सामना अग्रलेख – लोकांनी ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आणू नये! पुन:श्च हरिओम!!

7593

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचा बंदीवास व देश गुलामीच्या बेड्यांत असताना पुन:श्च हरिओमचा नारा दिला होता. आता ठाकरे सरकारने देश स्वतंत्र असताना आणि जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना तोच पुन:श्च हरिओमचा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. हरिओमऐवजी हे रामम्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. तूर्त तरी पुन:श्च हरिओमचे स्वागत करूया!

लोकमान्य टिळकांप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुन:श्च हरिओम’चा नारा दिला आहे. दोनेक महिन्यांच्या कठोर टाळेबंदीनंतर आयुष्याला पुन्हा गती देण्याचा हा मंत्र आहे. 27 जुलै 1897 रोजी इंग्रज सरकारने टिळकांना अटक केली. ‘केसरी’च्या 15 जूनच्या अंकातील छत्रपती शिवाजीराजे उत्सवासंबंधीचा मजकूर, छत्रपतींनी अफझलखानाचा वध केला त्यासंबंधी भानू जिनसीवाले व टिळक महाराजांनी भाषणात व्यक्त केलेली मते, ‘केसरी’ने छापलेली शिवरायांवरील ‘शिवाजीचे उद्गाते’ ही कविता आणि गणेश व दासानुदास या सह्यांची पत्रे आक्षेपार्ह ठरवून न्यायाधीशांनी राजद्रोहाबद्दल टिळकांना दीड वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 1898 च्या सप्टेंबर महिन्यात टिळक तुरुंगातून सुटले. दोन महिने विश्रांती घेऊन ते मद्रासच्या काँग्रेस अधिवेशनाला हजर राहिले आणि दक्षिण भारताचा प्रवास करून 1899च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यात परतले. 4 जुलै 1899 च्या ‘केसरी’त ‘पुन:श्च हरिओम’ हा अग्रलेख लिहून टिळकांनी केसरीची धुरा पुन्हा एकदा आपल्याकडे घेतली व थांबलेल्या कार्यास नव्याने प्रारंभ केला. ‘पुन:श्च हरिओम’ची ही पूर्वपीठिका आहे. लॉक डाऊनमुळे दोन महिन्यांचा जो काळ गोठला आहे त्याला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा हरिओमची घोषणा केली हे त्यादृष्टीने महत्त्वाचे. देशभरात सोमवारपासून पाचवी टाळेबंदी जाहीर झाली आहे, पण या टाळेबंदीतही जीवनास आरंभ करावा असे ठाकरे यांनी सुचवले आहे. टिळक तेव्हा तुरुंगातून मुक्त झाले व महाराष्ट्राची 11 कोटी जनता टाळेबंदीच्या तुरुंगातून या पुढे तीन टप्प्यांत मुक्त होणार आहे. जनतेने दोनेक महिने कडक तुरुंगवास भोगला आहे. या दोन महिन्यांत जीवनाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. यापुढे अनेकांच्या बेबंद, बेशिस्त वागण्यावर बंधने येतील. शिस्त मोडणे नुसते महाग पडणार नाही, तर जीवावर बेतू शकेल. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हट्ट होता की, पदवीच्या

अंतिम वर्षाच्या परीक्षा

घ्याच! मुख्यमंत्र्यांनी ‘ठाकरी’ बाणा दाखवत राज्यपालांची मागणी नाकारली आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होईल हे स्पष्ट केले आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नाही तेथे शाळा भरतील हा त्याचा अर्थ. महाराष्ट्रात दुकाने आलटून पालटून उघडली जातील. धार्मिक उत्सव होणार नाहीत व देवळेही बंदच राहतील. म्हणजे माणसांना ‘पुन:श्च हरिओम’ करण्याची जी सवलत मिळाली आहे ती सवलत मंदिरांना मिळणार नाही. मंदिरांची टाळेबंदी कायम आहे. सलूनही उघडणार नाहीत. लोकांनी दुकानात किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. आता लोकांनी सायकली आणायच्या कुठून? व सायकल वापरायची सवय राहिली आहे काय? पण ही एक शिस्त आहे व ती पाळावी लागेल. रविवारपासून घरपोच वृत्तपत्रं वितरणास परवानगी देण्यात आली आहे, पण वृत्तपत्र घरपोच देणार्‍या मुलांना मास्क, सॅनिटायझर पुरवावे लागतील. महापालिका क्षेत्रात 10 टक्के कर्मचार्‍यांसह खासगीत कार्यालये सुरू करता येतील. सरकारी कार्यालयात 15 टक्के कर्मचार्‍यांना हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतरांनी घरूनच काम करावे असे धोरण आहे. हे धोरण कितपत यशस्वी होईल ते पाहावे लागेल. कोरोनाचे संकट अद्यापि दूर झालेले नाही. त्यामुळे आता बेजबाबदार वागून चालणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनीही बजावले आहे. देशाचीच नाही तर जगाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ज्या देशात निर्बंध हटवले त्या देशात कोरोनाने पुन्हा उद्रेक केला आहे. अशा देशात दक्षिण कोरियासुद्धा आहे. अमेरिकेत काल दिवसभरात

हजारावर लोक मरण पावले

आहेत. बेल्जियमचे राजपुत्र जो आकिम हे फक्त 28 वर्षांचे असून कोरोनाच्या हल्ल्याने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत साधारण 30 हजार कोरोना रुग्ण बरे झाले आहेत हे खरेच, पण कालच्या एका दिवसात अडीच हजार नवीन कोरोनाग्रस्तांची पैदाईश झाली आहे. ‘पुन:श्च हरिओम’ करताना या धोक्याची जाणीव प्रत्येक पावलावर ठेवावी लागेल. अमेरिकी सरकारने अर्थचक्र गतिमान करण्यासाठी निर्बंध मागे घेतले होते. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व त्यांचे ‘पुन:श्च हरिओम’ धोकादायक ठरले. म्हणून सरकारी दिलदारीचा गैरवापर कोणी करू नये. कारखाने, उद्योग सुरू होत आहेत. बर्‍याच ठिकाणी उत्पादन सुरू झाले आहे, पण उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेट्रो सुरू झाल्याशिवाय मुंबईचे जीवन खर्‍या अर्थाने सुरू होणार नाही. चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास अटी-शर्तींवर परवानगी मिळाली आहे, पण चित्रपटगृहे बंद आहेत. देशातील सगळ्यात गतिमान मनोरंजन उद्योगावर त्यामुळे टाळेबंदीचे सावट कायम आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोजक्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करून मोजके व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली, पण जनतेला हातापायात साखळदंड बांधूनच बाहेर वावरावे लागेल. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचा बंदीवास व देश गुलामीच्या बेड्यांत असताना ‘पुन:श्च हरिओम’चा नारा दिला होता. आता ठाकरे सरकारने देश स्वतंत्र असताना आणि जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना तोच ‘पुन:श्च हरिओम’चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’चे स्वागत करूया!

आपली प्रतिक्रिया द्या