले सगळेच काढून घेतले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. शेतातील सोयाबीनच्या गंज्या आणि कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाल्याने वाया गेले आहे. गेल्या वर्षीही परतीच्या पावसाने खरीप हंगामावर असेच पाणी फेरले होते. आता तेच घडत आहे. परतीच्या पावसाची टांगती तलवार आणखी तीन-चार दिवस राज्यावर राहण्याची शक्यता आहे. चांगल्या मान्सूनने बळीराजाला भरभरून दिले, पण परतीच्या पावसाने काढून घेतले. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हा उफराटा न्याय बळीराजाच्याच नशिबी निसर्ग का देतो? कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी गारपीट, कधी परतीच्या पावसाचा तडाखा. निसर्ग शेतातील उभ्या पिकांवर आणि शेतकऱयाच्या स्वप्नांवर दुर्दैवाचा नांगर का फिरवतो? निसर्गाची लहर आपल्या हातात नाही, पण त्याने दिलेल्या तडाख्यांनी खचलेल्या बळीराजाला हात देणे, पुन्हा उभे करणे आपल्या हातात आहे. कोरोना, लॉक डाऊनमुळे आर्थिक संकट असले, जीएसटीच्या हक्काच्या परताव्याबाबत केंद्राचे हात आखडते असले तरी परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाला राज्य सरकार वाऱयावर सोडणार नाही. त्याला मदतीचा भक्कम आधार देऊन नव्या उमेदीने रब्बीच्या हंगामासाठी उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या