सामना अग्रलेख – 95 टक्क्यांची भरारी

2591
प्रातिनिधिक फोटो

दहावी ही विद्यार्थ्यांच्या करीअरची पहिली पायरी असते. करीअरच्या मोकळ्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी विद्यार्थी आपले पंख विस्तारतो तो याच परीक्षेत. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची 95.30 ही टक्केवारी विक्रमीच आहे. राज्य सरकारने आधीच दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेतून ‘नापास’ अर्थात ‘अनुत्तीर्ण’ हा शेरा काढून टाकण्याचा चांगला पायंडा पाडला आहे. आता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी तब्बल 95 टक्क्यांची विक्रमी भरारी घेऊन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना संकटाचे सावट असतानाही त्यांनी हे घसघशीत यश संपादन केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोरोनामुळे लांबलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी बारावीचा निकालदेखील जाहीर करण्यात आला होता. थोडक्यात, कोरोनामुळे अडखळलेला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा श्वास आता मोकळा झाला आहे. दहावी आणि बारावी ही दोन्ही वर्षे फक्त बोर्डाच्या परीक्षा म्हणूनच महत्त्वाची नसतात, तर शैक्षणिक करीअरचा पहिला आणि दुसरा टप्पा म्हणून त्यांचे विद्यार्थी-पालक यांच्या जीवनातील स्थान महत्त्वाचे आहे. मात्र यंदा कोरोना नावाच्या संकटाने इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रावरही काळजीचे सावट टाकले. बारावीच्या परीक्षा तर कोरोनाच्या तडाख्यापूर्वी होऊन गेल्या होत्या. पण एसएससी बोर्डाचा शेवटचा भूगोलाचा पेपर मात्र देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊनच्या कचाट्यात सापडला आणि अखेर रद्द करावा लागला. पुढे लॉक डाऊन वाढत गेले. त्याचा परिणाम दहावी-बारावीची पेपर तपासणी तसेच निकालाची प्रक्रिया यांवरही होणे स्वाभाविकच होते. आधीच एक पेपर रद्द झालेला, त्यात लॉक डाऊनचा परिणाम रिझल्ट लांबण्यावर किती होणार याची भीती. अशा दुहेरी काळजीत राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक होते. मात्र 10 दिवसांपूर्वी बारावीचे आणि बुधवारी दहावीचे सुमारे 17 लाख विद्यार्थी या काळजीतून मुक्त झाले. राज्य सरकार आणि राज्य शिक्षण मंडळाने प्रयत्न करून ही अनिश्चितता

आणखी लांबणार नाही

याची काळजी घेतली. परीक्षा संपल्यानंतर निकालापर्यंतचा काळ हा आधीच एका तणावाचा असतो. त्यात यंदा कोरोनासारख्या भयंकर आजाराचे थैमान असल्याने वेगळीच चिंता विद्यार्थी-पालक यांच्यासह शिक्षण विभागालाही होतीच. मात्र आता हे सगळे ताण-तणाव दूर हेऊन विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीच्या आकाशात भरारी घेण्यास सज्ज झाले असतील. या वेळी राज्याचा दहावीचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 18.20 टक्के जास्त आहे. मागील दीड दशकातील हा विक्रमी निकाल आहे. 95.30 टक्के मुले-मुली उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजे फक्त पाच टक्केच मुले नापास झाली आहेत. मुलींनी बाजी मारण्याची परंपरा कायम राखली आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तेथील 98.77 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यानंतर कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभाग आहेत. सर्वात कमी म्हणजे 92 टक्के निकाल संभाजीनगर विभागाचा आहे. बारावीच्या निकालातही थोडय़ाफार फरकाने हेच चित्र दिसले होते. त्या निकालातही 4.78 टक्क्यांची वाढ होती. मात्र दहावीच्या निकालात 18 टक्क्यांची घसघशीत वाढ निश्चितच सुखद
धक्का म्हणावा लागेल. यंदा

निकालाचा टक्का

वाढण्यात रद्द झालेल्या पेपरमध्ये सरासरी गुण, अंतर्गत मूल्यमापन, कृती पत्रिका अशा काही गोष्टींचा परिणाम असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचे मूल्य त्यामुळे कमी होत नाही. 80ः20 हा पॅटर्न रद्द केल्यामुळेही निकालाची टक्केवारी वाढली असे एक कारण सांगितले जाते. त्यात तथ्य असेलही, पण म्हणून तो विद्यार्थ्यांच्या घसघशीत यशात मिठाचा खडा कसा ठरवता येईल? शेवटी दहावी ही विद्यार्थ्यांच्या करीअरची पहिली पायरी असते. करीअरच्या मोकळ्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी विद्यार्थी आपले पंख विस्तारतो तो याच परीक्षेत. एकदा का दहावीचे द्वार उघडले की, विद्यार्थ्यांना आपल्या करीअरचा मार्ग निश्चित करणे सोपे जाते. यंदा फक्त पाच टक्केच विद्यार्थी हा मार्ग निश्चित करण्यात अपयशी ठरले आहेत. 95 टक्के करीअरची वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची 95.30 ही टक्केवारी विक्रमीच आहे. राज्य सरकारने आधीच दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेतून ‘नापास’ अर्थात ‘अनुत्तीर्ण’ हा शेरा काढून टाकण्याचा चांगला पायंडा पाडला आहे. आता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी तब्बल 95 टक्क्यांची विक्रमी भरारी घेऊन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना संकटाचे सावट असतानाही त्यांनी हे घसघशीत यश संपादन केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या