आजचा अग्रलेख : याद आओगे खय्यामसाब!

2110

संगीतसाधना हाच एकमेव ध्यास उराशी बाळगून जगलेले खय्याम भविष्यातही आपल्या हळुवार रचनांप्रमाणेच फिल्मी दुनियेला साद घालत राहतील. गीतकारांना, संगीतकारांना आणि रसिकांनाही कोई मुझको याद करेगा क्यों..?’ अशी आर्त हाक देऊन पुनः पुन्हा आपली आणि आपल्या मखमली संगीताची आठवण करून देत राहतीलकसे विसरणार तुम्हाला? याद तो तुम बहोत आओगे खय्यामसाब…!

 ‘खय्याम’ हा साडेतीन अक्षरांचा दैवी झंकार शांत झाला आहे. चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील सुवर्णयुग अस्तंगत झाले आहे. खय्याम अबोल झाले असं तरी कसं म्हणायचं? लौकिक अर्थाने भलेही ते या जगाचा निरोप घेऊन दुसऱ्या दुनियेत रवाना झाले असतील, पण खय्याम यांनी आपल्या संगीतरचनांचा जो अद्भुत ठेवा या दुनियेतील रसिकांच्या हवाली केला आहे त्याचे काय? त्यांनी चालबद्ध केलेली एकाहून एक सरस गाणी, त्यांच्या तमाम संगीतरचना सूर्य-चंद्र असेतो आलम दुनियेच्या कानात रुंजी घालणार असतील तर खय्याम शांत झाले असे म्हणताच येत नाही. चित्रपटसृष्टीच नव्हे, तर देशभरातील सिनेरसिक खय्याम यांच्या जाण्याने दुःखी झाले आहेत. याला कारण आहे त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं. ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’ हे मुकेशनी गायलेलं अजरामर गीत खय्याम यांनीच संगीतबद्ध केलं होतं. ‘कभी कभी’ या चित्रपटाला सुपरहिट करण्यात खय्याम यांच्या संगीताचाही तितकाच मोलाचा वाटा होता. त्यामुळेच 1977 साली त्यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘आखरी खत’मधील ‘बहारो मेरा जीवन भी सवाँरो’, ‘नुरी’मधील ‘आ जा रे़ s s s आ जा रे ओ मेरे दिलबर आ जा’ ही गाणीही रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतली. त्यांच्या सुरावटींची जादूच अशी होती की, सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांना कथानकाचे विस्मरण व्हायचे आणि चित्रपटातील गाणी गुणगुणतच रसिक सिनेमागृहातून बाहेर पडायचे. ‘बाजार’ चित्रपटातील भूपेंद्रने गायलेली ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ आणि तलत अजीज व लता मंगेशकर यांनी गायलेली ‘फिर छिडी रात बात फुलों की’

या दोन्ही गझला

आजही रसिकांच्या ओठावर आहेत. बशर नवाज आणि मखदूम या दोन्ही शायरांच्या शब्दांना खय्याम यांनी दिलेला साज अलौकिकच. खय्याम यांच्या समस्त कारकिर्दीतील सर्वोकृष्ट कलाकृती म्हणजे ‘उमराव जान’! खय्याम यांना चाकोरीबाहेरचा संगीतकार, अभ्यासू आणि प्रयोगशील संगीतकार का म्हणत, हे ‘उमराव जान’च्या संगीतातून कळते. 19 व्या शतकातील नर्तकीवर बेतलेल्या या चित्रपटाला संगीत देण्यापूर्वी खय्याम यांनी त्या काळातील संगीत पद्धतीचा सखोल अभ्यास केला. अपार कष्ट घेऊन सगळे बारकावे टिपले आणि मगच संगीत दिले. त्यामुळेच ‘उमराव जान’मधील ‘दिल चीज क्या हैं आप मेरी जान लिजिए’ आणि ‘इन आँखों की मस्ती के दिवाने हजारों हैं’ ही गाणी ‘ऑलटाइम हिट’ ठरली. साहिर लुधियानवीसोबत त्यांचे सूर अधिक जुळले हे खरेच; पण मिर्झा गालिब, दाग, अली सरदार जाफरी, निदा फाजली, जाँ निसार अख्तर अशा अनेक शब्दप्रभू शायर आणि गीतकारांच्या काव्यांना संगीताचे उत्तमोत्तम कोंदण देऊन रसिकांना पेश करण्याचे काम खय्याम मोठ्या तन्मयतेने करत राहिले. चित्रपट म्हणजे छछोर चाळे हा समज पुसून चित्रपटसृष्टीचा उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि कविश्रेष्ठांशी संबंध जोडण्याचे महान कार्य खय्याम यांनी पार पाडले. फिल्म इंडस्ट्रीवर खय्याम यांनी केलेले हे मोठेच उपकार मानले पाहिजेत. मोहम्मद जहूर खय्याम हाशमी हे त्यांचे पूर्ण नाव. पण पुढे केवळ ‘खय्याम’ हीच त्यांची ओळख बनली. मिळाला चित्रपट की दे संगीत, अशा पद्धतीने भारंभार चित्रपट त्यांनी कधीच केले नाहीत. मोजके 40 चित्रपट केले, पण

एक एक कलाकृती म्हणजे बावनकशी

ठरली. संगीतकार म्हणून तर खय्याम मोठे होतेच, पण माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. चित्रपटसृष्टीत पैसा अनेकांनी कमावला, पण मृत्यूपूर्वी दहा-बारा कोटींची सगळी संपत्ती उगवत्या कलावंतांना दान करण्याचे दातृत्व दाखवले ते खय्याम यांनीच. पुलवामाच्या हत्याकांडानंतर व्यथित झालेल्या खय्याम यांनी केवळ वाढदिवस रद्दच केला नाही, तर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत दिली. सदैव नतमस्तक व्हावे, असेच होते खय्याम! ज्येष्ठ संगीतकार, थोर संगीतकार ही विशेषणेही तोकडी वाटावीत अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. संगीतसाधना हाच एकमेव ध्यास उराशी बाळगून जगलेले खय्याम भविष्यातही आपल्या हळुवार रचनांप्रमाणेच फिल्मी दुनियेला साद घालत राहतील. गीतकारांना, संगीतकारांना आणि रसिकांनाही ‘कोई मुझको याद करेगा क्यों..?’ अशी आर्त हाक देऊन पुनः पुन्हा आपली आणि आपल्या मखमली संगीताची आठवण करून देत राहतील. ‘कभी कभी’ चित्रपटात साहिरचे शब्द आणि खय्याम यांच्या संगीताने त्रिकालाबाधित सत्य असलेले तत्त्वज्ञान मांडले-

कल और आएंगे नगमों की खिलती कलियाँ चुननेवाले

मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले

कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे

मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूँ वक्त अपना बरबाद करे?

‘मैं पल दो पल का शायर हूँ’ या गीतातील हा सवाल आज काळजाचा ठाव घेतो आहे. कसे विसरणार तुम्हाला? याद तो तुम बहोत आओगे खय्यामसाब…!

आपली प्रतिक्रिया द्या