सामना अग्रलेख – कोवळी पानगळ!

वायुप्रदूषणाच्या जीवघेण्या दुष्परिणामांविषयी अमेरिकन संस्थेने जाहीर केलेला ताजा अहवाल डोळ्यांत झणझणीत अंजन टाकणारा आहे. हिंदुस्थानसारख्या देशात केवळ वायुप्रदूषणामुळे दरवर्षी लाखावर बालके मृत्युमुखी पडत असतील तर हे चित्र शरमेने मान झुकावी असेच आहे. हा अहवाल तरी आपण डोळ्यांत तेल घालून वाचणार, की प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांप्रमाणेच याकडेही डोळेझाक करणार हा प्रश्नच आहे!

आपला देश किती वेगाने प्रगती करतो आहे, सर्वच क्षेत्रांमध्ये देशाची कशी घोडदौड सुरू आहे, हिंदुस्थान लवकरच कशी जागतिक महासत्ता वगैरे बनणार आहे अशी टिमकी वाजवणाऱ्या लंब्याचवड्या पोस्टस् आणि मेसेजेस्चा हल्ली सोशल मीडियावर धुमापूळ सुरू असतो. साठ-सत्तर वर्षांमध्ये देशामध्ये काहीच कसे झाले नाही इथपासून ते गेल्या पाच-सहा वर्षांतच देश कसा सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उदयास आला इथपर्यंतचे दिव्य ज्ञान सोशल मीडिया नामक विद्यापीठाचे स्वयंघोषित प्रकांडपंडित इकडून तिकडे पाठवत असतात. देशात पुन्हा एकदा कसा सोन्याचा धूर निघणार आहे आणि गोरगरिबांच्या घरांवर सोन्याची काैले बसणार आहेत अशी फेकम्फाक करायलाही ‘फॉरवर्डी’ पंथाचे हे अनुयायी मागेपुढे पाहत नाहीत. मात्र सत्तापक्षाच्या आयटी सेलकडून होलसेलात पुरवल्या जाणाऱ्या अशा मेसेजेस्चा नित्यनेमाने रतीब घालणाऱ्या मंडळींचे डोळे खाडकन् उघडावेत असा एक भयंकर अहवाल अमेरिकेतील संस्थेने जाहीर केला आहे. वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात हिंदुस्थानात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. जन्म झाल्यानंतर महिनाभराच्या आतच ही बालके मृत्युमुखी पडली.

इकडे आपण

डिजिटल क्रांती, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत मिशन वगैरे वगैरे गमजा मारतो, देश कसा वैभवशाली बनतो आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय आणि दुसरीकडे एकाच वर्षात लाखांहून अधिक तान्ही बाळे वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांमुळे मरण पावतात हे चित्र विदारक आहे. हे जग डोळे भरून पाहण्यापूर्वीच त्यांचा श्वास गुदमरत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? अमेरिकेतील ‘हेल्थ इफेक्टस् इन्स्टिटय़ूट अॅण्ड ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या संस्थेने जगभरातील वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून ‘ग्लोबल एअर- 2020’ या शीर्षकाखाली जो अहवाल जाहीर केला तो भयंकर आहे. आश्चर्य असे की नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया आणि कांगो या देशांपेक्षाही हिंदुस्थानात वायुप्रदूषणामुळे नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. वर्षाकाठी सवा लाखाच्या आसपास नवजात अर्भके जन्म घेऊन लगेचच देवाघरी जात असतील तर ‘मेरा देश बदल रहा है’ हे घोषवाक्य तरी आपण कुठल्या तोंडाने म्हणायचे? ग्लोबल एअरच्या अहवालानुसार वायुप्रदूषणामुळे जी बालके मृत्युमुखी पडली ती गर्भावस्थेत असतानाच प्रदूषणाची शिकार झालेली होती. स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा जाळून, कोळसा किंवा गोवऱ्यांचा चुलींमध्ये जळण म्हणून वापर करणाऱ्या कुटुंबांमध्ये या

बालमृत्यूचे प्रमाण

सर्वाधिक आहे. चुलीजवळ काम करणाऱया गर्भवती महिलांद्वारे हे प्रदूषण गर्भातील बाळापर्यंत पोहचते. त्यामुळे एक तर मुदतपूर्व प्रसूती किंवा प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असणे आणि त्यातून गंभीर आजार उद्भवून बालके मृत्युमुखी पडणे असे हे दुष्टचप्र आहे. वातावरणातील हवेची गुणवत्ता योग्य पद्वतीने राखता आली तर ही ‘कोवळी पानगळ’ रोखणे सहजशक्य आहे. मात्र हे करायचे कोणी? कारखानदारीमुळे फैलावणारे वायुप्रदूषण हा आपल्या देशात मोठा विषय आहे. शिवाय शेतीचा हंगाम संपल्यानंतर पिके काढून उरलेले अवशेष जाळून टाकण्यामुळे दरवर्षी राजधानी दिल्ली धुक्याबरोबरच प्रदूषणाच्या धुरामध्ये हरवून जाते. प्रदूषण नियंत्रणाचे कठोर कायदे कानून चिक्कार आहेत, पण कागदांवरील नियमांचे पालन खरेच होते काय? नवजात बालकेच नव्हे, तर वृद्धांच्या आरोग्यावरही प्रदूषणाचे दुष्परिणाम होतातच. वायुप्रदूषणाच्या जीवघेण्या दुष्परिणामांविषयी अमेरिकन संस्थेने जाहीर केलेला ताजा अहवाल डोळ्य़ांत झणझणीत अंजन टाकणारा आहे. हिंदुस्थानसारख्या देशात केवळ वायुप्रदूषणामुळे दरवर्षी लाखावर बालके मृत्युमुखी पडत असतील तर हे चित्र शरमेने मान झुकावी असेच आहे. हा अहवाल तरी आपण डोळय़ांत तेल घालून वाचणार, की प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांप्रमाणेच याकडेही डोळेझाक करणार हा प्रश्नच आहे!

आपली प्रतिक्रिया द्या