मोदी व त्यांच्या पक्षाने सत्याशी फारकत घेतली आहे. त्यामुळे गांधी व त्यांच्या विचारांवर प्रवचने झोडण्याचा त्यांना अधिकार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात मोदी व शहांनी असत्याचे राज्य चालवले आहे. त्यामुळे कोणत्या गांधी विचारांची त्यांना चिंता लागून राहिली आहे? गांधी राजकारणाचा व विचाराचा पाया सत्य हाच होता. मोदीजी, हा विचार आपल्याला मान्य आहे का? तुमच्या राजवटीत गांधी विचार रोज मारला जात आहे, हेच सत्य आहे!
गांधीजींच्या नावावर मते घेणाऱ्यांना त्यांच्या विचारांचा विसर पडल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हा त्यांनी केलेला विनोद आहे. मोदी व त्यांचा पक्ष सत्तेत आल्यापासून गांधी विचारांची रोज हत्या होत आहे. धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मोदी हे सदैव खोटे बोलतात व खोटे वागतात. त्यांचा सत्यावर काडीमात्र विश्वास नाही. याउलट महात्मा गांधी यांचा सत्यावर संपूर्ण विश्वास होता. सत्यावरील त्यांच्या अढळ निष्ठेमुळे त्यांनी दुष्टपणा व अहंकार अशा विकारांवर मात केली. गांधी म्हणत, ‘‘या जगताचा आधार नीती आहे. सत्यामध्ये नीतीचा समावेश आहे.’’ ते संध्याकाळच्या प्रार्थना सभेत नेहमीच सत्याची कास धरा असे सांगत. सत्यावर विश्वास ठेवा, सत्याचाच मार्ग धरा, सत्य बोलत रहा, असा आग्रह धरत. मोदी यांना सत्याची ही गांधी भूमिका पचणारी नाही. मोदी यांच्या काळात सत्य, न्याय, नीती वगैरे संकल्पना मोडीत निघाल्या. मोदींचा अहंकार असा की, आपण देवाचे अवतार आहोत, असे त्यांनीच जाहीर करून टाकले. मोदी विश्वगुरूही आहेत व हे सर्व त्यांनीच ठरवले. हा अहंकार आहे. गांधींना अहंकार नव्हता. त्यांनी एका अमेरिकन पत्रकाराला मुलाखत देताना सांगितले, ‘‘जगाला शिकविण्यासाठी माझ्याजवळ नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा तर अविचल पर्वताइतकी प्राचीन मूल्ये आहेत.’’ गांधी हे दुतोंडी नव्हते. ते निर्भय होते. कारण ते
फक्त सत्य
बोलत. गांधीजी म्हणजे सत्य. ते इतके सत्यमय झाले होते की, त्यांनी जगभरातील दुर्बलांच्या हातात अन्यायाविरुद्ध लढण्याचे जे शस्त्र दिले, त्याचेच नाव ‘सत्याग्रह’ आहे. मोदी व त्यांचे लोक आंदोलन व सत्याग्रह चिरडून टाकतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 670 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध हे आंदोलन दोन वर्षे चालले. हे काळे कायदे उद्योगपती अदानींच्या फायद्यासाठी आणले होते. त्या कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चोर, अतिरेकी ठरवले गेले. त्यांना देशद्रोही म्हणून संबोधण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य संग्रामात रक्त सांडले नसते तर मोदी हे देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. मोदी यांनी 2014 च्या आधी सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली, ती सर्व आश्वासने खोटीच ठरली. मोदी यांच्या गुजरातमध्येच शेतकऱ्यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला होता. सरदार पटेलांनी त्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. गांधींचा त्यांना आशीर्वाद होता आणि ब्रिटिशांचे सरकार असतानाही शेतकरी सत्याग्रह करू शकले होते. मोदी राज्यात हे शक्य आहे काय? मोदी व त्यांच्या पक्षाने सत्याशी फारकत घेतली आहे. त्यामुळे गांधी व त्यांच्या विचारांवर प्रवचने झोडण्याचा त्यांना अधिकार नाही. मोदींचे समर्थक देशात नथुराम गोडसेची उघड पूजा करतात व गोडसेच्या जन्मदिनी गांधी प्रतिमेवर गोळ्या चालवतात. हा सत्य व नीतीचा खून आहे आणि मोदी यांची तीच विचारधारा आहे. मोदी यांना हा प्रकार मान्य नसता तर त्यांनी त्यावर भाष्य करून या
नाठाळ लोकांना जेरबंद
केले असते. गांधी यांच्या पुतळ्यापेक्षा मोदी यांनी गुजरातेत सरदार पटेल यांचा टोलेजंग पुतळा उभा केला. स्वदेशात भाजप व मोदी गांधींचा सन्मान करीत नाहीत. मात्र विदेशात गेल्यावर त्यांना अनेक देशांतील गांधी पुतळ्यांसमोर झुकावे लागते व आपण गांधींना मानतो या ढोंगाचे प्रदर्शन करावे लागते. मोदींनी देशातील सत्य मारून असत्याचे राज्य आणले. त्यांनी सर्व भ्रष्ट व खोटारड्या लोकांना एकत्र केले आणि तीच त्यांची ताकद. न्यायालयांतूनही सत्य संपवले. घटना, संविधानिक संस्थांतूनही सत्याचा विनाश केला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मोदी व शहांनी असत्याचे राज्य चालवले आहे. त्यामुळे कोणत्या गांधी विचारांची त्यांना चिंता लागून राहिली आहे? गांधी राजकारणाचा व विचाराचा पाया सत्य हाच होता. गेल्या दहा वर्षांत हा पायाच ढासळला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांच्या संस्थेसाठी मदत गोळा करायला अहमदाबादेत गेले होते. ते खास महात्माजींना भेटायला त्यांच्या आश्रमात गेले. गांधींनी त्यांचे स्वागत केले. गांधी म्हणाले, ‘‘मी माझे गुरू पुण्याचे गोपाळ कृष्ण गोखले यांना विचारले होते की, तुमच्या प्रांतात सत्यनिष्ठ माणसे कोण आहेत? त्यावर गोखले म्हणाले होते, गांधी, मी माझे स्वतःचे नाव घेऊ शकत नाही. कारण मी राजकारणात आहे, पण मला खरीखुरी सत्यनिष्ठ दोन माणसे माहीत आहेत. पहिले प्रा. धोंडो केशव ऊर्फ अण्णासाहेब कर्वे. दुसरे शंकरराव लवाटे.’’ ही माहिती देऊन गांधीजी आश्रमवासीयांना म्हणाले, ‘‘आज सत्यनिष्ठ कर्वे आले आहेत. हा शुभ दिवस आहे. सत्यनिष्ठ लोक आपल्यासाठी तीर्थरूप आहेत.’’ मोदीजी, हा गांधी विचार आहे. हा विचार आपल्याला मान्य आहे का? तुमच्या राजवटीत गांधी विचार रोज मारला जात आहे, हेच सत्य आहे!