सामना अग्रलेख – खासगी पंगत!

पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले तसे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होईल.  निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पहा.

भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला यावर भाजपचे लोक टीका करीत आहेत, पण सत्य असे आहे की, 20 प्रमुख पक्षांचा विरोध नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास नाही. उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे. नवे संसद भवन ही भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून समृद्ध लोकशाहीचे प्रतीक असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. लोकशाहीवर या मंडळींनी बोलणे हा विनोद आहे. नवे संसद भवन हे काही एखाद्या पक्षाच्या मालकीचे नाही ते देशाचे आहे. नटवरलाल नावाच्या एका भामटय़ाने संसद भवन, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. तसे हे

नवे संसद भवन

बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करून घेतले आहे काय? संसद भवन व त्यावरील सिंहाची तीन तोंडे म्हणजे भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे, पण या सिंहांनी गर्जना करू नये, रौद्ररूप धारण करू नये असे श्रीमान पंतप्रधानांना वाटत आहे. ज्यांना हे लोक विरोधक म्हणतात ते सध्याच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त देशभक्त आहेत. त्यांची भूमिका काय आहे, तर राष्ट्रपतींचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रपती केवळ देशाचे प्रमुख नसतात, तर संसदेचे अविभाज्य घटकही असतात. राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवतात, वर्षारंभाच्या पहिल्या अधिवेशनाला मार्गदर्शन करतात. राष्ट्रपतींविना संसद कार्यरत राहू शकत नाही. राष्ट्रपती हेच संसदेचे सर्वाधिकारी असतात. पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना दिले नाही, असे काँग्रेस, शिवसेनेसह 20 राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील भाजप भजनी मंडळातील टाळकुटय़ांनाही यानिमित्ताने कंठ फुटला आहे. शिवसेनेने उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला, पण श्रीमान उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. जेथे देशाच्या राष्ट्रपतींनाच उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण नाही, तेथे तुम्हा-आम्हाला निमंत्रण असले किंवा नसले काय, काय फरक पडतोय?

राष्ट्रपतींच्या अपमानाबद्दल

फडणवीस यांनी बोलावे. संविधान, नैतिकतेची जी पायमल्ली चालली आहे, त्यावर बोलावे. लोकशाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकेस महत्त्व नसेल तर ती लोकशाही काय चाटायची आहे? राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख व देशाचे पहिले नागरिक असल्याने त्यांचा अपमान होऊ नये. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे. हे पक्ष आपापल्या मतांनुसार निर्णय घेतील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. याचा अर्थ कुणालाही आग्रहाचे, प्रेमाचे निमंत्रण नाही. हा आमचा कौटुंबिक सोहळा असून एक औपचारिकता म्हणून निमंत्रणे पाठवली आहेत, यायलाच हवे असा आग्रह नाही. म्हणजे नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळय़ास खासगी कार्यक्रमाचेच स्वरूप आले. पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले तसे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होईल. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे स्थान पंतप्रधानांच्या बरोबरीने असते. निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पहा.