सामना अग्रलेख – गडकरींचा किल्ला!

नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे!

राष्ट्राच्या आकांक्षा जशा महाकाव्यात प्रकट व्हाव्यात तसे नाथ पैंच्या वक्तृत्वातून आमच्या सर्वांचे पडसाद उमटतात असे एकदा कवी वसंत बापट म्हणाले होते. अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळय़ांनाच विचार करायला लावणारे आहे. ‘‘सध्या ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,’’ अशी निरवानिरवीची भाषा श्री. गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असहय़ होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात यशस्वी ठरतातच असे नव्हे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. गडकरी हे स्वतःला सध्याच्या राजकारणात ‘फिट’ मानत नाहीत. सभोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते. सध्याचे राजकारण हे विचारांचे, नीतिमत्तेचे राहिलेले नाही. श्री. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला

गांधी विचार

मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचे. पूर्वी समाजकारणासाठी लोक राजकारणात येत होते, आज तसे नाही. ज्याला आमदार, खासदार, मंत्री व्हायचे आहे, गेलाबाजार मुख्यमंत्री व एखाद्या महामंडळाचे सदस्य व्हायचे असते अशी व्यक्ती राजकारणात येते. काही जण तर सर्व काही मिळून व मिळवून स्वजनांशी द्रोह करतात. अनेक जण इकडून तिकडे उडय़ा मारतात. आईचेच दूध बाजारात विकणारी औलाद सध्याच्या राजकारणात निर्माण झाल्याची खंत श्री. गडकरी यांनी व्यक्त केलेली दिसते. अनेक साहित्यिक, कलावंत, चांगला राजकारणी यांचा एकच समान धर्म होत असतो, तो म्हणजे `Those who fell the joint agony of the world and toil like slaves to cure humanity for mortal good’ असे कीट्सने सांगितले आहे. मानवतेबद्दलची ही कणव, ही वेदना, ही संवेदना, ही सहानुभूती ओथंबून ज्यांच्या अंतःकरणात असते तो कधी स्वातंत्र्यसंग्रामाचा सेनानी म्हणून राजकारणात उतरतो, तर कधी देशातील गुलामगिरी, एकाधिकारशाही पाहवत नाही म्हणून आत्मयज्ञासाठी तयार होतो. आज असा आत्मयज्ञ करू पाहणारे राजकारणी देशाचे शत्रू ठरवले जातात. आज देशामध्ये एक प्रकारे गोंधळाचेच वातावरण आहे, ध्येयहीनता आहे. सारी श्रद्धास्थाने कोलमडून पडली आहेत. जनतेचा तेजोभंग झाला आहे, पण जनता एका भयाच्या सावटाखाली आहे. आज हिंदुस्थानात अनेक गोष्टींची अग्निपरीक्षा सुरू आहे. न्याय, लोकशाही, माणुसकी, संसदीय लोकशाही, वृत्तपत्र, देशाची अखंडता, व्यक्तींचे स्वातंत्र्य

अशा अनेक गोष्टी

टिकणार की नाहीत? अनेक मूल्ये आमच्याकडे राहणार की नाहीत? जे जिवाचे मोल देऊन मिळाले होते ते तरी राहणार की नाही? अत्यंत कसोटीच्या काळातून हे राष्ट्र, महाराष्ट्र व समाज जात आहे. माणसे विकत घेणे व माणसांची बोली लावणे हाच राजकारणाचा धर्म बनला आहे. या वातावरणात नितीन गडकरी यांचे बोलणे थोडे निराशेचे असले तरी मनगटांत चेतना निर्माण करणारेही आहे. सध्याच्या पेंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळय़ात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. श्री. शरद पवार, श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकले तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱयांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले. गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता. गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत. त्यांची अस्वस्थता अधूनमधून व्यक्त होत असते, पण त्यासाठी व्यासपीठ नागपूरचेच असते हे विशेष. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे!